आरबीआयने व्याजदर वाढविल्याने विविध कर्जे महागण्याची शक्यता

0
109

अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुमारे साडेचार वर्षांच्या कालावधीनंतर व्याज दरांमध्ये वाढ केल्याने त्याचा फटका प्रामुख्याने गृह खरेदी कर्ज घेण्याच्या विचारात असलेल्या तसेच सध्याच्या गृह कर्जदारांनाही बसणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने आरबीआय ज्या दराने बँकांना वित्त पुरवठा करत असते त्या व्याजाचे दर तथा रेपो रेट पाव टक्क्याने वाढवून ६.२५ टक्के एवढा केला आहे.

तसेच बँका ज्या दराने आपल्याकडे असलेला अतिरिक्त निधी आरबीआयकडे जमा करतात त्यावर (म्हणजे रिव्हर्स रेपो) बँकांना ६ टक्के व्याज मिळणार आहे. वरील समितीतील दोन सदस्यांनी गेल्या एप्रिलमध्ये पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती. काल झालेल्या या समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी त्या शिफारशीला मान्यता देत शिक्कामोर्तब केले.

या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या कर्जांचे दर वाढण्याची शक्यता आहे. गृह-वाहन तसेच अन्य वैयक्तिक कर्जांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यपणे आरबीआयने व्याज दरांमध्ये वाढ केल्यानंतर हा वाढीव बोजा बँका ग्राहकांवर टाकत असतात. अशा वेळी सर्वात मोठी सरकारी बँक प्रथम या वाढीची अंमलबजावणी करते. त्यानंतर सर्व बँकांचे कर्जही महाग होते.
गेल्या आठवड्यातच स्टेट बँक, पंजाब नॅशनल व आयसीआयसीआय या बँकांनी प्रमाण कर्जदर तथा एमसीएलआर ०.१ टक्क्यांनी वाढवला होता. बहुतेक सर्व प्रकारची कर्जे या एमसीएलआरशी जोडलेली असतात व त्यात होणारे बदल कर्ज व्याज किंवा हप्त्यांत उमटतात. त्यामुळे हप्त्याची रक्कम वाढते.