आरपीआय गोव्यातील दोन्ही जागा लढवणार

0
116

डिचोली (न. प्र.)
रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) गोवा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक दोन्ही जागांवर लढवणार आहे. पुढील महिन्यात दोन दिवशीय अधिवेशन आयोजित करून विविध विषय मांडण्यात येणार असून अनेक प्रश्न आज भेडसावत असल्याने मागासवर्गीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या बाबत राज्यभरात जागृती करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे गोवा अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडेकर, सुरेश हसोटीकर, प्रवक्ते अमित कोरगावकर, सचिव प्रकाश नाईक, संतोष साळकर, लक्ष्मण वालावलकर, यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोपा विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, आंबेडकर भवन उभारण्यात यावे, म्हापसा बाजारपेठेत बांबू कारागिरांना स्वतंत्र शेड उभारण्यात यावी, बसस्थानक परिसरातील मटका व गुटका यावर बंदी घालावी, विधानसभेत आंबेडकरांना सन्मान द्यावा, मागासवर्गीयांसाठी दोन सुसज्ज हॉस्टेल उभारण्यात यावीत, प्रत्येक गावात स्मशानभूमी उभारावी, गाव तंटामुक्त करावीत आदी अनेक बाबतीत लक्ष देण्याची गरज असल्याचे या वेळी पदाधिकार्‍यांनी सांगितले.