आरोग्य मंथन स्वप्न आणि झोप

0
409
  • प्रा. रमेश सप्रे

स्वप्नांना फार महत्त्व देण्यात अर्थ नाही. एक तर ती झोपेची शत्रू असतात अन् दुसरं म्हणजे त्यांच्यावर प्रत्यक्ष जीवनातलं फारसं अवलंबून नसतं. यापेक्षा महत्त्वाची असतात ती मानवानं जागेपणी पाहिलेली स्वप्नं, ध्येयं, लक्ष्यं नि उद्दिष्टं.

रामायणातील कुंभकर्ण झोपाळू म्हणून प्रसिद्ध, खरं तर शापित ठरला. त्यानं केलेल्या उग्र तपश्‍चर्येमुळे प्रसन्न झालेल्या साक्षात् ब्रह्मदेवाच्या मनातही हा निश्चित कोणता वर मागेल याची खात्री नसल्यामुळे ताण होता. रावणानं वर मागितला तो सहज दिला गेला. बिभिषण विष्णुभक्त असल्याने वर देताना भीतीच नव्हती. पण हा तिसरा भाऊ कुंभकर्ण मात्र असं काहीतरी मागेल की ज्यामुळे त्याचं आध्यात्मिक बल वाढेलच पण राक्षसांचं मनोधैर्यही उंचावेल. म्हणून ब्रह्मदेवांनी सरस्वतीला कुंभकर्ण वर मागेल तेव्हा त्याच्या जिभेवर बसून तो निराळाच शब्द उच्चारेल याची काळजी घ्यायला सांगितली. तिनं कुंभकर्णाला हवी असलेल्या ‘तंद्रा’ म्हणजे समाधीऐवजी ‘निद्रा’ हा शब्द उच्चारवला. ब्रह्मदेवानं तत्काळ ‘तथास्तु’ म्हटलं. देव आता निश्चिंत झाले. ‘सहा महिने सलग झोप’ हा भाग सोडला तरी दीर्घकाळ झोपणार्‍या व्यक्तीला कुंभकर्ण म्हणू लागले. झोप ही तमोगुणी म्हणजे आळस निर्माण करणारी. म्हणून काहीसा बदनाम झाला कुंभकर्ण!
आज मात्र सर्वसामान्य मानवही शांत झोपेसाठी तळमळतोय. झोपेच्या गोळ्यांचा खप वाढतोय. विशेष म्हणजे जे देश श्रीमंत-समृद्ध आहेत, जेथील बहुसंख्य जनता सुशिक्षित आहे आणि गतिमान (प्रगतिशील) आहे त्या देशात निद्रानाशावरच्या गोळ्यांचा खप सर्वाधिक आहे. गाढ झोप म्हणजे स्वप्नांचा अभाव. म्हणजेच स्वप्न हे झोपेतील अडथळे (स्पीडब्रेकर्स सारखे स्लीप ब्रेकर्स) आहेत.

‘निःस्वप्न गाढ निद्रा’ हे तनामनाच्या आरोग्यासाठी वरदान आहे. शाप नव्हे. पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या, अभ्यास, व्रतंअनुष्ठानं, यज्ञकर्म करताना झोप कमी घ्यावी यावर अधिक भर देत असत. त्यांना झोप म्हणजे आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गातलं संकट वाटे. पण त्याचवेळी हेही लक्षात घ्यायला हवं की झोपेची लांबी महत्त्वाची नसून खोली (डेप्थ) महत्त्वाची असते. गाढ निद्रा म्हणजे अशी खोल झोप, जी निःस्वप्न असते. त्याविषयी काही सुभाषितं पाहू या –

सुखेन दान्तः स्वपिति सुखंच प्रतिबुध्यते ॥

हा विचार पद्मपुराणातला आहे. याचा अर्थ आहे – ज्याने इंद्रिये जिंकली आहेत (दान्तः) असा मनुष्य योग्य वेळी आरामात झोपतो (प्रमाणात झोपतो) आणि योग्य वेळी जागृतावस्थेत येतो. झोपेवर त्याचं नियंत्रण असतं कारण इंद्रियं (नि त्यांचे भोग) यावर त्याचं नियंत्रण असतं. याला योगशास्त्रात ‘इंद्रियदमन’ म्हणतात. जसं शम (शांती) असलेला माणूस शांत बनतो, तसा दम (दमन) असलेला दान्त बनतो. म्हणजे शांतपणे झोपण्यासाठी स्वस्थ मन, इंद्रियांवर म्हणजेच त्यांच्या विषयांवर किंवा उपभोगांवर नियंत्रण आवश्यक असतं. या गोष्टी आता खूप दुर्मिळ झाल्याहेत.
निद्रेचा विचार यापूर्वी आपण केलाय- ‘निद्रापुराण’ या लेखात. यावेळी लक्ष केंद्रित करायचंय स्वप्नांवर. रात्री शांत, गाढ झोप का मिळत नाही? कुणाला मिळत नाही?
* आशापाशैः परीतांगा मे भवन्ति नरोर्दिताः|
ते रात्रौ शेरते नैव तदप्राप्तिविचिन्तया ॥

ज्या माणसाच्या मनात विविध प्रकारच्या आशा-अभिलाषा-आकांक्षा असतात त्यांचं मन सतत अस्वस्थ असतं. आपल्या आशाआकांक्षा पूर्ण होतील की नाही याची चिंता त्यांच्या मनात सतत बेचैनी निर्माण करत असते. म्हणून ते रात्रभर तळमळत राहतात. त्यांना शांत झोप मिळत नाही.

स्वप्न हा मानसशास्त्राचा विषय आहे. अनेक मनोविकारतज्ज्ञ, मनाच्या व्यवहार-व्यापारांचं विश्‍लेषण करणारे (सायको ऍनालिस्ट) आपल्या अभ्यासात स्वप्नांवर भर देतात. कारण माणसाच्या जागृत मनात ज्या इच्छा वासना अनेक कारणांमुळे अतृप्त राहतात त्यांची पूर्ती अर्धनिद्रित किंवा अर्धजागृत अवस्थेत केली जाते. याला ‘विश् फुलफिलमेंट’ म्हणजे आपल्या इच्छांची पूर्ती, वासनांचे, दडपलेल्या भावनांचे स्वप्नात घेतलेले भोग किंवा अनुभव- याचा आपल्या एकूणच जीवनावर, आरोग्यावर विशेषतः मनाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

जागृत अवस्था नि स्वप्नावस्था यात विशेष फरक नसतो. फक्त जागृत अवस्थेतील अनुभव जीवनाच्या प्रत्यक्ष रंगमंचावर घेतले जातात तर स्वप्नातले अनुभव मनाच्या पडद्यावर.

जाग्रत् स्वप्नदशाभेदो न स्थिरास्थिरते विना |

योगवासिष्ठातील हे वचन फार महत्त्वाचं आहे. जागृत असताना मनुष्य हालचाल करतो, स्वप्न पाहत असताना तो झोपलेला असतो. प्रत्यक्ष हालचाल करत नसतो. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेत नसतो.
आपण म्हणतो पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात. काहींना स्वप्नदृष्टांत होतात ज्यात भावी काळातील घटनांची पूर्वकल्पना मिळते.

अवितथपूलाश्च प्रायो निशावसानसमयदृष्टा भवन्ति स्वप्नाः |

सर्वसाधारणपणे रात्रीच्या उत्तर कालात (उत्तरार्धात) म्हणजे पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात. त्यात भावी घटनांची सूचना असते.
तुकारामासारख्या संतांना तर स्वप्नात सद्गुरु (बाबाजी चैतन्य) येऊन मंत्रदीक्षा देतात. ‘रामकृष्णहरि’ या मंत्राचा अनुग्रह देतात. तुकारामासारख्या अखंड नाम घेणार्‍या भक्ताला देहातले गुरू लाभले नाहीत. पण प्रत्यक्ष अनुग्रहापेक्षा हा स्वप्नदृष्टांतातला अनुग्रह तुकोबांचे जीवन आमुलाग्र बदलून गेला. विठ्ठलनामाचा अविरत ध्यास घेऊन तुका झालासे कळस या अवस्थेपर्यंत तुकारामाची प्रगती झाली. स्वप्नं सारीच खोटी, आभासात्मक असतात असं नाही. शांत झोप लागली तर स्वप्न पडत नाहीत. यासाठी महत्त्वाचं आहे ते सदाचरण आणि निर्मळ मन. आपण म्हणतोच ना ः ध्यानी-मनी-जीवनी ते स्वप्नी!

* नातिप्रसुप्तः पुरुषः सफलान् अफलानपि |
इंद्रियेशेन मनसा पश्यति स्वप्नात् अनेकधा ॥

चरक या प्रसिद्ध आयुर्वेदाचार्यांचं हे मत आहे –
ज्याला गाढ झोप लागत नाही व ज्याचे मन इंद्रियाचं स्वामी नसतं त्याला फळणारी (पूर्ण होणारी) आणि न फळणारी (अपूर्ण राहणारी) निरनिराळ्या प्रकारची (अनेकधा) स्वप्नं पडतात. म्हणून इंद्रियांच्या अधीन राहून त्यांचे गुलाम असणार्‍यांच्या सर्व वासना-इच्छा पुर्‍या होत नाहीत. त्या त्यांचं अंतर्मन स्वप्नात पुर्‍या करून घेतं. साहजिकच मग चांगली-वाईट, सुंदर-भयंकर स्वप्नं पडतात. बहुधा वाईट-भयंकर स्वप्नच अधिक पडतात.
प्रामाणिकपणे जगून, खूप कष्ट केले, सर्वांची सेवा केली, सर्वांवर प्रेम केलं, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून प्रार्थना केली तर बिछान्यावर पडल्या पडल्या शांत झोप लागते. याच्या उलट अप्रामाणिक, स्वार्थी, दुष्ट वर्तन असेल तर मनाची अस्वस्थता, तळमळ शांत झोप लागू देत नाही.
दुर्योधनाबद्दल एक उल्लेख येतो. तो म्हणजे –

* पर्यायेण हि दृश्यन्ते स्वप्नाः कामं शुभाशुभाः |
शतसंख्या पुनरियं सानुजं स्पृशतीव माम् ॥

स्वप्नात दुर्योधनाला एक दृश्य दिसले. एका नकुलानं (मुंगसानं) शंभर साप मारले. या स्वप्नाला अशुभ समजून दुर्योधन खूप घाबरला. जागा झाल्यावर तो उद्गारला- ‘शुभ किंवा अशुभ स्वप्न नेहमी दिसत नाहीत. कधीकधीच दिसतात’. ती सारी खरी होतात असं नाही हेही त्याला सुचवायचं होतं. पण त्याला दिसलं ते मात्र भीतिदायकच नि भविष्यकालाच्या दृष्टीनं अशुभ असंच होतं. त्याला वारंवार स्वप्नं पडू लागली नि त्यात त्याच्यासह शंभर कौरवांचा (इतर सार्‍या भावांचा) मृत्यूच दिसत होता. त्या सार्‍यांच्या मरणाची सूचना त्या स्वप्नात त्याला दिसत होती. मोठ्या विश्‍वासानं (आत्मविश्‍वासानं) जरी पांडवांशी युद्ध पुकारलं तरी आतून पांडवांच्या विजयाची म्हणजे स्वतःच्या कुलसंहाराची त्याला कल्पना होती. मनातल्या मनात जागेपणी तो स्वतःला या भयंकर भाविकालाची सूचना देत होता. त्यामुळे स्वप्नातही त्याला ते सूचक दृश्य दिसत होतं- एक मुंगूस शंभर सर्पांना मारीत आहे. कळतनकळत आपण केलेल्या पापांची उजळणी नि कबूली दुर्योधन स्वप्नात देत होता.

या संदर्भात वैज्ञानिक क्षेत्रात झालेल्या संशोधनाचा उल्लेख करणं योग्य ठरेल.
स्वप्न पाहताना माणसाच्या पापण्यांची जलद हालचाल होत असते. याला ‘रॅपिड आय् मुव्हमेंट (आर्‌ईएम्)’ असं म्हणतात. झोपताना डोळ्यांवर अगदी हलके सेन्सर्स लावून त्यांच्याद्वारा डोळ्यांच्या पापण्यांच्या हालचालीचे आलेख (ग्राफ) तयार केले. जागे झाल्यावर त्या लोकांना पडलेल्या स्वप्नांचं वर्णन करायला सांगून त्यातून त्या आलेखांचा अर्थ लावला गेला. अश्याप्रकारे कैदेतील गुन्हेगारांच्या स्वप्नांचा अर्थ लावून (इंटरप्रिटेशन ऑफ् ड्रीम्स), तो कैदी खरंच गुन्हेगार आहे की निर्दोष आहे हे ठरवायला मदत होऊ लागली. कारण स्वप्नात आपण केलेल्या अपकृत्यांची, पापांची, अपराधांची उजळणी होत असते.

अशीही एक पाहणी (सर्व्हे- सर्वेक्षण) केली गेली की ज्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे अशा गुन्हेगारांची स्वप्नं गुन्ह्याची कबुली देणारी असतात की निरपराधित्व सिद्ध करणारी असतात. एवढंच नव्हे तर जपानसारख्या आत्महत्या हा कायद्यानं गुन्हा मानत नसलेल्या देशात आत्महत्येपूर्वी त्या व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या चिठ्‌ठ्यांचा अभ्यास करून असाच सिद्धांत समोर आला. खुनासारखे गुन्हे केलेल्या पण कायद्याच्या कचाट्यात न सापडलेल्या बहुसंख्य व्यक्तींनी स्वप्नात त्या गुन्ह्याच्या दृश्यामुळे होणार्‍या मनस्तापाचा नि पश्चात्तापाचा उल्लेख केला होता.

मन जसं माणसाच्या स्वभावाचा आरसा असतं आणि चेहरा हा मनाचा आरसा असतो. त्याचप्रमाणे स्वप्नं अनेकवेळा आपल्या कर्मांचा (बहुधा दुष्कर्मांचा) आरसा असतात.
त्याचबरोबर झोपेत पडलेल्या स्वप्नांना फार महत्त्व देऊ नये असं मानणार्‍या मंडळींचाही मोठा वर्ग आहे. एखादं स्वप्न खरं झालं तर तो काकतालीय न्याय, म्हणजे कावळा बसायला नि झाडाची फांदी मोडायला एकच क्षण लागतो. आपल्याला (नि कदाचित कावळ्यालाही) वाटतं कावळा बसल्यामुळे, कावळ्याच्या वजनामुळे फांदी मोडली. हा योगायोग किंवा अपघात असू शकतो.
* ग्रहाणां चरितं स्वप्नोऽनिमित्तौत्पातिकं तथा |
फलन्ति काकतालीयं, तेभ्यो प्राज्ञा न बिभ्यति ॥

ग्रहांची गती (ज्योतिष), कारणाशिवाय होणारे उत्पात आणि स्वप्नं ही काकतालीय न्यायानुसार घडतात. शहाणी, बुद्धिमान माणसं त्याला काहीही महत्त्व देत नाहीत. त्यानुसार जीवनातील कोणतेही निर्णय घेत नाही.

याचा अर्थ स्वप्नांना फार महत्त्व देण्यात अर्थ नाही. एक तर ती झोपेची शत्रू असतात अन् दुसरं म्हणजे त्यांच्यावर प्रत्यक्ष जीवनातलं फारसं अवलंबून नसतं. यापेक्षा महत्त्वाची असतात ती मानवानं जागेपणी पाहिलेली स्वप्नं, ध्येयं, लक्ष्यं नि उद्दिष्टं. अशा स्वप्नांच्या पूर्तीचं वेड लागल्यानेच किंवा ती जीवनात साकार करण्याच्या ध्यासामुळेच मानवानं एवढे शोध लावले. एवढी प्रगती केली. या संदर्भात एक सुविचार खूप छान आहे. ‘काही स्वप्नं झोपेत पडतात. पण काही स्वप्नं अशी असतात की ती पूर्ण होईपर्यंत आपल्याला जागं ठेवतात. झोपूच देत नाहीत’. तुम्हीच ठरवा कुठली स्वप्नं चांगली? झोपेतली की झोपू न देणारी, अखंड जागं ठेवणारी?