आरोग्य खाते परिचारिकांच्या २०० जागा लवकरच भरणार

0
83

आरोग्य खात्यातर्फे परिचारिकांच्या २०० जागा लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. बांबोळी येथील नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आरोग्य मंत्री राणे यांनी ही माहिती दिली. नर्सिंग इन्स्टिटूटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना आरोग्य मंत्री राणे यांनी केली.

राज्यात परिचारिकांच्या अनेक जागा रिकाम्या आहेत. सरकारकडून पहिल्या टप्प्यात समारे २०० नर्सचे जागे भरण्यात येणार आहे. नर्सच्या जागा कायम स्वरूपी भरण्यासाठी प्रक्रियेला सुरू करण्यात आली आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीवर मागील ७ ते ८ वर्षे काम करणार्‍या नर्सना प्राधान्य दिले जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

निओ नेटल केअर आणि कार्डियोलॉजीमध्ये नर्सिंगसाठी खास अभ्यासक्रम लवकरच सुरू केले जाणार आहे. नर्सिंग इन्स्टिटूटमधील विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी ४ ते ५ विद्यार्थी, २ प्राध्यापक व प्राचार्याचा समावेश असलेल्या एका कोअर समितीची स्थापना करावी, अशी सूचना मंत्री राणे यांनी केली. या संस्थेतील कर्मचार्‍यांच्या भरतीबाबत विचार केला जाणार आहे. या संस्थेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी भेडसावणार्‍या विविध समस्या मंत्री राणे यांच्यासमोर मांडल्या. काही अज्ञात व्यक्ती संस्थेच्या आवारात प्रवेश करीत असल्याने विद्यार्थ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. संस्थेच्या आवाराच्या कुंपणाची उंची वाढवावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. संस्थेत कॅन्टीन, बसेससारख्या साधन सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होते, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. यावेळी प्राचार्य कॅरोल नोरोन्हा यांची उपस्थिती होती.