आरोग्य सेतू ऍप’ असेल तरच कार्यालयात या!

0
115

>> दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

>> सर्वसामान्य लोकांमधून संताप

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी इमारतीत प्रवेश करण्यास लोकांना निर्बंध लादले आहेत. आरोग्य सेतू ऍप नसलेल्या लोकांना प्रवेश देऊ नका, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सुरक्षा रक्षकांना दिला आहे. त्यामुळे नागरिक व सर्वसामान्य लोकांनी या आदेशाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

दक्षिण गोवा जिल्हा इमारत संकुलात सर्व सरकारी कचेर्‍या आहेत. तलाठ्यांपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत नागरी पुरवठा खाते, वाहतूक खात्याची एक कचेरी, नागरी सुविधा केंद्र, जन्ममृत्यू व भूमापन कार्यालय त्याशिवाय अनेक कचेर्‍या आहेत. यातील बहुतांश कार्यालयांत सर्वसामान्यांना जावे लागते. त्यामुळे या आदेशाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाचा विरोध
या निर्णयाविरोधात गोवा फॉरवर्ड पक्षाने आक्षेप घेतला असून पक्षाचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी आदेश त्वरित मागे घेण्याची मागणी केली. दक्षिण गोव्यातील ५० टक्के लोकांकडे स्मार्ट फोन नाही. तर आरोग्य सेतू ऍप ते कसे घेऊ शकतात? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी आदेश मागे घ्यावा ः दिगंबर कामत
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी सर्वसामान्य जनतेला जिल्हाधिकारी इमारतीत येण्यास जे निर्बंध घातले आहेत ते सर्वसामान्यांना संकटात टाकणारे आहेत. त्यासाठी तो आदेश त्वरित मागे घ्यावा, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
आरोग्य सेतू ऍप ज्याच्याकडे आहे त्यांना प्रवेश म्हणजे सर्वसामान्यांना प्रवेश नाकारणे आहे. बहुतांश गरीब लोकांकडे मोबाईल नाही. आपण याबाबतीत गोव्याचे मुख्य सचिव परिमल रॉय यांच्याशी संपर्क साधल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.

 

अन्यथा आंदोलन छेडणार : गिरीश चोडणकर

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केलेल्या नागरिकांनाच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला जाईल, असा जो आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढला आहे. त्यावर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जोरदार टीका केली असून सरकारने वरील आदेश ताबडतोब मागे घ्यावा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. सरकारने जर हा आदेश मागे घेतला नाही तर कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी लोकांना सोबत घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत प्रवेश करतील, असा इशाराही चोडणकर यांनी काल दिला. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजप सरकार हे असंवेदनशील असून ते प्रशासनावरील ताबाच हरवून बसले असल्याचा आरोपही काल चोडणकर यानी केला. राज्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यास राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.