आयसिस व अल कायदाचा भारतात चंचूप्रवेश

0
108
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

नासीर अहमद पंडितच्या पहिल्या बरसीच्या वेळी चेहर्‍यावर मुखवटा घातलेल्या पाच बंदुकधारी मुजाहिद्दीनांंनी ‘यानंतर जो केवळ अल्लासाठी, खलिङ्गतच्या नावे कुर्बान होईल तोच शहीद मानला जाईल’ हे आयसिस ङ्गर्मान जाहीर केले. हा आयसिसच्या काश्मीरमधील चंचूप्रवेशाचा ओनामा होता. जम्मू – काश्मीरप्रमाणेच केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात आयसिस व अल् कायदाला मिळणारा छुपा पाठिंबा द्रुतगतीने वाढतो आहे.

काश्मीरमधील सोपोर क्षेत्रात भारतीय सेनेने २२-२३ मार्चच्या रात्री अटीतटीच्या चकमकीत सहा जिहाद्यांना कंठस्नान घातले. त्यापूर्वी काही तास दिवसाढवळ्या कुपवाडाच्या सेंट्रल रिझर्व्ह पोलिस ङ्गोर्सच्या कँपवर झालेल्या ङ्गिदायीन हल्ल्यात चार सीआरपीएङ्ग जवान शहीद झाले होते आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन जिहादी मारले गेले होते. पाकिस्तान वा भारतातील कोणत्याही दहशतवादी अथवा जिहादी संघटनेने याची जबाबदारी घेतली नाही. त्याच दिवशी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावास आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या ‘पाकिस्तान डे’ला दिल्लीत भारतीय परराष्ट्र मंत्रालय व सेनेचे वरिष्ठ अधिकारी आणि पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्त व तेथील इंडियन मिलिटरी अटॅचींनी हजेरी लावली. या मुद्दयावरुन वृत्तवाहिन्यांवर गदारोळ माजला. काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा काहीच संबंध नसतो, हे हल्ले आयसिस किंवा अल् कायदाचे मुजाहिद्दीन करतात, असे आधी पाकिस्तानी चर्चाकारांनी वाहिन्यांवर आणि नंतर त्यांच्या सरकारी प्रवक्त्यांनी भारत सरकारतर्ङ्गे दोषारोपण झाल्यावर सांगितले. त्यामुळेच काश्मीरमध्ये आयसिस आणि अल कायदाने पाय रोवायला सुरुवात केली आहे का किंवा रोवले आहेत का हा प्रश्‍न उपस्थित झाला.

गतवर्षी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी काश्मीरमधील झकुरा येथे झालेल्या चकमकीत श्रीनगरजवळील परिपोरा गावातील मुगीस अहमद मीरला कंठस्नान घालण्यात आले होते. या कुख्यात जिहाद्याचा जनाजा निघाला तेव्हा पहिल्यांदा अन्सर गझवत अल हिंद या कोर्‍या करकरीत जिहादी संघटनेचे ङ्गलक आणि झेंडे दिसून आले. मुगीस मीरची कङ्गनपेटी अल् कायदा आणि आयसिसचा पांढरा आकृती ठसा असलेल्या काळ्या कापडामध्ये गुंडाळण्यात आली होती. या ५००० लोकांच्या जनाज्यातील अनेक तरुणांच्या हातात शस्रे आणि अलकायदा व आयसिसचा ठसा असणारे काळे झेंडे होते. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये मारल्या गेलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या सज्जाद गिलकारलाही मलरत्तामधील जनाज्याच्या वेळी अशाच प्रकारच्या झेंड्यांमध्ये गुंडाळण्यात आल्याचे दिसून आले.

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, २०१६ च्या मे महिन्यामध्ये बुर्‍हान वाणीने काश्मीरमध्ये ‘इस्लामी खलिङ्गत’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. अमेरिकेत २७ जुलै २०१६ च्या ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात ‘ग्लोबल इस्लामिक ङ्ग्रंट’ या अल् कायदा व आयसिसच्या संयुक्त प्रसिद्धी खात्यांनी काश्मीरमध्ये पॅन इस्लामिक ग्रुप एजीएएची शाखा स्थापन झाल्याची बातमी दिली होती. बुर्‍हान वाणीला ठार मारल्यानंतर इस्लामी खलिङ्गतला पाठिंबा न देणार्‍या हुरिर्यत कॉन्ङ्गरन्सच्या प्रमुख नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे हिज्बुल मजाहिद्दीन या जहाल जिहादी संघटनेतून निष्कासित करण्यात आलेल्या झकीर मुसा याला या संघटनेचा सर्वेसर्वा घोषित करण्यात आले होते. काश्मीरमधील हुर्रियत नेत्यांवर इस्लामिक स्टेटच्या स्थापनेतील सर्वांत मोठा अडथळा असल्याचा आरोप करत झाकीर मुसाने पाकिस्तानात लपलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रणेता सलालुद्दीन संदर्भात ‘मॅन इन पाकिस्तान, मिटिंग इन एसी रुम ऑन लक्झुरियस सोङ्गा’ असा डिवचणारा टोला लगावला होता.

अन्सर गझवत अल हिंद (एजीएएच)च्या स्थापनेला सलालुद्दीन आणि सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर ङ्गारुख आणि मोहम्मद यासीन मलीकने ‘काश्मीरचे स्वातंत्र्ययुद्ध आम्हीच स्वयंभूरित्या चालवू. यामध्ये अल् कायदा किंवा आयसिससारख्या काश्मीरमध्ये पायही न रोवलेल्या विदेशी मुस्लिम संघटनांनी हस्तक्षेप करू नये’ या शब्दांत तीव्र विरोध दर्शवला होता. यानंतर झकीर मुसा भूमीगत झाला खरा; मात्र त्याच्या समर्थनार्थ श्रीनगर मधील तरुणाईने ‘मुसा मुसा झाकीर मुसा’ असा नारा बुलंद केला. याचेच पडसाद शुक्रवारच्या नमाजनंतर कायदा हाती घेतलेल्या जमावाने श्रीनगरमधील जामा मशिदीसमोर २२ जून २०१७ रोजी काश्मीर पोलिस डीएसपी आयुब पंडितच्या केलेल्या हत्येच्या आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींच्या काश्मिरी संत मीर सय्यद हमदानीच्या मजारवर १५ नोव्हेंबर २०१७ ला केलेल्या अर्दासच्या वेळीही उमटले.

सज्जाद गिलकार आणि मुगीस मीरच्या जनाज्यांच्या वेळी हुर्रियत कॉन्ङ्गरन्सच्या नुमाईंद्यांच्या हकालपट्टीची तीव्र जाणीव झाली. दोन्ही जनाज्यांनंतर खोर्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला, कारण ते दोघेही काश्मीरमध्ये इस्लामी खलिङ्गत स्थापनेसाठी प्रयत्नशील होते. गृहमंत्री राजनाथसिंग, डीजीपी सैश पॉल वैद आणि आयजी मुनिरखान काश्मीरमध्ये आयसिस, अल् कायदा किंवा एजीएएचे नामोनिशाण नाही असे वार्ताहरांना सांगत होते त्याच वेळी मुगीस मीरचा जनाजा दङ्गनभूमीकडे कूच करत होता आणि ‘मुगीस भाई का एक पैगाम, कश्मीर बनेगा दारुल इस्लाम’ च्या नार्‍यांनी श्रीनगरचे आकाश दणाणून गेले होते. इतकेच नव्हे तर ‘धिस इज मुगीसस मेसेज दॅट काश्मिर विल बिकम ए इस्लामिक स्टेट’ ही घोषणा आणि ओसामा बिन लादेन व त्याच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन गन असलेला मुगीर मीर हे चित्र एजीएएचच्या बॅनरवर ठळकपणे दिसत होते. याबाबत प्रशासकीय प्रतिक्रिया न आल्यामुळे यूट्यूबवरील त्या घटनेच्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्यात आले असावे.

आयसिस या मुस्लिम जगतातील अतिप्रभावशाली जिहादी संघटनेच्या एका हाकेवर जगभरातील तरुणाई या संघटनेत सामील होऊन स्वतःच्या देशात दहशतवादी-आत्मघातकी हल्ले करायला उद्युक्त होताना दिसते. तोच प्रभाव अल् कायदाचा देखील आहे. आयसिस, अल् कायदा व एजीएचच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून काश्मीरमधील भारतीय सेना व सुरक्षा दल ‘कुङ्गर ः नॉन बिलिव्हर्स’ आहेत. लष्करे तैय्यबा, जैश ए मोहम्मदसारख्या पाकिस्तानी जिहादी संघटनांचा उद्देश जगात इस्लामी साम्राज्य स्थापनेऐवजी काश्मीरवर राज्य करणे हा असल्याने आयसिसच्या नावाखाली काश्मीरमध्ये कार्यरत होण्यासाठी प्रत्येक जिहाद्याला आणि संघटनेतील सर्वांना खलिङ्गा अबू बक्र अल बगदादीशी ‘बायात’ आहे अशी शपथ घ्यावी लागेल आणि ती मंजूर झाल्यानंतरच तो जिहादी आणि ती संघटना खलिङ्गतचा हिस्सा आहे असे मानले जाईल. ङ्गिलिपिन्सच्या अबु सयाङ्ग या जहाल कट्टरपंथी संघटनेने २०१६ मध्ये अशी बायात किंवा अध्यात्मिक शपथ घेतल्यानंतरच त्यांना आयसिसने आपल्या पंखांखाली घेतले. मात्र आपल्याकडील केंद्र व राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणेने ‘काश्मीरमध्ये कोणत्याही जिहादी संघटनेने अशी अध्यात्मिक शपथ घेतल्याची खात्री नसल्यामुळे आयसिस, अल् कायदा अथवा एजीएएच्या नावाखाली जिहादी हल्ला झाल्याच्या केवळ वल्गनाच होतात; प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती नाही’ अशी भूमिका घेतली. ताज्या माहितीनुसार, झाकीर मुसाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या जिहादी संघटनेने संपूर्ण भारतभरात मोठ्या सरकारी कंपन्या आणि भारतात आर्थिक गुंतवणूक करणार्‍या विदेशी कंपन्यांवर जिहादी हल्ले करण्याची धमकी २६ ङ्गेब्रुवारी २०१८ ला इंटरनेटवरील एका प्रसारणात
दिली आहे. या धमकीमुळे जिहाद्यांनी भारताविरुद्ध आर्थिक युद्ध छेडण्याची घोषणा केल्याचे दिसत आहे. बहुतांश भारतीय कंपन्यांमध्ये अशा जिहादी आत्मघाती हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मूलभूत सुविधा नसल्यामुळे दोन-तीन हत्यारबंद जिहादी आत्मघातकी हल्ल्याच्या माध्यमातून भारतीय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, निवडक औद्योगिक क्षेत्रात हैदोस माजवू शकतात. २००८ च्या ताजमहाल हॉटेलमधील जिहादी हैदोसानंतर हे सिद्ध झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर झाकीर मुसाच्या धमकीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. डिसेंबर २०१७ मध्ये पुलवामा, काश्मीरमधील सीआरपीएङ्ग कँपवर ङ्गरदीन खंडे आणि मन्सूर बाबा या नुकतेच मिसरुड ङ्गुटलेल्या काश्मिरी तरुणांनी केलेला हल्ला हा पहिला सर्वंकष काश्मिरी आत्मघाती हल्ला होता. या हल्ल्यामुळे आयसिस/अल्‌कायदा/ एजीएएच्या अपप्रचाराला बळी पडून जिहादात सामील झालेले नव्या पिढीतील काश्मिरी तरुण पुढेही भारतभरात असा हल्ला करू शकतील अशी भीती भारताच्या गुप्तचर यंत्रणांना वाटते. पाकिस्तानमधून आलेल्या आत्मघाती पथकांपेक्षा भारतीय नागरिक या नात्याने भारतात कुठेही बे-रोकटोक जाऊ शकणार्‍या काश्मिरी तरुणांनी येथील मोठ्या शहरांमध्ये स्थिरावलेल्या काश्मिरी तरुणांच्या मदतीने लीलया केलेले आत्मघाती हल्ले अधिक सुलभ असतील. सुलभतेमुळे ते जास्त पभावी होऊन त्याचे धागेदोरे आयएसआय वा पाकिस्तान सरकारशी जोडणे अशक्य होईल, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

२०१८ च्या सुरुवातीला पुलवामातील करीमाबादमध्ये नासीर अहमद पंडितच्या पहिल्या बरसीच्या वेळी चेहर्‍यावर मुखवटा घातलेल्या पाच बंदुकधारी मुजाहिद्दीनांंनी इस्लामिक स्टेट नसलेले पाकिस्तानी झेंडे ङ्गडकावण्यास आणि पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर जो केवळ अल्लासाठी, खलिङ्गतच्या नावे कुर्बान होईल तोच शहीद मानला जाईल हे आयसिस ङ्गर्मान जाहीर केले. ‘खलिङ्गतसाठी छेडलेला जिहाद लवकरच पाकिस्तान आणि भारतात येईल’ असे आश्‍वासनही त्यांनी उपस्थितांना दिले. हा आयसिसच्या काश्मीरमधील चंचूप्रवेशाचा ओनामा होता. सीमेवरील भारतीय सैनिकांचा अपवाद वगळता अजून तरी काश्मीरमध्ये आयसिस आणि अल् कायदा मध्यपूर्वेत करतात तशा प्रकारे जिहाद्यांनी नागरिकांचे शीर कलम केलेले नसले आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये विद्ध्वंसासाठी वापरलेल्या विमानांसारखा भयानक विनाश घडवला गेलेला नसला तरी तो यापुढे होणारच नाही असे नाही. कारण जम्मू-काश्मीरप्रमाणेच केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात आयसिस व अल् कायदाला मिळणारा छुपा पाठिंबा द्रुतगतीने वाढतो आहे.

आज जरी त्यांची संख्या कमी अथवा नगण्य असली तरी भविष्यात ती तशीच राहील असा आशावाद बाळगणे सामरिकदृष्ट्या अपरिपक्वपणाचे ठरेल. भारत व काश्मीरमधील मुस्लिम तरुणांमधील वाढती बेरोजगारी, अस्वस्थता व खदखद यांना मूलतत्त्ववादाचे खतपाणी घालणारे मदरसे व मौलवी, इराक व सिरियामध्ये कार्यरत जिहादी, कणा मोडलेल्या आयसिसच्या बाजूने लढण्यासाठी व आता देशात परत येत असलेले अनिश्‍चित संख्येतील तरुण आणि या दोघांचा ङ्गायदा घ्यायला टपलेला पाकिस्तान, मध्य भारतातील नक्षली हे आयसिस व अल कायदाचे संभाव्य उमेदवार आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ही चूक आपण ८०-९० च्या दशकात आधी पंजाब आणि नंतर काश्मीरमध्ये केली होती हे विसरुन चालणार नाही.