आयटी पार्कसाठी चिंबलमधील जमिनीचे हस्तांतरण होणार

0
80

माहिती तंत्रज्ञान खात्याच्या चिंबल येथील नियोजित आयटी पार्कसाठी १.७० लाख चौरस मीटर जमीन हस्तांतरीत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला आहे.
सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून चिंबल येथे आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली जात आहे. परंतु, आयटी पार्कसाठी जागेचे हस्तांतरण करण्यात आले नव्हते. आरोग्य खात्याची चिंबल येथील १.७० लाख चौरस मीटर जमीन माहिती तंत्रज्ञान खात्याकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आयटी पार्कच्या जमिनीचा प्रश्‍न अखेर सुटला आहे.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल आणि गोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये इंटर्नशीप करणार्‍या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना महिना १० हजार रूपये विद्यावेतन दिले जाणारे विद्यावेतन २० हजार रूपये करण्यात आले आहे. बांबोळी येथील डेंटल कॉलेज व हॉस्पिटलमधील ज्युनियर निवासी डॉक्टरांच्या सध्याच्या १७ जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ज्युनियर निवासी डॉक्टरांना महिना ७५ हजार रूपये मानधन दिले जाणार आहे.

पेडणे येथे स्मशानभूमीसाठी ५०० चौरस मीटर जागा उपलब्ध करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. शेतकी खात्याची ५०० चौरस मीटर जागा पर्यटन खात्याकडे स्मशानभूमी उभारण्यासाठी हस्तांतरीत करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
– चिंबलमधील १.७० लाख चौ. मी. जमिनीचे आयटी पार्कसाठी हस्तांतरण
– गोमेकॉ इंटर्नशीप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ
– गोमेकॉ ज्युनियर निवासी डॉक्टरांना ७५ हजार रु. मासिक मानधन
– पेडणे स्मशानभूमीसाठी ५०० चौ. मी. जागा