आरोग्यमंत्राने करा पावसाचे स्वागत…

0
265

– डॉ. मनाली म. पवार
गणेशपुरी म्हापसा

आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोप व पित्तसंचयाचा काळ असतो. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. पोट आणि पोटाशी संबंधित बहुतेक आजार पावसाळ्यात होतात. थोडेसे दुर्लक्ष केले तरीही या ऋतूत आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यातच टायफॉइड, डायरिया, कावीळ, व्हायरल आणि सर्दी-पडसे हे आजार सर्वसामान्यपणे होताना दिसतात.

आले व सुंठ पावसाळ्यात वरदानच आहे. आयुर्वेदात सुंठीला ‘विश्‍वौषधा’ म्हटले आहे. पावसाळ्यात शक्य तेथे सुंठ व आले वापरावे. भाज्या, आमटी किंवा सूप बनवतानाही तिखटापेक्षा शक्यतो आल्याचाच वापर करावा. दूधात चिमूटभर सुंठीचे चूर्ण टाकावे. चहामध्ये आले किसून टाकावे.

तप्त झालेल्या धरणीमातेला पावसाळा गारवा आणतो व पावसामुळे मनुष्य व इतर प्राणीमात्रही सुखावतात खरे, पण त्याचबरोबर पावसाळा आजारांना आमंत्रण देतो. म्हणूनच पावसाळ्यात आरोग्य टिकविण्यासाठी काही आरोग्यमंत्र लक्षात घ्यावेत.
पावसाचे आगमन जरी झाले तरी दिवसभराचा उकाडा काही कमी झालेला नाही. हा काळ आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. म्हणूनच वाचकहो, काही आरोग्याचे कानमंत्र जाणून घेऊन त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करा.

पावसाच्या सरी कोसळू लागल्या की, वातावरणात एक सुखद गारवा पसरतो. मन उल्हसित होते. परंतु, या दिवसातील हवामान बदलांचा आरोग्यावर परिणाम होत असतो. तसेच साचलेल्या पाण्यामुळे अनेक रोगांचाही फैलाव होत असतो. या पार्श्‍वभूमीवर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत पचनक्रियाही कमकुवत बनलेली असते. त्यामुळे आहारामध्येही अनेक बदल करावे लागतात. मधुमेही, अस्थमाग्रस्त रुग्ण, वृद्ध व्यक्ती आणि मुलांनी या दिवसात प्रकृतीची अधिक देखभाल घेण्याची गरज असते.

आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोप व पित्तसंचयाचा काळ असतो. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत असते. पोट आणि पोटाशी संबंधित असणारे बहुतेक आजार पावसाळ्यात होतात. थोडेसे दुर्लक्ष केले तरीही या ऋतूत आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यातच टायफॉइड, डायरिया, कावीळ, व्हायरल आणि सर्दी-पडसे हे आजार सर्वसामान्य आहेत. पावसाळ्यातच पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते. यामुळे चिकुनगुनिया, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. खाणे-पिणे आणि जीवनशैली नियंत्रित करून आपण या आजारांपासून दूर राहू शकतो.
उन्हाळ्यात आपली पचनक्रिया कमकुवत झालेली असते. पावसाळ्यात भोजनासोबत पोटात जाणारे जीवाणू सक्रीय होऊन हळूहळू आजाराचे रूप घेतात आणि शरीरात त्याचे संक्रमणही पसरते. या काळात डासांमुळे होणार्‍या आजारांमुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारात अधिक ताप, थंडी वाजून ताप येणे, स्नायुंमध्ये वेदना होणे, अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसतात. या रोगांपासून बचाव करण्यासाठी घरात मच्छरांपासून बचाव करणारी साधने असणे गरजेचे असते.

– घराच्या आजुबाजूला पाणी साठलेले नसावे.
– पाणी साचले असेल तर रॉकेल किंवा कीटकनाशके फवारावीत.
– डास घालवण्यासाठी वनस्पती तेलाचाही वापर करावा.
– पावसाळ्यात सकाळ-संध्याकाळ हवा शुद्ध करणार्‍या आयुर्वेदिक धूपाने धूपन करावे. यासाठी वेखंड, सुंठ, ओवा, ऊद, कडुनिंबाची सुकवलेली पाने, जटामांसी यांचे मिश्रण वापरावे. याने जंतू नष्ट होतात व हवेत उबदारपणाही येतो.
या ऋतूत सावध राहावे. कारण, पावसाळ्यात कॉलरा हा एक सर्वसाधारणपणे आढळणारा आजार आहे. प्रदूषित पाण्यापासून होणारा हा आजार आपल्या पचनक्रियेवर परिणाम करतो. या आजारात तीव्र अतिसार होतो. उलट्या होतात. यामुळे हळूहळू शरीरातील पाणी कमी होत जाते. रुग्णाला डिहायड्रेशन होते. त्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की कॉलराची साथ येते.
– या आजारापासून बचाव करण्यासाठी घर आणि घराभोवताली स्वच्छता ठेवावी. नेहमी स्वच्छ पाणी प्यावे.
– याच ऋतूत उकळलेले पाणी पिणे अधिक लाभदायक ठरते.
– पावसाळ्यात एकंदरच हवा आणि पाण्यामधून जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने प्यायचे पाणी निश्‍चितच गाळून आणि उकळूनच प्यावे. आयुर्वेदिक ग्रंथात तर पावसाळ्यात पाण्याचा काढा करून घेण्यास सांगितले आहे. एकंदरीत पाणी खूप उकळून घ्यावे व शक्यतो गरम असतानाच प्यावे.
– उलटी होत असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी जास्त पाणी प्यावे व त्याचबरोबर ओ.आर्.एस्.चे मिश्रणही प्यावे.
– उलट्या होत असल्यास साळीच्या लाह्या कोरड्याच खाव्यात. डाळींबाचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा पीत राहावे.
– पावसाळ्यात खाण्या-पिण्याच्या बाबतीत थोडेसे दुर्लक्ष झाले तर टायफॉईड या आजाराची तक्रार उद्भवू शकते. यामध्ये यकृतापर्यंत संक्रमण पोहचते. दूषित पाणी व अन्नामुळे हा आजार होतो. टायफॉइड हा वेगाने पसरतो. यामध्ये अधिक जास्त ताप, पोटदुखी, डोकेदुखी, पोट साफ न होणे यांसारखी लक्षणे दिसतात. या आजारावर जवळपास दोन आठवड्यांपर्यंत इलाज करावा. अर्धवट चिकित्सोपचार केल्यास आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते.
थंडी, ताप आणि खोकला हा आजारदेखील या ऋतूंत होत असतो. हा आजार कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो.
या दिवसात पावसामुळे उष्णता कधी वाढते आणि कधी कमी होत असते. परिणामी शरीराचे संतुलन बिघडते. अशातच पावसात भिजण्यास आजारांचा धोका अधिक असतो. यामध्ये लागोपाठ शिंका येणे, घशात खाज सुटणे, घसा दुखणे, ताप येणे इ. प्रमुख लक्षणे दिसतात.
– वृद्ध व्यक्तींनी तसेच लहान मुलांनी पावसात भिजू नये.
– घरात अथवा ऑफिसमध्ये एअरकंडिशनर असल्यास तो सामान्य तापमानाला सेट करावा.
– या दिवसात आईस्क्रीम खाऊ नये.
– आजाराची लक्षणे दिसू लागली तर रात्री झोपताना गरम दुधात हळद टाकून ते दूध प्यावे.
– सर्दी, घसा दुखणे, भूक न लागणे, तापासारखे वाटणे असा त्रास होतो आहे, असे लक्षात आल्यावर लगेचच सितोपलादी चूर्ण गरम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावे. हे चूर्ण अगदी लहान मुलांनाही पाव चमचा मधाबरोबर चाटण द्यायला हरकत नाही.
– मधुमेह असणार्‍या रुग्णांनीदेखील या ऋतूत काळजी घ्यावी. कारण त्यांच्या पायांना जखम होण्याचा धोका वाढतो. ओल्या मातीत पाय ठेवल्यास त्यामध्ये असलेले काचेचे तुकडे, किळ, खिळ्यांमुळे बरेचदा जखमा होतात. म्हणूनच मधुमेही व्यक्तींनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी. अनेक प्रकारचे जीवाणूदेखील या ऋतूंत वाढतात.
– मधुमेही व्यक्तींनी संरक्षणासाठी तिळाच्या तेलाने पायांना मालीश करावी. हे तेल जीवाणूनाशक आहे.
पावसाळ्यात अस्थमाचा आजारही बळावतो. दमट हवामान असल्यामुळे घरात बुरशीची वाढ होते. चामड्याच्या बुटात अथवा चपलांमध्येदेखील बुरशी वाढते. यामुळे अस्थमा वाढू शकतो. यापासून बचाव करण्यासाठी फर्निचर आणि चामड्याच्या वस्तूंची नियमित स्वच्छता करावी, जेणेकरून बुरशी वाढणार नाही.
– दम्याचा त्रास असणार्‍यांनी बृहत् श्‍वासचिंतामणीसारखे औषध मधाबरोबर घ्यावे.
– खोकला, दमा असणार्‍यांनी विशेषतः छातीत कफ वाढून राहिला असल्यास वासावलेह हा अवलेह सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
आमवात, संधिवात असणार्‍यांनी पावसाळा सुरू होताच रोज सकाळी सुंठ, गूळ व तूप यांपासून तयार केलेली सुपारीच्या आकाराची गोळी घ्यावी.
– सांध्यांना नियमित तेल लावून शेकावे.
– वेदनाशामक मलम लावल्याने तात्पुरते बरे वाटते म्हणून सांध्यांचे स्नेहन व्हावे व झालेली झीज भरून यावी यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या सिद्ध तेलांचा वापर करावा.
सांधेदुखी व दम्याचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी त्रास सुरू होण्याची वाट न बघता पावसाळ्याच्या चाहुलीबरोबरच योग्य ते उपचार सुरू करावे व ऋतू संपेपर्यंत उपचार सुरू ठेवावेत, जेणेकरून त्रास होणार नाही व झाला तरी सुसह्य होईल.
– पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटणे, गॅसेस होणे, अपचन या सर्व तक्रारींवर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण जेवणाच्या सुरवातीला घासभर भात आणि तुपाबरोबर मिसळून खावे व नंतर जेवण जेवावे.
– पोटाचे रोग उदा. मलावरोध, गॅसेस, ऍसिडिटी, मूळव्याध यापैकी काहीही त्रास होत असल्यास जेवणानंतर अविपत्तीकर चूर्ण, इसबगोल इ. द्रव्यांपासून तयार केलेले चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.
– काहीही त्रास होत नसला तरी शरीरात वाढलेला वात कमी होण्यासाठी व स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी आयु. औषधांनी विद्ध तेलाचा अभ्यंग करावा.
– रोज रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने सर्वांगाला वातशामक आयुर्वेदिक तेल लावावे.
– पंचकर्मापैकी वात कमी करण्यासाठी बस्ती घ्यावी.
– शरीरशक्तिनुसार आयुर्वेदिक पद्धतीने बाष्पस्नान घ्यावे.
– पावसाळ्यात हवेत गारवा असल्याने व शरीरातील वातदोष वाढलेला असल्याने गरम पाण्यानेच स्नान करावे. स्नानाच्या वेळी साबणाऐवजी स्निग्ध द्रव्यांपासून तयार केलेल्या उटण्याचा उपयोग करावा. उदाय अनंतमूळ, जटामासी, बेसन व साय किंवा दूध यांचे मिश्रण वापरावे. याने त्वचा कोरडी तर पडत नाहीच पण सतेज आणि मऊ राहते.

पावसाळ्यातील मुख्य तत्त्व –
या ऋतूंत असे अन्न सेवन करावे जे वात, पित्त, कफ या तीन्ही दोषांना संतुलित ठेवेल. तसेच या ऋतूंत अग्नी प्रदीप्त करणारे हलके अन्न सेवन करावे.
पावसाळ्यातील आहार –
– ताजे, गरम आणि हलके अन्न सेवन करावे.
– पचायला जड व तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
– शरीरात वात वाढवणारे मटार, हरभरा, पावटा, चवळी, छोले, राजमा अशी कडधान्ये तसेच शिळे अन्न खाऊ नये.
– दही, चीज, पनीर, पचायला जड मिठाया खाऊ नयेत.
– पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असल्याने कमी खावे. दिवसातून दोन वेळा व भूक लागेल एवढेच जेवावे. एखादा पदार्थ जास्त आवडला म्हणून पोटभरून खाऊ नये व भूक नसताना खाऊ नये.
– ज्यांना फारशी भूक लागत नाही त्यांनी या काळात एकभुक्त राहावे. दुपारी साधे जेवण जेवून रात्री काहीही खाऊ नये किंवा रात्री फक्त मुगाचे कढण, पालकाचे सूप, रव्याची पातळ लापशी असा द्रवाहार घ्यावा.
– इतरांनी कमीत कमी आठवड्यातून एकदा रात्री काहीही न खाता पचनसंस्थेला विश्रांती द्यावी.
– पालेभाज्या वापरण्यापूर्वी खूप पाण्याने काळजीपूर्वक धुवून घ्याव्या. पालेभाज्यांवर शरीरघातक रसायने फवारलेली नसल्याची तसेच या भाज्या चांगल्या पोसल्या गेल्या असल्याची खात्री करून घ्यावी.
– भाज्या शिजवूनच खाव्या. कच्च्या, सलाद करून किंवा त्यांचा रस काढून वापरू नयेत.
– या काळात विविध संसर्गजन्य रोग होण्याचा संभव वाढत असल्याने बाहेरील तसेच उघड्यावरच्या खाद्य-पेयांचा वापर टाळावा.
– तांदळाचा भात, मूग-तांदळाची खिचडी, गव्हाचा फुलका, ज्वारी व बाजरी एकत्र करून केलेली भाकरी असा आहार असावा.
– कडधान्यापैकी मूग, तूर, कुळीथ वापरावेत.
– भाज्यांमध्ये दुधी, दोडका, घोसाळी, पडवळ, तोंडली, कोहळं, बटाटा, काकडी, चुका, माठ यांचे सेवन करावे.
– मंद झालेल्या अग्नीला प्रज्वलीत करण्यासाठी भाजी-आमटी बनवताना जिरे, हिंग, धने, दालचिनी, तमालपत्र, आले, हळद, आमसूल असा मसाल्यांच्या पदार्थांचा वापर योग्य प्रमाणात करावा.
जेवताना तोंडाला चव यावी व अन्न पचनास मदत व्हावी यासाठी कोथिंबिर, पुदिना, लिंबू, ओले खोबरे, आले यापासून तयार केलेली ताजी हिरवी चटणी खावी.
– आले, आंबे हळद, ओली हळद, मीठ, लिंबू यांपासून तयार केलेले लोणचे खावे.
– दुपारी जेवणानंतर ताज्या ताकात आले, ओव्याची पूड, चिमुटभर हिंग व काळे मीठ टाकून घ्यावे.
– जेवणानंतर मुखवास म्हणून ओवा, बडीशेप, धन्याची डाळ यांचे सैंधव मिठासह भाजून केलेले मिश्रण वापरावे.
– आले व सुंठ पावसाळ्यात वरदानच आहे. आयुर्वेदात सुंठीला ‘विश्‍वौषधा’ म्हटले आहे. पावसाळ्यात शक्य तेथे सुंठ व आले वापरावे. भाज्या, आमटी किंवा सूप बनवतानाही तिखटापेक्षा शक्यतो आल्याचाच वापर करावा.
– दूधात चिमूटभर सुंठीचे चूर्ण टाकावे. चहामध्ये आले किसून टाकावे.
अशा प्रकारे वर सांगितलेले सर्व आरोग्यमंत्र लक्षात घेऊ न त्यांचे आचरण केल्यास खर्‍या अर्थाने पावसाच्या आगमनाचे स्वागतही होईल व संपूर्ण पावसाळा आरोग्यमय पद्धतीने पावसाचा आनंद उपभोगता येईल.