आम्ही आणि धर्मकारण

0
147

– शरद दळवी
(उत्तरार्ध)
मंदिरे आणि भक्तांच्या गर्दीचे कारण म्हणजे समज वाढलेल्या माणसाला आपल्या दोषांची वाढती जाण किंवा टोचणी आहे. या गर्दीचे कारण वाढती श्रद्धा किंवा भक्ती नसावे. अर्थात काही अपवाद असतीलही.
आपल्या धर्मात बाह्यपूजेला ‘पार्थिव पूजा’ असा शब्द आहे. पार्थिव म्हणजे प्राणहीन किंवा मृत. याचा बडीवार धर्माच्या मक्तेदारांनी स्वार्थसाधनेसाठी वाढवला. अर्थात मक्तेदारी ही धर्मात असो, राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात वगैरे कोठेही असो, तिची उगम व विकासाची प्रेरणा स्वार्थसाधनाच असते. हे धर्माचे ठेकेदार विवेक – प्रामाण्याकडून शब्द प्रामाण्याकडे जनतेला नेतात. त्यांना अज्ञानांत ठेवतात. त्यामुळे त्यांचे हेतू सहजपणे साध्य होतात. मग फसवेगिरीला ऊत येतो.
‘धर्म’ या शब्दाचा ‘उपासना पंथ’ असा अर्थसंकोच झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ‘संस्कृती’ असा पर्यायी अर्थ दिला आहे. संस्कृती म्हणजे जीवनपद्धती. आज हिंदू धर्माची अवस्था ‘काप जाऊनी भोके उरली, जाये जीव…..’ अशी असली तरी तो टिकून आहे, त्याचे कारण मुळात लवचिकता, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक भान, मानवतावादी भूमिका वगैरे यामुळे धक्के पचवण्याची शक्ती त्यात आहे. पण एकीकडे विज्ञाननिष्ठ बुद्धिवाद व अतिरेकी संकल्पनांचा पाठपुरावा या द्वंद्वात धर्माचे काय होईल. मुळात गेली साठ वर्षे आम्ही निधर्मी (म्हणजे निधर्मी व पक्षपाती) धोरणांचा पाठपुरावा करून स्वतःचे अपार नुकसान करून घेतले आहे.
धर्म काढण्याचा प्रयत्न साम्यवादी रशियाने पाऊणशे वर्षे केला. तो फसला. माओ देखील ताओ आणि लाओना उखडण्यासाठी धडपडला. त्यालाही धर्माने हरवले. कारण एकच. माणसाला त्याची बुद्धी, भावना, परंपरा, संस्कार वगैरे कारणांनी उदात्ताची ओढ असते. ‘असतो ऽ मा सद्गमयम’ या वैदिक प्रार्थनेत ही मानवी भूमिका स्पष्ट होते. शासन, समाज, अथवा व्यक्ती निधर्मी असणे म्हणजे मानवतेकडून दानवतेकडे किंवा पशुत्वाकडे जाणे. आपण सर्वधर्मसमभावी असू शकतो, निधर्मी नाही आणि मुळात भारतीय संस्कृती किंवा वैदिक धर्म तसा सर्वसमावेशक व व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. त्यात कोणत्याही अतिरेकी कट्टरतेला स्थान नाही. धर्म हा जीवनाधार आहे. पण तो कर्मकांडावर नव्हे तर जीवनमूल्यांवर आधारित असायला हवा. आज हा मूळ माणूस-धर्म कालसापेक्ष स्वरुपात मांडून नवा एकसंघ व बलिष्ठ समाज घडवण्याची गरज आहे.
भारतीय धर्म कळपाचा धर्म नाही. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे आर्यसत्य तो जाणतो. व्यक्तीस्वातंत्र्य तो मानतो. त्यामुळे काही कारणांनी धार्मिक मक्तेदारी निर्माण झाली, तरी धर्मपीठे निर्माण झाली नव्हती. भारतात गौतम बुद्धाने प्रथम धर्माला सांघिक रूप दिले. बुद्ध धर्म आणि संघ यांना सर्वोच्च स्थान मिळाले.
बौद्धांच्या उदयाचे एक कारण होते. हिंदू धर्मातील अनाचार. मग आद्यशंकराचार्यांचा उदय झाला. धर्मशुद्धीचे काम करून भारताच्या चार दिशांना चार मठ स्थापन करून धर्माच्या शुद्धीचे, नियमनांचे व प्रसाराचे काम त्यांनी करावे असे ठरवून दिले. अर्थात हेही आम्ही परकीयांच्या संशोधित इतिहासांत शिकलो. खरे खोटे कोण जाणे. नंतर अनेक कारणांनी अनेक धर्मपीठे निर्माण झाली. बहुतेकांच्या निर्मितीमागे धर्मसाधना व लोकोद्धारापेक्षा आत्मोद्धाराची प्रेरणाच प्रबळ होती. त्यामुळे व्यक्तीला समाजात सन्मार्ग दाखविण्यासाठी त्यांचा क्वचित उपयोग झाला.
शंकराचार्यांच्या चार धर्मपीठांपैकी द्वारकेचे पीठाधीशांनी श्री साईबाबांची मंदिरांतून हकालपट्टी करण्याचे आज्ञापत्र जारी केले. शंकराचार्यांच्या या आदेशामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे अशा एखाद्या संस्थेचे अस्तित्व अनेक हिंदूंना समजले. दुसरे म्हणजे ते धर्मासंबंधी कधी तरी काही तरी विचार करतात, हे कळले. खरेतर आजचा हिंदूधर्म खर्‍या धर्मतत्वापासून दुरावला आहे. त्यात कलह, विभाजन वगैरेमुळे बजबजपुरी माजली आहे. अशावेळी नव्या वादंगाला तोंड फोडणे, त्यासाठी टोकाची भूमिका घेणे हे त्यांच्यासारख्या थोर पदावरील व्यक्तीला कितपत शोभणारे आहे? आणि ते मूळ धर्मतत्वाशी कितपत सुसंगत आहे?
भारतीय बौद्धिक धर्म (मूळ हिंदू धर्म) तत्त्व आणि तपशीलामध्ये सर्वसमावेशक आहे. अनार्यांची तांत्रिक उपासना वगैरेंचा स्वीकार धर्माने केला. इतर अनेक गोष्टी कालमानाने स्वीकारल्या. त्यातील अनेक गोष्टी कालप्रवाहात बदलल्या किंवा नष्ट झाल्या. लवचिकता व सर्वसमावेशकता ही याची मोठी शक्ती आहे. म्हणून तो अनेक त्सुनामींत टिकून आहे. चौकटबंद केल्याने तो निःसत्व व निर्जीव होईल, हे धर्ममार्तंड विसरले?
भारतीय धर्म ‘मन चंगा, तो कठौती में गंगा’ असे मानतो. ‘भाव तेथे देव’ ही धर्माची भूमिका आहे. म्हणून आपण सुपारीत श्रीगणेश वा नारळात शिवशंकर पाहतो. सुपारीचा आकार किंवा नारळाचा प्रकार शोधत नाही. ‘श्रद्धावान लभते नरः’ असे भक्तीचे सूत्र आहे. ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधायचे नसते. मग साईंच्या बाबतच आणि अचानक हा उद्रेक का? याविषयी चर्चेचे गुर्‍हाळ कोणत्या तरी वाहिनीवर अद्याप सुरू असते. कारण त्याला टी.आर.पी. असतो. शिमगा संपला तरी त्याचे कवित्व सुरूच आहे. पण या सार्‍याचा उपयोग धर्मशुद्धीकरणांत किंवा धर्मविकासात कसा व किती? संतांनी पुण्य-परउपकार, पाप ते परपीडा’ असे सोपे प्रमेयही सांगितले. ते संस्कार, माणुसकीच्या धर्माची प्रतिष्ठा या प्रकरणामुळे कितपत होईल? की तात्पुरते पेल्यातील वादळ अथवा धर्मातले नवे विभाजन असेल?
असली खेंगटी काढण्यापेक्षा धर्मातील विकृती काढून माणुसकीवर आधारलेल्या व माणसाला देवत्वाकडे नेणार्‍या खर्‍या धर्माची मुळे रुजवण्याची गरज आहे. ज्ञान विज्ञानामुळे मानव आज देव आणि दानवाची म्हणजे निर्माण व विनाशाची शक्ती घेऊन उभा आहे. भोगवादामागे धावतो आहे. त्यापायी दानवी क्रौर्य दाखवतो आहे. त्यांना भोगवाद, क्रौर्य आणि स्वार्थापासूम दमन, दया आणि दान या दिशेने वळवण्याची गरज आहे.
हे सारे मापमोचन किंवा अन्य लाभा-लोभापायी नव्हे तर माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहे हे त्याला पटण्याची गरज आहे. धर्म हा निःस्पृह, मानवाभिमुख व दैनंदिन जीवनाचा घटक बनला पाहिजे. त्यातल्या विकृती कठोर निश्‍चयाने व सापेक्षी काटेकोरपणे काढायला हव्यात. धर्माचार्य आणि धर्मसंसदेचे खरे कार्य ते आहे. प्रश्‍न एवढाच आहे की, हा बदल आपण सारे समजून करणार आहोत की नव्या शंकराचार्यांची किंवा अवताराची वाट पाहणार आहोत?