आयसीसीचे वेळकाढू धोरण ः बीसीसीआय

0
134

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने यंदाची टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा भरवणे कठीण असल्याचे सांगूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मावळते अध्यक्ष शशांक मनोहर स्पर्धेच्या भवितव्याबाबत ठोस निर्णय घेण्याबाबत वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल बुधवारी केला. आयसीसीचे आडमुठे धोरण इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीला खिळ घालण्यासाठी आहे, असे बीसीसीआयला वाटते. आयसीसीने या महिन्याच्या सुरुवातीला बैठक घेतली होती. परंतु, निर्णय मात्र पुढील महिन्यापर्यंत राखून ठेवला होता. आयसीसीने लवकर निर्णय जाहीर केला असता तर सर्व देशांना आपल्या द्विपक्षीय मालिकांचा निर्णय घेणे सोपे झाले असते, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सर्व देशांचे खेळाडू आयपीएलचा भाग नाहीत. काही मोजकेच विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. त्यामुळे आयसीसीचा वेळकाढूपणा आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट मंडळांसाठी अधिक मारक ठरणार असल्याची भीती या अधिकार्‍याने व्यक्त केली. बीसीसीआय व मनोहर यांच्यातील वाद क्रिकेट जगताला नवीन नाही. नागपूरस्थित शशांक मनोहर व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यातील वादाची किंमत बीसीसीआयला मोजावी लागत आहे.

दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट नव्या ढंगात

एकाच सामन्यात खेळणार तीन संघ

दक्षिण आफ्रिकेत नव्या ढंगात क्रिकेट पुनरागमन करणार आहे. २७ जून रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार्‍या सॉलिडेरिटी कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या तीन संघांमध्ये एकाच दिवशी ३६ षटकांचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील अनुभवी आणि मोठे खेळाडू सामील होणार आहेत. धर्मादाय संस्थेसाठी निधी जमा करण्याचा या मालिकेचा उद्देश आहे. तीनही सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जातील दरम्यान, या सामन्याचे नियमही वेगळे असणार आहेत.
एबी डीव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक आणि कगिसो रबाडा यांना कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. निधी जमवण्यासाठी खेळण्यात येणार्‍या सामन्यास सॉलिडेरिटी कप असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघाला १२ षटके फलंदाजीस मिळतील परंतु, यांची विभागणी ६ षटकांच्या दोन सत्रांत करण्यात आली आहे. तिन्ही संघाचे प्रत्येकी एक डाव (६ षटके) झाल्यानंतर सर्वाधिक धावा असलेला संघ दुसर्‍या वेळी प्रथम फलंदादी करणार आहे. एकूण १२ षटकांच्या प्रत्येक डावात सहा खेळाडू फलंदाजी करतील तर संघात एकूण ८ खेळाडू असतील. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल, पण त्याला केवळ दुहेरी धाव घेता येईल. एकेरी धाव मोजली जाणार नाही. एका गोलंदाजाला कमाल तीन षटकेच टाकता येणार आहेत. सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल. विजेत्या संघाला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसर्‍या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक प्रदान करण्यात येईल. आणि सामना बरोबरीत राहिल्यास सुपर-ओव्हरने सामन्याचा निर्णय होईल. पण तीनही संघांमध्ये बरोबरी झाल्यास तिघांनाही सुवर्णपदक देण्यात येईल.
दरम्यान, सीएसएला कडक प्रोटोकॉल अंतर्गत सामन्यांचे आयोजन करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. सीएसए क्रिकेटचे संचालक ग्रिम स्मिथ म्हणाले की, मला माहित आहे की खेळाडू पुन्हा ऍक्शनमध्ये येण्यासाठी आनंदित आहेत, म्हणूनच आम्ही सॉलिडेरिटी कपबद्दल खूप उत्सुक आहोत.

‘थ्री टीम क्रिकेट’ ही संकल्पना फर्स्ट रँड बँकचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्या आरएआयएन मोबाईन कंपनीशी संलग्न पॉल हॅरिस, समालोचक मार्क निकोलस, दक्षिण आफ्रिकेचा माजी रग्बी कर्णधार व व्हर्सिटी स्पोर्टचे प्रमुख फ्रान्सुआ पिएनार यांची आहे.

सहभागी संघ ः किंगफिशर्स ः कगिसो रबाडा (कर्णधार), रिझा हेंड्रिक्स, यानेमन मलान, फाफ ड्युप्लेसी, हेन्रिक क्लासें, ख्रिस मॉरिस, ग्लेंटन स्टूरमन व तबरेझ शम्सी, काईटस् ः क्विंटन डी कॉक (कर्णधार), तेंबा बवुमा, जेजे स्मटस्, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, लुथो सिपाम्ला, ब्युरन हेंड्रिक्स व ऍन्रिक नॉर्के, ईगल्स ः एबी डीव्हिलियर्स (कर्णधार), ऐडन मार्करम, रस्सी वेंडर दुसेन, काईल वरेन, आंदिले फेहलुकवायो, सिसांदा मगाला, ज्युनियर डाला व लुंगी एन्गिडी