आर्थिक मंदी, म्हादईवरून कॉंग्रेसने काढला राजभवनवर धडक मोर्चा

0
122

देशातील आर्थिक मंदी व म्हादई प्रश्‍नावरून काल कॉंग्रेस पक्षाने दोनापावल येथील राजभवनवर भारत बचाव, म्हादई बचाव धडक मोर्चा काढला. मात्र विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील सुमारे दोनशे कॉंग्रेस कार्यकर्ते व नेते यांचा हा मोर्चा पोलिसांनी राजभवनपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरच अडवला. यावेळी पोलीस व मोर्चेकरी यांच्यात बरीच झटापट झाली.

शेवटी उपिभागीय न्यायदंडाधिकारी दत्तप्रसाद गांवस देसाई यांनी मध्यस्थी करून कॉंग्रेसच्या दहा जणांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांना कॉंग्रेसचे मागण्यांचे निवेदन सादर करू देण्यास परवानगी दिली. तत्पूर्वी गिरिश चोडणकर यानी जमावातील लोकांच्या अंगावरून चढून पोलिसांचा कडा मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरिश चोडणकर, प्रवक्ते ट्रोजन डिमेलो, आल्तिनो गोम्स, अमरनाथ पणजीकर, उरफान मुल्ला, महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, एम. के. शेख, संकल्प आमोणकर व आग्नेल फर्नांडिस यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळाने नंतर आपले निवेदन राज्यपाल गोव्याबाहेर असल्याने त्यांच्या सचिवांकडे सुपूर्द केले.

चुकीच्या धोरणांमुळे देशाची
अर्थव्यवस्था रसातळाला ः कामत
तत्पूर्वी, ज्या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडवला होता तेथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिगंबर कामत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. देशातील उद्योग जगत कधी नव्हे एवढे संकटात सापडले आहे. पार्लेसारखी बिस्किट कंपनीही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यावरून अर्थव्यवस्था किती धोक्याच्या पातळीवर आलेली आहे हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या सर्व माजी गव्हर्नर्सनी अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली असल्याचे ते म्हणाले.

म्हादईचा प्रश्‍न हा गंभीर असल्याचे सांगून कामत म्हणाले की, कर्नाटकसारख्या मोठ्या राज्यात सत्ता हस्तगत करता यावी यासाठी केंद्रातील मोदी सरकार त्यांना म्हादईचे पाणी वळवू देऊ पाहत असून गोव्याचा घात करू पाहत असल्याचे ते म्हणाले. म्हादई प्रश्‍नावरून गोव्यातील सर्व जनतेने पेटून उठण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेसच्या एकाच आमदाराचा सहभाग
कॉंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व लुईझिन फालेरो यानी मोर्चात भाग घेतला नाही. त्याविषयी गिरिश चोडणकर यांना पत्रकारांनी विचारले असता काही आमदारांची प्रकृती ठिक नसल्याचे चोडणकर यानी सांगितले.