आमाशयाचा कर्करोग भाग – ३

0
155

– डॉ. स्वाती अणवेकर
(म्हापसा)

आहारात मांसाहार कमी व भाजी, फळे यांचा वापर अधिक करावा.
दारू, सिगार, तंबाखू यांचे सेवन करू नये. अत्यंत तिखट मसालेदार पदार्थ आहारात कायम घेऊ नये.

या भागात आपण आमाशयाच्या कर्करोगाचे निदान कसे करावे ते पाहूया.
१) ईसोफॅगोस्कोपी, २) सी.टी.स्कॅन, ३) आमाशय व्रणाची बायॉप्सी.
वरील सर्व चाचण्या वापरून आमाशयाच्या कर्करोगाचे निदान केले जाते.
आता आपण ‘ऍडिनोकार्सिनोमा’ कर्करोगात केले जाणारे उपचार जाणून घेऊया.
या कर्करोगात फक्त एक तृतियांशपेक्षा कमी रुग्णांमध्ये संपूर्ण गाठी व त्याच्या जवळच्या लसिका ग्रंथी काढल्याने रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
पार्शल गॅस्ट्रेक्टॉमी – ही उपचार पद्धती आमाशयातच पण दूर असणार्‍या कर्करोगात रुग्णामध्ये केली जाते.

टोटल गॅस्ट्रेक्टॉमी – ही उपचारपद्धती जवळ असणार्‍या ट्यूमरसाठी केली जाते.
लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रेक्टॉमी देखील फायदेशीर ठरते.
आमाशयाच्या ऍडिनोकार्सिनोमा हा ट्यूमर ‘रेडिओरेझिस्टंट’ असतो, त्यामुळे यात बर्‍याच उच्च प्रतीचा रेडिएशनचा डोज द्यावा लागतो. हा असा डोज आमाशयाजवळ असलेल्या इतर अवयवांसाठी घातक ठरू शकतो. म्हणून या कर्करोगात रेडिएशनचा उपयोग फक्त वेदना शमन करायला केला जातो.
संपूर्ण आमाशय काढून जरी रुग्णाला फक्त रेडिएशन दिले तरी त्याचे आयुर्मान वाढण्याची शाश्‍वती नसते. ३० ते ५० टक्के रुग्ण ज्यांचा आजार अगदी पुढच्या अवस्थेत पोहचला आहे त्यांच्यात किमोथेरपी वापरतात पण त्याचेदेखील मिश्र परिणाम दिसतात.
जे रुग्ण संयुक्त उपचार घेतात त्यांचे आयुर्मानही १२ महिन्यांपेक्षा कमी असते. पण ही संयुक्त उपचारपद्धत जर शस्त्रक्रियेआधी व नंतर तसेच शस्त्रक्रिया झाल्यावर लगेच रेडिएशनसोबत दिली गेली तर मात्र रोगाचा पुनरुद्भव कमी होतो व रुग्णाचे आयुर्मानही वाढते.
आमाशयाच्या प्राथमिक अवस्थेतील लिंफोमा –
हा फार दुर्मिळ प्रकारचा आमाशयाचा कर्करोग आहे. हा फक्त १५% रुग्णांमध्ये आढळतो. पण तसे पाहता मागील ३५ वर्षांत याचेदेखील प्रमाण बरेच वाढले आहे. आमाशयाचा लिंफोमा व ऍडिनोकार्सिनोमा यात फरक करणे कठीण आहे. हे दोन्ही ट्यूमर्स वयाच्या साठाव्या वर्षानंतर शरीरात आढळून येतात. दोघांची लक्षणेही सारखीच असतात. बायॉप्सी केल्यावरच यातील फरक जाणवू शकतो. ही बायॉप्सी गॅस्ट्रोस्कोपी अथवा लॅप्रॉटॉमी करताना केली जाते व त्यावरूनच याचे निदान होऊ शकते.
यात जर बायॉप्सी उथळपणे केली गेली तर मात्र याचे निदान होणे कठीण आहे कारण यात बायॉप्सी करताना खोलवर असलेल्या लसिका ग्रंथींमधून पेशी काढाव्या लागतात.

एच-पायलोरी या जिवाणूंचे संक्रमण झाल्यास मात्र आमाशयात लिंफोमा होण्याचा धोका वाढतो. याच्यावर उपचार करणे हे ऍडिनोकार्सिनोमा या कर्करोगावर उपचार करण्यापेक्षा चांगले कारण यात रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतो. एच-पायलोरी या जिवाणुंचे संक्रमण कमी करण्यासाठी दिले जाणारे अँटीबायोटिक्स हे आमाशयागत लिम्फोमा होण्याचा धोका ७५ टक्क्यांनी कमी करण्यास मदत करतात. जे रुग्ण अँटीबायोटिक्सना उत्तम प्रतिसाद देतात त्यांची विशिष्ट कालावधीनंतर एन्डोस्कोपी तपासणी करून, हा कर्करोग पूर्णपणे नष्ट झाला आहे का, त्याची तीव्रता कमी होऊन तो शरीरात आहे का हे तपासून पाहणे गरजेचे असते. ४० ते ६०% रुग्ण ज्यांचे जवळजवळ पूर्ण आमाशय हे शस्त्रक्रिया करून काढले जाते ते रुग्ण ५ वर्षे जगतात.

आमाशयागत सार्कोमा –
आमाशयागत ट्यूमरमध्ये याचे प्रमाण १-३% इतके आढळते. याची सुरुवात आमाशयाच्या छातीजवळील भागात पुढील अथवा मागील भिंतीजवळ व्रण अथवा रक्तस्राव या स्वरूपात आढळते. हा ट्यूमर क्वचितच बाजूच्या अवयवात व लसिका ग्रंथीमध्ये प्रसार पावतो. पण हा यकृत वा फुप्फुसात मात्र प्रसार पावतो. यावर केले जाणारे उपचार म्हणजे आमाशयाची शस्त्रक्रिया व जर हा जास्त प्रसार पावला असल्यास किमोथेरपी.

आमाशयाच्या कर्करोगापासून बचाव कसा कराल?….
१) आहारात मांसाहार कमी व भाजी, फळे यांचा वापर अधिक करावा.
२) दारू, सिगार, तंबाखू यांचे सेवन करू नये.
३) अत्यंत तिखट मसालेदार पदार्थ आहारात कायम घेऊ नये.
४) ताजे सकस अन्न जेवावे.