आरटीओ कार्यालयात जळलेली कागदपत्रे महामार्गाच्या बाजूला

0
91

>> गैरवापर होण्याची भीती

येथील कदंब बसस्थानकावरील आग दुर्घटनेत वाहतूक कार्यालयातील जळलेला दस्तावेज ओल्ड गोवा येथे कदंब पठारावर रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला आहे. उघड्यावर टाकण्यात आलेल्या कागदपत्रांत काही चांगल्या कागदपत्रांचा समावेश असल्याचे नागरिकांना आढळून आले आहे. यामुळे या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त होत आहे. कदंब बसस्थानकावरील सुपर मार्केटला लागलेली आग वाहतूक कार्यालयात पसरली होती. या आगीमुळे कार्यालयातील कागदपत्रे जळली होती. साफसफाई करताना वाहतूक कार्यालयातील आग दुर्घटनेत जळलेली कागदपत्रे पणजी – ओल्डगोवा मार्गावरील कदंब पठारावरील रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आली आहेत.

रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या कागदपत्रांत जळलेले आरसीबुक व इतर कागदपत्रांचा समावेश आहे. आगीत सापडलेल्या कागदपत्रांची योग्य छाननी केली असती तर अनेक कागदपत्रे सुस्थितीत सापडली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी अर्धवट जळलेल्या कागदपत्रांकडे गांर्भियाने लक्ष दिलेले नाही. वाहतूक खात्याने आगीत अर्धवट जळलेल्या कागदपत्रांची योग्य विल्हेवाट लावायला हवी होती. रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या कागदपत्रांमधून चांगली कागदपत्रे शोधून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.