आयुर्वेदीय ईमर्जन्सी उपचार

0
1541
  • डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

आयुर्वेदाचा हेतू रोगाला मुळातून काढण्याचा असतो. त्यात योजलेले उपचार अत्यंत सोपे, त्यापासून काही अन्य त्रास उत्पन्न न होणारे असल्यामुळे आयुर्वेदामध्ये लगेच गुणकारी ठरतील असे अनेक उपाय सुचवलेले आहेत.

इंग्रजीत एक म्हण आहे- ‘स्टिच इन टाईम सेव्ह्ज् नाईन्’ – वेळच्या वेळी केलेला छोटा व योग्य उपचार एखाद्या मोठ्या रोगापासून किंवा एखाद्या शस्त्रक्रियेपासून वाचवू शकतो. त्याचप्रमाणे तो दीर्घकाळपर्यंत चालणार्‍या रोगाला किंवा दीर्घकाळाच्या रोगामुळे होणार्‍या खर्चापासून वाचवू शकतो.

असा एक काळ होता ज्या काळी डॉक्टरांना ‘देवदूत’ म्हणायचे. देवदूतच का देवाचे दुसरे रूपच म्हणायचे. एकदा रुग्णाला डॉक्टरच्या हातात सोपवला की त्याचे जगणे-मरणे डॉक्टरांच्या हातात देऊन नातेवाईक-कुटुंबीय निश्‍चिंत व्हायचे. आजारातून बाहेर पडला म्हणजे रुग्ण जगला तर डॉक्टरांचे उपकार मानायचे, त्यांचे ऋणी रहायचे व रुग्ण मेला तर रुग्णाच्या व स्वतःच्या नशिबाने साथ दिली नाही म्हणून रुग्णाच्या मरणाची सगळी जबाबदारी स्वतःवर घ्यायचे. पण… आता… चित्र काहीसे वेगळेच आहे. त्याला विविध कारणे असतील. एखादा रुग्ण दगावला तर त्याला सर्वस्वी डॉक्टर जबाबदार असतो का? डॉक्टरला रुग्णाच्या मरणाचा जबाबदार ठरवून मारहाण करणे, शिव्या-शाप देण्याने कोणता हेतू साध्य करायचा असतो?
अशा अवस्थेत ‘ईमर्जन्सी’ म्हणून आणलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी का तपासावे? शेवटी प्रत्येकाला स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे. पण या विषयाची चर्चा आपल्याला करायची नाही. ‘ईमर्जन्सी’ म्हणजे काय ते पाहूया.

‘ईमर्जन्सी उपचार’ म्हणजे काय….
वेळ न दवडता लागलीच करायचे उपचार म्हणजे ‘ईमर्जन्सी उपचार’ असतात. ‘ईमर्जन्सी’ म्हणजे ‘तातडी’, ‘तात्काळ’, ‘आणीबाणी’. पण सगळ्यांना समजणारा शब्द म्हणजे ‘ईमर्जन्सी’ हाच आहे. कोणत्याही प्रकारचे आजारपण किंवा दुखापत ज्याच्याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास ते आवाक्याबाहेर जाऊन रुग्णाच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, त्यामुळे त्याठिकाणी तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण होते.

आयुर्वेदाच्या बाबतीत अनेकांच्या मनात हा गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधांचा मुळात गुणच उशीरा येतो. मग ईमर्जन्सी उपचारामध्ये औषधे उपयोगी पडतील का? आयुर्वेदिक डॉक्टर्स ‘ईमर्जन्सी’ हाताळू शकतात का? शरीरातील क्रियात्मक बिघाडांमुळे झालेले आजार बरे होण्यासाठी त्या त्या प्रकृतीनुसार, शक्तीनुसार, जीवनशैलीनुसार, मानसिकतेनुसार कमी-अधिक वेळ द्यावाच लागतो. मात्र काही तक्रारी अशा असतात की त्यावर तातडीचे उपचार करावे लागतात. आयुर्वेदिक संहितामध्ये असे बरेच उपाय सांगितले आहेत.
आयुर्वेदाचा हेतू रोगाला मुळातून काढण्याचा असतो. त्यात योजलेले उपचार अत्यंत सोपे, त्यापासून काही अन्य त्रास उत्पन्न न होणारे असल्यामुळे आयुर्वेदामध्ये लगेच गुणकारी ठरतील असे अनेक उपाय सुचवलेले आहेत.

प्रत्येक अवयवागणिक काय करावे, उदा. कान दुखल्यास काय करावे? सुरीने कापले असल्यास काय करावे, नाकातून रक्त येत असल्यास काय करावे, मधमाशी, उंदीर, कुत्रा चावल्यास लागलीच काय करावे.. इत्यादी.. आयुर्वेदात सांगितले आहे.
आयुर्वेदात छोट्या छोट्या व अगदी हाताशी असणार्‍या वस्तूंचा उपयोग करून घेऊन त्यातून मार्ग दाखवलेला आहे. रस्त्याच्या कडेला आपल्या आजुबाजूला सापडणार्‍या रुईच्या पानांनी छाती शेकल्यास प्रथमावस्थेततील सर्दी-खोकला बरा होतो. असे सोपे व प्रभावी आयुर्वेद उपचार सांगितले आहेत.
इलाज करताना तो अगदी सुरक्षित असला पाहिजे. अशा उपचारांचा कोणताही दुष्परिणाम असता कामा नये. त्या उपचारांचा फायदा अगदी २५% झाला तरी हरकत नाही पण नुकसान मात्र मुळीच होता कामा नये. व्याधी ‘ईमर्जन्सी’ला येऊ नये म्हणून घेतलेली काळजी म्हणजे ईमर्जन्सी उपचार.

इंग्रजीत एक म्हण आहे- ‘स्टिच इन टाईम सेव्ह्ज् नाईन्’ – वेळच्या वेळी केलेला छोटा व योग्य उपचार एखाद्या मोठ्या रोगापासून किंवा एखाद्या शस्त्रक्रियेपासून वाचवू शकतो. त्याचप्रमाणे तो दीर्घकाळपर्यंत चालणार्‍या रोगाला किंवा दीर्घकाळाच्या रोगामुळे होणार्‍या खर्चापासून वाचवू शकतो.
आयुर्वेदामध्ये असे बरेच उपाय सांगितलेले आहेत. काही वैद्यांच्या अनुभवातून सिद्ध होत जातात. आपण अशाच उपायांची माहिती करून घेऊ…

१) मूळव्याध – यामध्ये अचानक रक्त पडत असेल तर लगेच घाबरून न जाता किंवा तसेच अंगावर न काढता…
– दूर्वांच्या रसाबरोबर शतधौत घृत (१०० वेळा फेटलेले, धुतलेले तूप) गुदभागी लावावे.
– चमचाभर ताजे, घरचे लोणी, नागकेशर चूर्ण व खडीसाखर हे मिश्रण घेतल्याने मूळव्यादीमुळे पडणारे रक्त थांबते.
– चांगेरी, नागकेशर व नीळकमळ यांनी संस्कारित लाह्या पाण्यामध्ये शिजवून तयार केलेली पेज मूळव्याधीतून होणारा रक्तस्राव ताबडतोब थांबवते.
– नारळाची शेंडी जाळून राख बनवा. तीन-तीन ग्रॅम ही राख सकाळ, दुपार, संध्याकाळ अनशापोटी ताकाबरोबर घ्या. एकदा घेतल्यावरच मूळव्याध बरा होतो. हा प्रयोग मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असल्यास उपयुक्त ठरतो.
– एक कप गाईचे दूध पिण्यायोग्य गरम करून त्यात अर्धे लिंबू पिळून दूध नासायच्या आत ताबडतोब प्या. हा प्रयोगसुद्धा रक्तार्सातील रक्तस्राव ताबडतोब बंद करतो.
– अर्धा ग्रॅम देशी कापूर एका केळ्याच्या तुकड्यात ठेवून अनशापोटी गिळून टाका. एकाच मात्रेत रक्तस्राव बंद होतो.

२) उचकी – कधी कधी उचकी लागण्याचा अनुभव सगळ्यांनाच असतो. एखादा घोट पाणी पिण्याने किंवा काही क्षण श्‍वास रोखून धरण्याने सहसा उचकी बंद होते. मात्र जेव्हा वारंवार पाणी पिऊनही उचकी थांबत नाही तेव्हा बेचैन वाटते. अशावेळी काय कराल…..
– मोरपिसाची राख, मध व तुपात मिसळून चाटविल्याने उचकी लगेच थांबते.
– लोध्राच्या लाकडाची राख तूप-मधातून मिसळून चाटण्यास द्यावी.
– महाळुंगाच्या रसात सज्जीक्षार व मध मिसळून घेण्याने उचकी लगेच बंद होते.
– नारळाची शेंडी जाळून केलेली राख थोड्या पाण्यात १-१ ग्रॅम घेऊन सेवन केल्यास विशेष लाभ होतो.

३) वातरक्त – या रोगात सांध्यांमध्ये, विशेषतः सुरवातीला पायांच्या बोटांच्या सांध्यांत, घोट्याच्या जागी तीव्र वेदना होतात. त्याठिकाणी सूज येते, त्वचा लालसर रंगाची होते आणि तो भाग संवेदनशील होतो. या त्रासावर लगेच बरे वाटण्यासाठी काही ना काही उपाय करणे गरजेचे असते. यासाठी पुढील उपाय करता येतात.
– पिंपळवृक्षाच्या सालीचा काढा मधाबरोबर घेण्याने त्रिदोषज वातरक्तसुद्धा शीघ्रतेने जिंकता येते.

४) शरीरातून कोठूनही रक्त जात असेल तर….
ते थांबवण्यासाठी तातडीने उपाय करावे लागतात. लघवीतून रक्त जात असल्यास व वेदनाही खूप असल्यास…
– शतावरी व गोक्षुर यांच्या काढ्याबरोबर सिद्ध केलेले दूध पिण्याने किंवा सालवण, पिठवण, मुदपर्णी, माषपर्णी यांच्या काढ्यासह संस्कारित केलेले दूध पिण्याने मूत्रावाटे जाणारे रक्त थांबते. व त्यामुळे होणार्‍या वेदना लगेच शांत होतात.

५) मासिक पाळीत अतिरक्तस्राव झाल्यास…
– दूर्वास्वरस २० मिलि. सकाळ-संध्याकाळ अनशापोटी.
– लाजरी मुळासकट काढून स्वच्छ धुवून त्याचा काढा बनवून सकाळ-सायंकाळ अनशा पोटी घेण्याने मासिक पाळीतील अधिक रक्तस्राव लगेच थांबतो.
– बिसवाच्या पानांचा उपयोग अतिस्रावात अत्यंत लाभदायक आहे.

६) रक्तपित्त नावाचा एक रोग – ज्यात एकाहून अधिक ठिकाणाहून रक्तस्राव होतो.. जसे तोंड, नाक, कान, मुत्र व गुदभाग, योनी वगैरे… यामध्येही लवकरात लवकर उपाय होणे गरजेचे असते.
– अडुळशाचा फांद्या, पाने आणि मूळ यांचा काढा आणि अडुळशाच्या फुलांचा कल्क यांच्यापासून सिद्ध केलेलं तूप मधाबरोबर घेतल्यास रक्तपित्तामुळे पडणारे रक्त लगेच थांबते.
शरीरातून कुठूनही रक्त बाहेर पडणे ही पहिली ईमर्जन्सी आहे. त्यावर तातडीने उपाय करावेत.

७) दिवसा किंवा रात्री वारंवार लघवीला होत असेल तर ते फार त्रासदायक असते. यावर ओव्याचे एक चमचा चूर्ण, एक चमचा तीळ व एक चमचा गूळ हे मिश्रण दिवसभरात थोडे थोडे खाल्ले तर लघवीचे प्रमाण कमी होते.

८) लघवीला साफ होत नसेल तर – प्रमाणही कमी असेल आणि लघवी करताना दुखत असेल तर पळसाची फुले वाफवून त्याचा ओटीपोटावर लेप केल्याने लघवी मोकळी होते.

९) तापामध्ये उष्णता डोक्यात जाऊ नये यासाठी दूर्वा व तांदूळ एकत्र वाटून तयार केलेला जाडसर लेप कपाळावर व टाळूवर लावावा.

१०) नागिणीमध्ये फार दाह होत असता- त्यावरही दूर्वा व तांदळाचा जाडसर लेप लावायचा. असे करण्याने लगेच बरे वाटते व नागीण बरी होण्यास मदत होते.

११) तापात किंवा इतर कोणत्याही रोगात फार तहान लागत असेल – व पाणी पिऊनही शमत नसेल तर खडीसाखर टाकून गोड डाळिंबाचा रस घोट घोट घेतल्याने लगेच बरे वाटते.

१२) झोप लागत नसेल – तर जायफळ तुपात उगाळून तयार केलेले गंध हळूहळू कपाळावर चोळल्याने गाढ झोप येते.

१३) तापात एकाएकी अधिक प्रमाणात घाम येऊ लागल्यास – तसे तापामध्ये घाम येणे चांगले असते कारण त्यामुळे ताप उतरतो, पण जास्तच येऊ लागल्यास तमालीचा थकवा येतो, गळून गेल्यासारखे वाटते. अशावेळी दोन चमचे भाजलेल्या ओव्याचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला चोळले तर घाम येणे कमी व्हायला सुरवात होते.

१४) डोके गार वारा लागल्याने दुखत असेल – तर डोक्यावर आल्याचा रस चोळल्याने बरे वाटते.

१५) पित्त वाढल्यामुळे – मळमळत असेल, पोटात आग होत असेल तर कोरड्या साळीच्या लाह्या चावून खाण्याने लगेच बरे वाटते.

१६) भाजलेल्या ठिकाणी – कोरफडीच्या ताज्या गरामध्ये थोडे तूप व मध मिसळून तयार केलेले मिश्रण लावल्याने आग तर कमी होतेच पण फोड वगैरे न येता त्वचा पूर्णपणे पूर्ववत होते.

१७) मधमाशी वगैरे चावली -तर त्या ठिकाणीसुद्धा कोरफडीचा ताजा गर किंवा लिंबाचा रस लावण्याने बरे वाटते.

१८) कुठल्याही प्रकारची बद्धकोष्ठता – अमलतासाचा गर १०-२० ग्रॅम घेतल्याने बद्धकोष्ठतेत ताबडतोब आराम मिळतो.

१९) खोकला – अडुळशाच्या पानांचा रस १ चमचा + आल्याचा रस १ चमचा + मध १ चमचा तिन्ही एकत्र करून घेतल्याने सर्व प्रकारच्या खोकल्यात लगेच आराम मिळतो.

२०) सर्दी, पडसं, तापासाठी – तुळशीची ७ पाने, ५ लवंगा घेऊन त्याचा काढा करून सैंधव घालून गरम गरम असता प्यावा. काही वेळ चादर ओढून झोपल्याने लगेच घाम येऊन ताप उतरतो.

२१) लहान मुलांना सर्दी, पडसे व कफ झाल्यास तुळस व आल्याचा रस ५-७ थेंब मधात घालून चाटवल्यास मुलांचा कफ, सर्दी व पडसे ठीक होते.

२२) डोकेदुखी, मायग्रेनसाठी – बदामाचे तेल ५-५ थेंब नाकात सकाळी रिकाम्यापोटी व सायंकाळी व झोपतेवेळी टाकल्यास डोकेदुखी, मायग्रेन व अनिद्रा स्मृती-दौर्बल्य, डोके जड होणे यात विशेष लाभ होतो. हे उपचार ताबडतोब वेळेवर केल्यास पक्षाघात, कंपवात, नैराश्यासारखे रोग टाळता येतात.

अशा प्रकारे काही तातडीच्या उपायांचा अवलंब केल्यास ईमर्जन्सीमध्ये करावी लागणारी धावपळ टाळता येते. तसेच रोगही त्या स्थितीला जात नाही. हे वरील तातडीचे उपाय म्हणजे उपचार किंवा चिकित्सा नव्हे., कुठल्याही रोगाच्या उपचारासाठी योग्य वैद्याचा सल्ला व उपचार घेणेच बंधनकारक आहे. प्रत्येक रोगामध्ये ठराविक वेळ हा उपचारांना आणि शरीरात पुन्हा संतुलन प्रस्थापित करण्यासाठी द्यावाच लागतो.