आयुष मंत्रालयाचा तीन वर्षांत १२ देशांसोबत करार

0
111
औषधी वनस्पती शैक्षणिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, लायन्स क्लबच्या पदाधिकारी श्रीमती फर्नांडिस, आदित्य हरमलकर, डॉ. जॉय परेरा, मोनिका सावंत, प्रमोद सावंत व लायन्स क्लबचे पदाधिकारी फर्नांडिस.

पणजी
केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना करून गत चार वर्षात वसुधैव कुटुम्बकम या भावनेने जागतिक स्तरावर सर्वांसाठी भारतीय उपचार पद्धती पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. योग हे त्याचेच एक उदाहरण आहे. तसेच आयुष मंत्रालयाने तीन वर्षात १२ देशांसोबत यासंबंधीचे करार केले असून ४० देशात ५८ माहिती केंद्रे उभी केली आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी पणजी येथे दिली.
लायन्स क्लब इंटरनॅशनल डि. ३१७-बी व आयुर्वेदिक नॅचरल हेल्थ सेंटर प्रा. लि., गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींचे शैक्षणिक प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाईक बोलत होते. भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणूनच पहिले गेले आणि त्यातून जाणीवपूर्वक स्थानिक औषधी उपचार पद्धती राबविली गेली. आयुर्वेद हजारो वर्ष जुनी, प्राणी तसेच मानवाच्या माध्यमातून तपासलेली उपचार पद्धती आहे. निसर्गाने आपल्याला जन्माला घातले आहे आणि पंचतत्वापासून आपले शरीर बनले आहे. त्यामुळे निसर्गावर आधारित आयुर्वेद आपल्या शरीराला लगेच लागू पडते, असे नाईक यावेळी म्हणाले. आयुर्वेद आपल्याला निसर्गासोबत राहायला शिकवते. आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून राज्यातील नागरिकांना आपल्या ‘किचन गार्डन’ मध्ये औषधी वनस्पती वाढविण्यासाठी प्रेरित केले जात आहे, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल डि. ३१७-बी च्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर मोनिका सावंत, अतिथी वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते व वनस्पती आधारित आहार तज्ज्ञ आदित्य हरमलकर आणि आयुर्वेद तज्ज्ञ व सहाय्यक प्राध्यापक डॉ. जॉय परेरा हे मान्यवर उपस्थित होते.