आरटीओ कार्यालयातील ‘त्या’ कागदपत्रांची विल्हेवाट

0
165

>> सर्व दस्तावेज सुरक्षित : स्पष्टीकरण

ओल्ड गोवा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बेवारस स्थितीत टाकण्यात आलेल्या पणजी वाहतूक कार्यालयातील कागदपत्रांची अखेर काल विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, वाहतूक कार्यालयातील सर्व दस्तावेज संगणकीकरणामुळे सुरक्षित असून जनतेने घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्टीकरण खात्याने केले आहे.

ओल्ड गोवा येथे राष्ट्रीय महामार्गालगत पणजी वाहतूक कार्यालयातील जळलेली कागदपत्रे टाकण्यात आली होती. कदंब बसस्थानकावरील २ ऑक्टोबर रोजीच्या आग दुर्घटनेत वाहतूक कार्यालयातील कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी पडली होती. दुर्घटनेनंतर जळलेली कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूचनेप्रमाणे ठेकेदाराने ओल्ड गोवा येथे रस्त्याच्या बाजूला नेऊन टाकली होती. त्यात काही चांगली कागदपत्रेही होती. या प्रकाराबाबत वृत्तपत्रे आणि सोशल मिडियावरून आवाज उठविण्यात आल्यानंतर वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी या प्रकाराची दखल घेत काल सकाळी रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या कागदपत्रांची योग्य विल्हेवाट लावण्याची सूचना केली. ठेकेदाराला योग्य माहिती देण्यात न आल्याने त्याने मिळेल त्या जागेत जळलेली कागदपत्रे नेऊन टाकली होती.