आरसीबीचा १६ धावांनी पराभव

0
145

>> तब्बल सात वर्षांनी दिल्ली ‘प्ले ऑफ’मध्ये

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर १६ धावांनी मात करुन दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमाच्या प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. काल मोसमातील ४६व्या सामन्यात दिल्लीने विजयासाठी दिलेले १८८ धावांचे आव्हान बंगलोरला पेलविले नाही. त्यांना केवळ १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह दिल्लीची तब्बल ७ वर्षांची प्रतीक्षा फळाला आली. २०१२ साली ‘दिल्ली’ फ्रेंचायझी शेवटच्या वेळी प्ले-ऑफसाठी पात्र ठरली होती.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोरचा कर्णधार विराट कोहली व यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल जोडीने आक्रमक सुरुवात करत पहिल्या गड्यासाठी ६३ धावा करत विजयासाठी भक्कम पाया रचला. या दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवत दिल्लीवर दबाव आणला, मात्र रबाडाने पटेलला माघारी धाडले. यानंतर ठराविक अंतराने विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, शिवम दुबे, हेन्रिक क्लासें हे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकांत गुरकिरत मान आणि मार्कुस स्टोईनिस जोडीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. भक्कम पाया रचूनही विजयाचा कळस रचण्यात पुन्हा एकदा बंगलोरचे फलंदाज कमी पडले. दिल्लीकडून अमित मिश्रा आणि कगिसो रबाडाने तत्येकी २ तर इशांत शर्मा, अक्षर पटेल, शर्फेन रुदरफर्ड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

तत्पूर्वी, शिखर धवन-कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक आणि तळातल्या फळीत रुदरफर्ड आणि अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, दिल्ली कॅपिटल्स संघाने १८७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीच्या संघाने घेतला. विराट कोहली सलग नवव्या सामन्यात नाणेफेक हरला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी चांगली सुरुवात केली. मात्र मधल्या षटकांत बंगलोरने पुनरागमन करत दिल्लीच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र अखेरच्या षटकांत रुदरफर्डने बंगलोरच्या गोलंदाजीचे पिसे काढत दिल्लीला आव्हानात्मक लक्ष्य गाठून दिले.

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ कालच्या सामन्यातही फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. उमेश यादवने त्याला माघारी धाडले. मात्र यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दुसर्‍या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शिखरने यंदाच्या मोसमातील आपले पाचवे व एकूण ३७वे आयपीएल अर्धशतक लगावले. कर्णधार अय्यरने यंदाचे तिसरे व एकूण १३वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. परंतु, अर्धशतक झळकावल्यानंतर धवन आणि अय्यर तात्काळ माघारी परतले.यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांवर अंकुश ठेवत बंगलोरने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या षटकांत रुदरफर्ड आणि पटेलने फटकेबाजी करत संघाला १८७ धावांचा पल्ला गाठून दिला. बंगलोरकडून युजवेंद्र चहलने २, तर उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दिल्लीने या सामन्यासाठी संघात एक बदल करताना ख्रिस मॉरिसच्या जागी संदीप लामिछानेला खेळविले तर बंगलोरने मोईन अली, टिम साऊथी व अक्षदीप नाथ यांच्या जागी हेन्रिक क्लासें, शिवम दुबे व गुरकिरत सिंगला ‘अंतिम ११’मध्ये सामावले.

धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. पटेल गो. यादव १८, शिखर धवन झे. सुंदर गो. चहल ५० (३७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), श्रेयस अय्यर झे. कोहली गो. सुंदर ५२ (३७ चेंडू, २ चौकार, ३ षटकार), ऋषभ पंत पायचीत गो. चहल ७, कॉलिन इंग्राम झे. सुंदर गो. सैनी ११, शर्मेन रुदरफर्ड नाबाद २८ (१३ चेंडू, १ चौकार, ३ षटकार), अक्षर पटेल नाबाद १६, अवांतर ५, एकूण २० षटकांत ५ बाद १८७.
गोलंदाजी ः उमेश यादव ४-०-३९-१, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२९-१, युजवेंद्र चहल ४-०-४१-२, नवदीप सैनी ४-०-४४-१, मार्कुस स्टोईनिस ३-०-२४-०, शिवम दुबे १-०-५-०

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः पार्थिव पटेल झे. पटेल गो. रबाडा ३९ (२० चेंडू, ७ चौकार, १ षटकार), विराट कोहली झे. रुदरफर्ड गो. पटेल २३, एबी डीव्हिलियर्स झे. पटेल गो. रुदरफर्ड १७, शिवम दुबे झे. धवन गो. मिश्रा २४, हेन्रिक क्लासें झे. पंत गो. मिश्रा ३, गुरकिरत सिंग झे. पंत गो. शर्मा २७, मार्कुस स्टोईनिस नाबाद ३२, वॉशिंग्टन सुंदर झे. अय्यर गो. रबाडा १, उमेश यादव नाबाद ०, अवांतर ५, एकूण २० षटकांत ७ बाद १७१
गोलंदाजी ः इशांत शर्मा ४-०-४०-१, अक्षर पटेल ४-०-२६-१, संदीप लामिछाने ३-०-३६-०, कगिसो रबाडा ४-०-३१-२, अमित मिश्रा ४-०-२९-२, शर्फेन रुदरफर्ड १-०-६-१

आरसीबीचा शंभरावा पराभव
टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पराभव पत्करणार्‍या फ्रेंचायझी-संघामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाव समाविष्ट झाले आहे. काल रविवारी बंगलोरने टी-ट्वेंटीमधील आपला शंभरावा पराभव पत्करावा लागला. डर्बीशायर (१०१) व मिडलसेक्स (११२) हे काऊंटीतील दोन संघ बंगलोरपेक्षा पराभवांच्या बाबतीत आघाडीवर आहेत.