आयसीसी अंडर १९ संघात पाच भारतीय

0
82

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल रविवारी ‘आयसीसी अंडर १९ सर्वोत्तम ११’ खेळाडूंचा संघ जाहीर केला. विश्‍वविजेत्या भारतीय संघातील पाच खेळाडूंना यामध्ये स्थान मिळाले आहे. काल शनिवारी भारताच्या अंडर १९ संघाने ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव करून चौथ्यांदा विश्‍वचषकाला गवसणी घातली होती. या यशाचे प्रमुख शिल्पकार ठरलेल्यांना आयसीसी संघात पसंती देण्यात आली आहे. आघाडी फळीतील तिन्ही खेळाडू हे भारतीयच असून पृथ्वी शॉ (२६१ धावा) व मनज्योत कालरा (२५२ धावा) यांना सलामीवाराच्या जागेसाठी निवडण्यात आले आहे. स्पर्धावीर ठरलेल्या शुभमन गिल (३७२ धावा) याला तिसर्‍या स्थानाची जबाबदारी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त डावखुरा संथगती गोलंदाज अनुकूल रॉय (१४ बळी) व वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी (९ बळी) यांना स्थान देऊन आयसीसीने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे.

वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप, महिला टीम इंडियाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा, न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो, पत्रकार शशांक किशोर व ऑस्ट्‌ेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी यांचा समावेश असलेल्या पथकाने या संघाची निवड केली आहे.

या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार रेयनार्ड व्हॅन टोंडर याच्याकडे सोपविण्यात आले आहे. टोंडर याने सहा सामन्यांत द. आफ्रिकेचे नेतृत्व करताना केनियाविरुद्धच्या वैयक्तिक सर्वोत्तम १४३ धावांसह स्पर्धेत एकूण ३४८ धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानकडून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तीन गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान आटोपले होते. यानंतरही त्यांनी बांगलादेशला ८ गड्यांनी नमवून पाचवे स्थान मिळविले होते. या सामन्यात टोंडर याने नाबाद ८२ धावा केल्या होत्या. टोंडरव्यतिरिक्त द. आफ्रिकेचा यष्टिरक्षक वांदिले माकवेटू व वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएट्‌झी यांचीदेखील निवड झाली आहे. माकवेटू याने यष्टिमागे ११ बळी घेताना फलंदाजीतही काही उपयुक्त धावा जमवल्या होत्या. तर कोएट्‌झी याने ८ बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती. सातत्यपूर्ण कामगिरी केलेला न्यूझीलंडचा फिन ऍलन (३३८ धावा), पाकिस्तानचा डावखुरा जलदगती गोलंदाज शाहिन आफ्रिदी (१२ बळी) व अफगाणिस्तानचा लेगस्पिनर कैस अहमद (१४ बळी) यांनी ‘अंतिम ११’ंमध्ये प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत सर्वाधिक ४१८ धावा केलेला वेस्ट इंडीजचा ऍलिक अथानझे या संघातील १२वा खेळाडू आहे.

आयसीसी अंडर १९ संघ
पृथ्वी शॉ (भारत), मनज्योत कालरा (भारत), शुभमन गिल (भारत), फिन ऍलन (न्यूझीलंड), रेयनार्ड व्हॅन टोंडर (द. आफ्रिका, कर्णधार), वांदिले माकवेटू (द. आफ्रिका, यष्टिरक्षक), अनुकूल रॉय (भारत), कमलेश नागरकोटी (भारत), जेराल्ड कोएट्‌झी (द. आफ्रिका), कैस अहमद (अफगाणिस्तान), शाहिन आफ्रिदी (पाकिस्तान) व ऍलिझ अथानझे (वेस्ट इंडीज)