आर्लेकर, शेट, तवडकरांच्या उमेदवारीबाबत निर्णय उद्या

0
81

>> गणेश गावकर – विनय तेंडुलकर यांच्यात सावर्ड्यात चुरस

 

सभापती व मयेचे आमदार अनंत शेट, काणकोणचे आमदार व मंत्री रमेश तवडकर, वन व पर्यावरणमंत्री व पेडणेचे आमदार राजेंद्र आर्लेकर व सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय प्रलंबित असून उद्या १० रोजी त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. वरील चारही जागांवर भाजपने टांगती तलवार ठेवल्याने सध्या तो चर्चेचा विषय ठरलेला
आहे.
वरील चार जणांपैकी कुणाला उमेदवारी मिळते व कुणाला डावलले जाते याबाबत पक्ष कार्यकर्ते व जनतेमध्येही उत्सुकता आहे. काणकोण मतदारसंघात उमेदवारीसाठी काणकोणचे माजी आमदार विजय पै खोत व रमेश तवडकर यांच्यात चुरस आहे. विजय पै खोत यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत तर सावर्डे मतदारसंघातून आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर प्रयत्नशील आहेत. मयेत कॉंग्रेसचे प्रविण झांट्ये यांना उमेदवारी देण्याचे घाटत असल्याने उमेदवारीचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
पेडणे मतदारसंघात मात्र राजेंद्र आर्लेकर हे सोडल्यास अन्य इच्छुक उमेदवार नाहीत. भाजपच्या राज्यस्तरीय निवडणूक समितीकडे आर्लेकर यांच्याशिवाय अन्य कुणाचेही उमेदवारीसाठी नाव पोचलेले नाही. पण तसे असतानाही त्यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील का दाखवण्यात आलेला नाही, असा प्रश्‍न पेडण्यातील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. वरील मतदारसंघांतील उमेदवारीचा फैसला उद्या होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.