आयसिस ः आभास की वास्तव?

0
163
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या प्रचंड सामरिक दडपणाखाली इस्लामिक स्टेटची शकले होणे सुरु झाले आणि सीरियातील युफ्रेटीस नदीच्या तीरावरील बघऊझ गावाच्या पाडावानंतर इस्लामिक स्टेटची सांगता झाली. मध्यपूर्वेत मुस्लिम खलिफत स्थापन करण्याचे अबू बक्र अल बघदादीचे स्वप्न त्या दिवशी मृतप्राय झाले. परंतु तरीही जगभरातील हजारो मुस्लिम पुरुष आणि स्त्रिया त्याच्या विचारसरणीकडे आकर्षित होत आहेत…

१९२८ मध्ये हसन अल बन्नाने इजिप्तच्या भूमीवर स्थापन केलेली ‘मुस्लिम ब्रदरहूड’ ही आधुनिक जिहादाची प्रवर्तक दहशतवादी मुस्लिम संघटना आहे. अल कायदा, तालीबान आणि आयसीसचे सर्वेसर्वा बनण्याआधी ओसामा बिन लादेन, आयमन अल जवाहिरी आणि अबु बक्र अल बघदादी हे मुस्लिम ब्रदरहूडचे सदस्य होते. जर्मन वृत्तपत्र ‘वेल्ट एम सँटोग’नुसार अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर जगात ३,०७१ जिहादी हल्ल्यांमध्ये ९५,९३४ लोक मृत्युमुखी पडले असून १९४८ पासून एकूण ३१,२२१ इस्लामिक हल्ल्यांमध्ये २,४६,८११ लोक मारले गेले आहेत. जिहाद हा आता जागतिक प्रश्न बनला आहे.

२०१४ पासून सीरिया आणि इराकमध्ये ३ हजार चौरस मैल इलाक्यातील साडे तीन कोटी माणसांवर सत्ता गाजवणारे इस्लामिक स्टेट (आयएस) हे एक सापेक्ष वास्तव होय. तुर्कस्तानला व इतर राष्ट्रांना काबीज केलेल्या क्षेत्रांतील खनिज तेलाच्या केलेल्या विक्रीतून, तेथील लोकांवर लादलेल्या अमानुष करांच्या माध्यमातून, बळकावलेल्या अतिपुरातन वस्तूंच्या लिलाव विक्रीमधून, अपहरण केलेल्या विदेशी नागरिकांना सोडण्यासाठी मिळालेल्या खंडणीतून, चोरट्या आयातीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जबरी खंडणीतून इस्लामिक स्टेटला आपले प्रशासन चालवण्यासाठी पैसे मिळत असत. इस्लामिक स्टेटच्या भरभराटीच्या काळात तेथे प्रगत देशांमधील सरकारच्या धर्तीवर कारभार चालवला जात असे. इस्लामिक स्टेटचा खलिफा अबू बक्र अल बगदादीला त्याच्या खलिफतीचे प्रशासन चालवण्यासाठी स्टेट ऍडव्हायझरी काउन्सील मदत करत असे. सर्वोच्च स्तरावरील ही प्रक्रिया अगदी स्थानिक स्तरावरही तेवढ्याच ताकदीने कार्यरत होती. २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटच्या पराभवाला सुरवात होऊन फेब्रुवारी, २०१५ पर्यंत सीरियामधील कोबन आणि पुढे एप्रिलमध्ये तिकरीतवरील त्यांची सत्ता कुर्दिश पेशमर्ग फोर्सेसनी संपुष्टात आणली. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या प्रचंड सामरिक दडपणाखाली इस्लामिक स्टेटची शकले होणे सुरु झाले आणि सरते शेवटी शुक्रवार २२ मार्च २०१९ रोजी सीरियातील युफ्रेटीस नदीच्या तीरावरील बघऊझ गावाच्या पाडावानंतर इस्लामिक स्टेटची सांगता झाली.

मध्यपूर्वेत मुस्लिम खलिफत स्थापन करण्याचे अबू बक्र अल बगदादीचे स्वप्न त्या दिवशी मृतप्राय झाले. अल बगदादीची राजवट केवळ पाचच वर्षांत संपुष्टात आली असली तरी त्याच्या उभारणीच्या कालखंडाप्रमाणेच त्याच्या पराभवादरम्यानही जगभरातील हजारो मुस्लीम पुरुष आणि स्त्रिया त्याच्या विचारसरणीकडे आकर्षित होताहेत. आयसीसमधील सर्वांनी इस्लाम आणि इस्लामिक स्टेटची (खलिफत) दीक्षा घेतली आहे. मार्च २०१९ नंतर जरी बर्‍याच लोकांनी आयसीसमधून आपले अंग काढून घेतले असले तरी अजूनही असंख्य लोक इस्लामिक स्टेटशी संलग्न राहिले आहेत. जरी जमिनीवरील खलिफत संपली असली तरी आभासी खलिफत लोकांच्या मनात अजूनही जिवंतच आहे. सीएनएननुसार २०१४ ते १८ दरम्यान इस्लामिक स्टेटने जगभरातील २० देशांमध्ये ७० वर जिहादी हल्ले करून १८ हजारांवर लोकांचे बळी घेतले आहेत. त्यापैकी ३४६३ लोक २०१८ मध्ये मारले गेलेत. बघजाउचा पाडाव झाल्याच्या एकच महिन्याच्या आत इस्लामिक स्टेटने २१ एप्रिल २०१९ च्या ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवून ३०० वर लोकांचा बळी घेतला आणि ५०० वर लोकांना जखमी केले. एखाद्या ठिकाणावरील हल्ल्यात आयईडी बॉम्बस्फोट करून, थंड डोक्याने व शांत चित्ताने, निष्पाप लोकांचा नृशंस नरसंहार करण्यासाठी बाध्य करणारी ही कोणती विचारप्रणाली आहे, याचा उलगडा अजूनही संरक्षणतज्ज्ञांना झालेला नाही.

मुसलमानबहुल क्षेत्रात आधी शरिया राबवणे आणि त्यानंतर त्या क्षेत्रांना संघटित करून इस्लाम वृद्धिंगत करणे ही मुस्लिम ब्रदरहूडची महत्वाकांक्षा होती. अल बगदादीचे इस्लामिक स्टेट मुस्लिम ब्रदरहूडच्या विचारसरणीला खंदा पाठींबा देत जगात इस्लाम व शरियतच्या वृद्धीसाठी कुठलेही पाऊल उचलायला सज्ज होते आणि यापुढेही राहील. क्षेत्रीय कब्जाद्वारे हे साध्य होणार नसेल तर शरियाला मान्यता न देणार्‍या समाजात कट्टर इस्लामी विचारधारेला रुजवून तेथे इस्लामचे संवर्धन करायचे आणि त्या करता माणुसकीचा बळी द्यावा लागला तरी हरकत नाही अशी त्यांची कार्यपद्धती आहे. इस्लामिक स्टेटमध्ये आलेल्या नवीन सदस्यांना कट्टरपंथाची शिकवण, हिंसक प्रशिक्षण आणि अनुभवजन्य कौशल्याची संधी दिली जात असे. त्याशिवाय पुरुषांसाठी बलात्कार, टोकाची/अति हिंसकता आणि जन्नतकी ७२ हुरेंसारखे शहादतीचे फायदे यांचे वेगळे प्रशिक्षण देण्याची सोय होती.
२०१८ च्या सुरवातीला अबू बक्र अल बगदादी अमेरिकेच्या एका ड्रोन हल्ल्यामध्ये मारला गेला अशी वावडी उठली होती. पण सोमवार,२९ एप्रिल २०१९ रोजी हाताशी एके ४७ रायफल घेऊन बगदादी एका व्हिडियोमध्ये जगासमोर आला. मार्चमध्ये सिरीयात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर करण्यात आलेल्या श्रीलंकेवरील ईस्टर अटॅक संबंधात त्याने यात भाष्य केले आहे. संरक्षणतज्ज्ञांच्या मतानुसार, त्याला जे सांगायचे होत ते त्याने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले आहे. त्याच्या शब्दांचा अर्थ असा की इस्लामिक स्टेट अजूनही जिवंत आहे आणि तो अजूनही त्यांचा नेता आहे. आयसीसचे इंटरनॅशनल नेटवर्क, काफ़िरांवर जबरी, आकस्मिक हल्ले सुरूच ठेवील आणि ‘गझवा ए हिंद (साऊथ एशिया)’ हे त्यांचे पुढच पाऊल असेल.

सीरियातील पाडावानंतर आपल्या हुकमतीची जाणीव जगाला व आयएसच्या सदस्यांना करून देण्यासाठी बगदादीला जगासमोर यावे लागले. इस्लामिक स्टेटमध्ये रुजलेले तरुण-तरुणी, खलिफतीची संकल्पना नष्ट झाल्यामुळे इराक व सीरियातून मायदेशी परत गेल्यावर त्यांच्यातील धर्मासाठी जीव देण्याची आस संपलेली नसते. हे जिहादी दहशतवादी स्थानिक जिहादी स्लीपर सेल्स, इस्लामिक स्टेटचे समर्थक, जिहाद अवलंबण्यासाठी आसुसलेले कट्टरपंथीय तरुण, सोशल मीडियामधील व्हाईट कॉलर जिहादी, सामान्य जिहाद समर्थकांना हाताशी धरून काहीही करू शकतात. देश व जगासाठी हे लोक ‘टॉक्सिक ग्लोबल थ्रेट’ आहेत असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.

सीरियामधील भौगोलिक पराभवानंतर इस्लामिक स्टेटने इतरत्र जिहादी दहशतवादाला प्रोत्साहन व सर्वकष मदत देणे सुरु केले हे श्रीलंकेतील ईस्टर बॉम्बिंगमुळे स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेतील जिहादी हल्ल्याचा म्होरक्या हशिमनी त्रिवेंद्रम याने कोझीकोड आणि बंगळुरूला भेट दिली होती. हल्लेखोरांना तेथे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली, या श्रीलंकेच्या आरोपानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी तेथील मुस्लीम संघटना आणि समर्थकांच्या तपासणीची मोहीम सुरु केली आहे. पीएफआय आणि आयसीसचे लागेबांधे आहेत का हे शोधून काढण्यावर भर दिला जातो आहे. एवढ्या दूरवर येऊन एकट्याने इतका तीव्र जिहादी हल्ला करणे हे आयसीसकरता शक्य नव्हते. म्हणून त्यांना नॅशनल तौहीद जम्मतची मदत घ्यावी लागली. ह्या ढळढळीत सत्यामुळे भारताला आता चिंता करण्याची आवश्यकता आहे.

भारतात इस्लामिक थ्रेटची जी संभावना या आधी सरकार व इंटलिजन्स एजन्सीच्या आवाक्यात होती ती आता हाताबाहेर जाईल की काय ही शंका संरक्षणतज्ज्ञांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. त्यावर उपाय म्हणून इंटलिजन्स एजन्सींना स्थानिक मुस्लिम दहशतवादी संघटनांवर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. आयसिसचा प्रभाव भारतात सर्वदूर होत असला तरी खास करून केरळ, कर्नाटक, तामीळनाडूसारख्या दाक्षिणात्य राज्यांमध्ये ह्या संघटनेची पाळेमुळे खोलवर रुजली असून तेथील जिहादी संघटना आयसीसपासून मदत घेत असतील हे निःसंशय. इंटलिजन्स एजन्सींनी ह्या बाबत ‘ऑनलाईन ऍक्टिव्हिटी चेकिंग’ सुरू करून जमिनीवरील जिहादी संघटना बांधण्यांना उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.

ङ्गेसबुकवर मुस्लिम तरूणांचे ‘ऑनलाईन रॅडिकलायझेशन’ सुरु असते. फेसबुकवरील असे अकाउंट्स बहुतांशी पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेट समर्थक संघटनांद्वारे गल्फमधून चालवले जातात. केरळ, कर्नाटक, तामीळनाडू, बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि काश्मिरमधील तरुण हे या फेसबुक ग्रुपच्या रडारवर असतात. केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशात कार्यरत तरुणही यांचे लक्ष्य असतात. एनआयएने यामध्ये लक्ष घालण्याची नितांत आवश्यकता आहे.

एनआयएने आयसीस मॉड्युल चालवणार्‍या सहा लोकांचे एक टोळके नुकतेच उघडकीस आणले आहे. ही माणसे खोट्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून (फेक आयडेंटिटी) फेसबुक, ट्विटर, टेलिग्रामसारख्या सोशल मीडियावर प्रकर्षाने कार्यरत होती आणि हे उघडकीस येऊ नये म्हणून ती सतत आपले प्रोफाइल बदलत असत हे देखील आता उघड झाले आहे. एनआयएने पलक्कडच्या २९ वर्षीय रियास ए उर्फ रियास अबूबक्र उर्फ अबू दुजानाला आयसीसचा एजंट असल्यामुळे अटक केली. रियास हा श्रीलंकेच्या ईस्टर संडे बॉम्बिंगचा मास्टर माईंड झहरा हाशिमच्या भाषणांनी प्रभावित झाल्यामुळे २०१७ पासून त्याचा भक्त झाला. त्याच्यावर भडकावू भाषण देण्यात माहीर असलेल्या मौलवी झाकीर नाईकचाही प्रचंड प्रभाव आहे. केरळमधील १६ तरुणांना आयसीसमध्ये जायला मदत केल्यामुळे एनआयएने मध्यंतरी तीन तरुणांना अटक केली. महाराष्ट्र व उत्तर भारतात आयसीसच्या सदस्यांना हुडकून कैद करण्याची मोहीम सुरु झाली आहे, पण व्होट बँक काबीज करण्यासाठी काहीही करायला तयार असलेले असंख्य राजकारणी असलेल्या आणि जातीनिहाय राजकारणात मुरलेल्या देशात ती कितपत सफल होईल हे येणारा काळच सांगेल.

भारतातील ३५० वर तरुण आयसीससाठी लढले होते असा संरक्षणतज्ज्ञांचा अंदाज आहे. पण याला सरकारी दुजोरा मिळत नाही. मध्यंतरी, छत्तीसगढमध्ये नक्षली पोस्टरांवर जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या यासिन मलिकचे नाव दिसल्यामुळे नक्षली आणि जिहादी यांच्या अभद्र सांगडीची संभावना बळकट होऊ लागली आहे.

गढचिरोलीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या भल्या सकाळी नक्षल्यांनी ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर ज्या तर्‍हेने दुपारी बाराच्या सुमारास सी ६० कमांडोज एका सिव्हिल बसमध्ये तेथील पंचनाम्याच्या कारवाईसाठी जाणार ही खबर नक्षल्यांपर्यंत पोचवली गेली आणि ज्या सफाई व अचूकतेने ती बस उडवण्यात आली त्या कारवाईची तुलना पुलवामाच्या सीआरपीएफच्या कॉन्व्हॉयवरील जिहादी हल्ल्याशी केल्यास ते वावगे होणार नाही. दोन्ही हल्ल्यांमध्ये,नक्षली आणि जिहाद्यांची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) एक सारखीच होती. फक्त हल्ल्याच्या साधनांमध्ये फरक होता. दोन्ही हल्ल्यांमध्ये अतिशय आधुनिक पद्धतीच्या आयईडीचा वापर करण्यात आल्यामुळे त्या आयईडीज सीमापारच्या कुशल एक्सप्लोझीव्ह एक्सपर्टनी बनवल्या असाव्यात आणि आयसीसनी काश्मिरमधील हल्ल्यासाठी जैश ए महंमद आणि गढचिरोलीमधील हल्ल्यासाठी नक्षल्यांना मदत केली असा विचार केल्यास तो वावगा नसेल. त्यामुळे आभासी आणि भ्रामक इस्लामिक स्टेट निदान दक्षिण आशिया व भारतात तरी वैचारिक व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने जिवंत आहे असे म्हटल्यास ते चूक होणार नाही.

इस्लामिक स्टेटच्या सीरिया व इराकमध्ये लढलेल्या सैनिकांनी मायदेशी परतल्यावर इंडोनेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश आणि मलेशियात जबर हत्याकांड केले होते. श्रीलंकेतील ईस्टर बॉम्बिंग बरोबरच एप्रिलमध्येच अफगाणिस्तान व सौदी अरबमधील आत्मघाती हल्ल्यामध्ये अनुक्रमे २८ व १२ लोकांची हत्या आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये लष्करी छावणीवर हल्ला करून ९ सैनिकांचे शिरकाण यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटच्या अमक या मुखपत्राने स्वीकारली आहे. वर म्हटल्याप्रमाणे,भारतात जिहादी नक्षली सांगडीची संभावना डोके वर काढते आहे. यावरून एक लक्षात येते की इस्लामिक स्टेटच्या संदर्भात शहामृगाची भूमिका घेणे भारताच्या मुळीच हिताचे नाही!