आयुर्वेदात ‘अनुपान’ महत्त्वाचे!

0
537

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

औषधाचा गुणोत्कर्ष व्हावा यासाठी योग्य अनुपान योजावे लागते. अचानक त्रास होऊ लागला, हाताशी औषध नसले तरी अनुपान मिळणे सोपे असते. अशा वेळी मुख्य औषध घेण्यापूर्वी केवळ अनुपानाचा उपयोग होतो.

गोळ्या पाण्याबरोबर; पातळ औषध आहे तसेच तर काही पावडर दुधातून घेणे एवढेच आपल्याला माहीत आहे. पण जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर ते विविध औषधे कधी गरम पाण्याबरोबर, कधी मधातून, काही तूपातून तर काही तुळशीच्या रसातून, काही आल्याच्या रसातून तर काही तांदळाच्या धुवणातून घ्यायला सांगतात. हे असे कां सांगत असतील? तर.. आयुर्वेद शास्त्रामध्ये जेवढे महत्त्व औषधाला दिलेले आहे तेवढेच महत्त्व ते औषध कशाबरोबर घ्यायचे यालाही दिले आहे. आयुर्वेदामध्ये याला ‘अनुपान’ असे म्हणतात.

अनुपान म्हणजे काय? –
‘अनु – सह पश्‍चात् वा दीयते इति अनुपानम् |’
औषधी द्रव्य सेवन करताना ते ज्या द्रव्याबरोबर दिले जाते, त्याला अनुपान असे म्हणतात.
* अनुपानाचे फायदे ः-
१) अनुपानामुळे औषधी द्रव्य सेवन करणे सोयीचे होते. लहान मुले कडू औषधे घेण्यास टाळाटाळ करतात. व्याधी बरा होण्यासाठी औषधी मनापासून घेतली पाहिजेत. मग एखादे औषध कडू असले तरी त्याला गोड चवीचे अनुपान दिले तर ते सहज घेता येते. म्हणून कडू औषधे साखर, मध वा अवलेहाबरोबर देणे किंवा पाण्याच्या घोटाबरोबर चूर्णासारखी औषधे घेण्यास सांगणे ही उदाहरणे म्हणजे औषध घेणे सोयीचे व्हावे हे अनुपानाचे कार्य दर्शवणारी आहेत.
२) अनुपानामुळे औषधांचे गुणधर्म वाढतात – औषधांचे गुणधर्म अधिक वाढावेत व ती अधिक कार्यकारी व्हावीत यासाठी मधासारख्या योगवाही द्रव्याचा वापर अनुपान म्हणून केला जातो. ग्रहणीसारख्या रोगांमध्ये पर्पटी कल्पांचा वापर करताना पर्पटी कल्पांचे अग्नी वाढवण्याचे कार्य अधिक चांगले व्हावे म्हणून तूप हे अनुपानासाठी वापरले जाते.
पाण्डू रोगामध्ये रक्तक्षय झाला असता लोहकल्प वापरतात. लोह कल्पांचे शरीरात चांगल्या प्रकारे शोषण व्हावे म्हणून तूप हे अनुपान वापरतात.
त्रिभुवनकीर्तीसारख्या कफघ्न औषधी गरम पाण्याबरोबर, मधाबरोबर किंवा आल्याच्या रसातून घ्यायला सांगतात… जेणेकरून औषधांचे गुण वाढतात. शतावरी, अश्‍वगंधासारखी बल्य द्रव्ये दुधाबरोबर घेतल्याने अधिक कार्यक्षम ठरतात.
३) अनुपान देण्यामागचे तिसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे द्यावयाच्या औषधी द्रव्यांचा शरीरास लाभ तर व्हावा, पण त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळले जावेत हे आहे.
उदा. कारस्कर हे मांसधातूला संहनन प्राप्त करून देणारे उत्कृष्ट द्रव्य आहे, पण ते विषद्रव्य आहे. म्हणून या कारस्कराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कारस्कर कल्पांचा प्रयोग नेहमी तूपाबरोबर करावा लागतो. विरेचन किंवा अनुलोम द्रव्ये विरेचनाचे कार्य करत असली तरी त्यामुळे पोटात मुरडा धरतो व पोटात दुखते. हे टाळण्यासाठी एरंडतेल, सुखकारक वटी, त्रिफळा चूर्ण ही द्रव्ये वातानुलोमासाठी प्रसिद्ध असणार्‍या गरम पाण्याबरोबरच द्यावी. गरम पाण्याने पोटात मुरडा धरणे टळते व विरेचन द्रव्ये अधिक कार्यकारी बनतात.
४) ज्याप्रमाणे तेलाचा थेंब लगेच पाण्यावर पसरतो, त्याप्रमाणे औषध किंवा अन्न अनुपानाबरोबर सेवन केल्यास सहज संपूर्ण शरीरात पसरून, शरीरास लाभ देते.
आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथात सखोल विचार करूनच अनुपानाबद्दल लिहिलेले आढळते. दोषानुरूप, प्रकृतीनुरूप, व्याधीनुरूप अनुपान बदलते.
* दोषानुरूप अनुपान देताना….
– वातव्याधींसाठी किंवा वात प्रकृतीच्या रुग्णांसाठी स्निग्ध व उष्ण असे अनुपान द्यावे.
– पित्त व्याधी किंवा पित्त प्रकृतीच्या रुग्णांसाठी मधुर व शीत अनुपान द्यावे.
– कफकर व्याधी व कफ प्रवृत्तीच्या रुग्णांसाठी रूक्ष व उष्ण अनुपान द्यावे.
– लठ्ठ माणसांसाठी मध हे चांगले अनुपान आहे.
– उपवास, व्यायाम, थकवा यामध्ये दूध हे चांगले अनुपान आहे.
* अनुपान द्यायचे काही नियम –
– घेतलेल्या आहाराच्या विरुद्ध अनुपान उदा. थंड पदार्थ सेवनानंतर कोष्ण किंवा उष्ण अनुपान.
– औषधाप्रमाणेच अनुपान उदा. पित्तशामक औषधी प्रयोगानंतर थंड अनुपान.
– व्याधी व वेळेनुसार अनुपान. उदा. तापाच्या पूर्वावस्थेत केवळ उष्णोदक पीत राहिल्यास तापाचा उद्रेक होण्यापासून बचाव होतो.
– दोष विरुद्ध अनुपान. उदा. कफज व्याधीमध्ये उष्ण अनुपान पिल्यास शरीर दुर्बल बनवते. जेवणामध्ये मधे मधे पिल्यास दौर्बल्य अथवा गुरुता उत्पन्न करत नाही पण जेवणानंतर शरीर जड बनवते. म्हणून अनुपान हे गरजेनुसार घ्यावे.
आयुर्वेदामध्ये विविध रोगांनुसार अनुपान सांगितले आहे –
– ताप ः मध, तुलशीचा रस किंवा आल्याचा रस, चिराइत स्वरस, उष्णोदक.
– श्‍वास किंवा अस्थमा ः अडूलसा स्वरस + आल्याचा रस + मध.
– प्रमेह ः आवळा रस + हरिद्रा चूर्ण.
– वात रोग ः शुद्ध गुग्गुळ + लसूण
– आमवात ः गोमूत्र + एरंड तेल
– पाण्डू ः तूप + लोह भस्म, मंडूर भस्म.
– कृमी ः विडंग चूर्ण.
– अतिसार ः दाळिंब रस + कुटज त्वक चूर्ण
– ग्रहणी ः तक्र
– उन्माद ः पूराण तूप.
– कुपठ ः खदीर व सारिव क्वाथ.
– श्‍वीत्र ः बाकुची
– पार्श्‍वभूल ः पुष्कर मुल.
– गुल्म ः शिगृमुल त्वक.
– उलटी ः लाजामण्ड मधासोबत.
– वातरक्त ः गुडूची रस
– निद्राक्षय ः साखर घालून दूध प्यावे.
– अरुचि, तोंडाला चव नसता ः मातुलिंग स्वरस
– मेदोरोग ः गरम पाण्यातून मध
– अम्लपित्त ः द्राक्षा
– सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या तक्रारींमध्ये ः त्रिफळा.
– रक्ती मूळव्याध ः नागकेशर, आवळा स्वरस, तूप व साखर
– प्रदर ः लोध्रत्वक, तांदळाच्या धुवणाबरोबर.
– रक्तपित्त, रक्तातिसार ः दूर्वास्वरस, मोचरस
– मूत्रकृच्छ, मूत्राश्मरी ः उष्णोदक
– वृष्य ः साखर मिश्रित दूध.
काही विशिष्ट औषधे ही ठराविक अनुपानाबरोबरच दिली जातात.
उदा. च्यवनप्राश हे दुधाबरोबर खावे म्हणजे पित्तशमनाचे कार्य होते.
अकीला पिष्टी ही पित्तदुष्टीामध्ये मधाबरोबर, वातव्याधीमध्ये अश्‍वगंधाबरोबर, कफदुष्टीमध्ये व काही हृद्रोगांमध्ये आल्याच्या रसाबरोबर घ्यावी.
– महायोगराज गुग्गुळ – वातव्याधीमध्ये रास्नादि काढ्याबरोबर, मधुमेहामध्ये दारुहरिद्रा काढ्याबरोबर, मेदोरोगात मधाबरोबर, चर्मरोगात कडूनिम्बाच्या काढ्यासोबत, वातरक्तामध्ये गुडूची स्वरस म्हणजे एकच औषध वेगवेगळ्या व्याधींमध्ये वेगवेगळ्या अनुपानाबरोबर सेवन करावयास सांगितले आहे.
अशा प्रकारे व्याधीच्या प्रारंभिक अवस्थेत नुसत्या अनुपान सेवनानेसुद्धा व्याधी जास्त दारुण अवस्थेत जाण्यापासून परावृत्त करता येतो, ज्याप्रमाणे औषधीय द्रव्यांबरोबर अनुपान देतात, त्याचप्रमाणे आहारिय द्रव्येसुद्धा अनुपान म्हणून बर्‍याच रोगांमध्ये वापरता येतात. उदा. लाह्यांचे माण्ड, यूष, खिचडी, सूप, रस, फलरस ही आहारीय द्रव्ये खूप प्रकारच्या आजारांमध्ये वापरू शकतात. अनुपान हा आहाराचाच एक भाग होऊ शकतो.
औषधाचा गुणोत्कर्ष व्हावा यासाठी योग्य अनुपान योजावे लागते. अचानक त्रास होऊ लागला, हाताशी औषध नसले तरी अनुपान मिळणे सोपे असते. अशा वेळी मुख्य औषध घेण्यापूर्वी केवळ अनुपानाचा उपयोग होतो. त्यामुळे प्राथमिक उपचार नक्कीच करता येतात.