आय-लीगचे भवितव्य अंधारात

0
118

>> एएफसी चॅम्पियन्स लीगची जागा ‘आयएसएल’ला

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) मंगळवारी एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत भारतासाठी असलेली जागा २०१९-२० मोसमापासून इंडियन सुपर लीग (आयएसएल) विजेत्या संघाला देण्याची विनंती केली आहे. आय-लीग विजेत्या संघासाठी असलेली ही जागा आयएसएल विजेत्याला देण्याचे ठरवून महासंघाने आय-लीगची अवनती निश्‍चित केली. आयएसएलला भारताची प्रथम दर्जाची फुटबॉल स्पर्धा बनविण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी उच्चस्तरीय पथक पाठविण्याची विनंती महासंघाने एएफसीकडे केली आहे. महासंघ, आयएसएल संघ, आय लीग संघ व एफएसडीएल यांना विश्‍वासात घेऊन सदर आराखडा तयार केला जाणार आहे.

महासंघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेची सुरुवात करताना २०१० साली आपले व्यावसायिक भागीदार फुटबॉल स्पोटर्‌‌स डेव्हलपमेंट यांच्यासोबत मास्टर राईट्‌स करार केला होता. या करारातील अटींनुसार आयएसएलची लोकप्रियता, प्रेक्षकसंख्या आय लीगपेक्षा जास्त ठरल्यास पाच वर्षांनंतर आयएसएलला ‘प्रथम दर्जा’ देण्यासंबंधीचा उल्लेख होता. आयएसएलमधील फ्रेंचायझींनी एएफसीच्या क्लब परवाना निकष, ग्रासरुट तसेच युवा विकास कार्यक्रमांची पूर्तता करण्याची तयारी दर्शवल्याने तसेच सर्व बाबतीत आयएसएलने आयलीगवर कुरघोडी केल्यानेच आयएसएलला प्रथम दर्जा देण्याचे ठरविण्यात आल्याचे महासंघाने पत्रक जारी करून स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली येथे महासंघाच्या कार्यकारिणी बैठकीत झालेल्या या निर्णयाला आय लीग क्लब आव्हान देणार आहेत. पूर्वाश्रमीच्या फेडरेशन कप स्पर्धेच्या विजेत्याला मिळणारी ‘एएफसी कप’ जागा आयएसएल विजेत्याला देण्यात येणार असे आय-लीग क्लबांना वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात महासंघाने एएफसी चॅम्पियन्स लीगची जागा देत आय लीगला संकटात टाकले आहे. चेन्नई सिटी एफसी हा आय लीग विजेता संघ ‘२०२० एएफसी चॅम्पियन्स लीग प्लेऑफ’ खेळण्याच्या तयारीत असताना महासंघाने घेतलेला निर्णय अचंबित करणारा ठरला आहे.

सोमवारी मोहन बागान, एफसी गोवा, ईस्ट बंगाल, चर्चिल ब्रदर्स, गोकुळम केरला एफसी, मिनर्वा पंजाब एफसी व ऐझवाल एफसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महासंघाच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली होती. किमान पुढील दोन वर्षे तरी आय लीग स्पर्धा सुरू राहणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे.