‘आयसिस’विरुद्धचा संघर्ष संपला, युद्ध कायम

0
120
  • शैलेंद्र देवळाणकर

इराकने आयसिसविरुद्धचे युद्ध संपले असल्याचे जाहीर केले आहे. ही बाब आशादायक असली तरी आयसिसचा धोका अद्यापही कायम आहे. इराकनंतर ही संघटना अन्यत्र आपला मोर्चा वळवेल यात शंका नाही…

इराकचे पंतप्रधान हैदर अलाहाबादी यांनी इराक हा देश आयसिस मुक्त झाल्याची घोषणा नुकतीच केली आहे. ही ऐतिहासिक स्वरुपाची घोषणा आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेला हा संघर्ष आता संपुष्टात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. २०१४ मध्ये इराकमधील अस्थिरता, भ्रष्टाचार या सर्व पार्श्‍वभूमीवर इराकमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपले पाय पसरायला सुरुवात केली होती. उत्तर आणि पश्‍चिम इराकचा भाग आयसिसने आपल्या अधिपत्याखाली घेतला. या परिसराची लोकसंख्या ही तब्बल ४० लाख होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आयसिसच्या राजवटीखाली होते. त्याचबरोबर आयसिसने अन्यत्रही आपले पाय ठिकाणी पसरायला सुरुवात केली; पण त्यांचा जास्त प्रभाव हा उत्तर आणि पश्‍चिम इराकमध्ये होता. इराक आणि सीरियाची सीमारेषा हा वाळवंटाचा भाग आहे. तिथे आयसिसच्या लोकांना लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे, हे लक्षात आल्यानंतर हा सीमावर्ती भागही या दहशतवादी संघटनेने आपल्या नियंत्रणाखाली घेतला.
गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो या लष्करी संघटनेकडून इराकमध्ये आयसिस विरोधात हवाई हल्ले सुरू होते. दुसरीकडे इराकी ङ्गौजा जमिनीवरील संघर्ष करत होत्या. तब्बल १०० महिन्यांहून अधिक काळ हा संघर्ष सुरु होता. या काळात सुमारे ४० लाख लोक विस्थापित झाले.

हजारो लोक या युद्धसंघर्षात मारलेही गेले. मध्यंतरीच्या काळात इस्लामिक स्टेटने मोसूल हे इराकमधील महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले होते. काही महिन्यांपूर्वी हे शहर आयसिसच्या ताब्यातून मुक्त करण्यात आले. वस्तुतः, त्याच वेळी आयसिस संपल्याचे स्पष्ट झाले होते; मात्र सीरिया आणि इराकच्या सीमावर्ती भागात असणारे आयसिसचे वर्चस्व कायम होते. तिथून आयसिसला हुसकावून लावले जात नाही तोपर्यंत विजय घोषित करणे अवघड होते. अखेर सहा महिन्यांनंतर या वाळवंटी भागातून आयसिसला हुसकावण्यात यश आले आणि अखेर आयसिस इराकमधून नष्ट झाल्याची घोषणा करण्यात आली.

इस्लामिक स्टेट ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणूनच नावारुपाला आली होती. या संघटनेच्या बँक खात्यांमध्ये अब्जावधी डॉलर्स होते. त्यांच्याकडे सुमारे २१ हजार लढवय्ये सैनिक होते. यापूर्वीच्या काळात अल कायदासारखी आंतरराष्ट्रीय संघटना जगासाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र ही संघटना समोरासमोर युद्ध करणारी नव्हती, पण आयसिस मात्र समोरासमोर युद्ध करणारी, स्वतःचे सैन्य बाळगणारी, आव्हान देणारी, बँकांमध्ये खाती असणारी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना होती. एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या मदतीने विशेषतः समाजमाध्यमांच्या मदतीने आयसिसने जगभरात प्रचार-प्रसाराला सुरुवातही केली होती. त्यामुळे या संघटनेचा धोका दिवसेंदिवस वाढतच गेला. यातील सर्वांत मोठी धोक्याची बाब म्हणजे सुमारे २० देशांतील दहशतवादी संघटनांनी आयसिसशी आपली बांधिलकी घोषित केलेली होती. गेल्या वर्षी या संघटनेेने मोठा जाहीरनामा घोषित केला होता. त्यामध्ये संपूर्ण जगात खलिङ्गा किंवा इस्लामिक राजवट कसे स्थापन केले जाईल याचे उद्दीष्ट जाहीर केलेले होते. हे करत असताना या संघटनेने जगभरातल्या सुन्नी मुस्लिमांना आवाहन करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळत होता.

आङ्ग्रिकेसारख्या देशांबरोबरच गरीबी असणार्‍या इस्लामिक देशांकडूनही मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत होते. त्यामुळेच या संघटनेचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी अमेरिका, ङ्ग्रान्स, इग्लंड आणि काही युरोपीय देश यांनी मिळून तीव्र हवाई हल्ले केले होते. त्याचा परिणाम म्हणून इसिसने अमेरिका, युरोप इथेही हल्ले करायला सुरुवात केली होती. युरोपिय देशांमधील मुस्लिम निर्वासित स्थलांतरितांना आकर्षित करून, त्यांची माथी भडकावून त्यांच्या करवी या देशांमध्ये आयसिसकडून हल्ले घडवून आणले जात होते. या ‘होम ग्रोन टेररिझम’ने जागतिक समुदायाची आणि प्रामुख्याने पाश्‍चिमात्य राष्ट्रांची अक्षरशः झोप उडवली होती. या सर्व भीतीदायक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर इराकने केलेल्या घोषणेकडे पहायला हवे.

अर्थात, इराकने आयसिसमुक्त झाल्याची घोषणा केली असली तरीही ती केवळ ‘संघर्षसमाप्ती’ आहे; इसिस विरुद्धचे युद्ध मात्र सुरुच राहणार आहे. कारण युद्ध किंवा संघर्ष हा विचारांशी आहे. गुप्तचर विभागाकडून समोर आणण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही आयसिसचे २० हजार समर्थक इराकमध्येच विविध ठिकाणी लपून बसले आहेत. हे समर्थक गनिमी काव्याच्या पद्धतीने म्हणजेच आत्मघातकी बॉम्ब हल्ला, बेछुट गोळीबार अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पसरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयसिसविरोधातील युद्ध संपलेले नाही.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीरिया किंवा इराकमधून हुसकावून लावण्यात आल्यानंतर आयसिस आता इतर क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न निश्‍चितच करील. यासंदर्भात अल् कायदाचे उदाहरण घेता येईल. अल् कायदाचा उदय जरी सौदी अरेबिया, इजिप्तमध्ये झाला असला तरी नंतरच्या काळात या संघटनेने आपले मुख्यालय अङ्गगाणिस्तानमध्ये बनवले होते. तसाच प्रकार आयसिसबाबत घडू शकतो. कारण अजूनही अङ्गगाणिस्तानच्या सरकारचे तेथील परिस्थितीवर संपूर्णपणे नियंत्रण येऊ शकलेले नाही. तिथे अल कायदा आणि तालिबानी आहेतच पण आयसिसनेही आता तिथे शिरकाव केला आहे. मागील काळात ओसामा बिन लादेनने तोराबोरा पर्वतरांगामध्ये आसरा घेतला होता तशाच पद्धतीचा आसरा आयसिस तिथे घेऊ शकतो आणि त्याचा त्रास इतर देशांना होऊ शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे.

आयसिसने ङ्गेसबुक, युट्युब, टेलिग्राम, व्हॉटसऍप यांसारख्या नवसमाजमाध्यमांच्या मदतीने सर्वदूर आपल्या विचारसरणीचा प्रसार केला आहे. या प्रसाराचा प्रभाव अनेक ठिकाणी झाल्याचे दिसून आले आहे. हा धोका आजही कायम राहिला आहे. त्यामुळे आयसिसला आणि त्यांच्या विचारसरणीला मुळासकट उपटून काढले जात नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरुच राहणार आहे. यासाठी संपूर्ण आंतरराष्ट्रीय समूहाला कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सामूहिक आणि तीव्र इच्छाशक्ती दाखवत या समस्येला हाताळावे लागणार आहे. पश्‍चिम आशिया आणि जगाच्या इतर भागातील अल शबाब किंवा नायजेरियातील काही संघटना इसिसशी संबंधित आहेत. पाकिस्तानातील काही संघटना आयसिसशी संबंधित आहेत. त्यामुळे इराकमधून जरी आयसिसचे नामोनिशाण मिटवले असले तरीही त्यांचे जगातील अन्य दहशतवादी संघटनांचे असणारे लागेबांधे आणि त्यातून तयार करण्यात आलेले जाळे पाहता जगाला, विशेषतः दक्षिण आशियाई देशांना अधिक सजग रहावे लागेल.