आमदारांच्या आश्‍वासनानंतर पॅरा शिक्षकांचे आंदोलन स्थगित

0
104

२० दिवसात योग्य तोडगा काढून त्याबाबतचे परिपत्रक पॅरा शिक्षकांना देण्याचे स्पष्ट आश्‍वासन कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल व सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी दिल्यानंतर पॅरा शिक्षकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहेे. आज शनिवारपासून सर्व पॅरा शिक्षक सेवेत रूजू होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी कायम स्वरूपी तोडगा न काढल्याने नाराज बनलेल्या पॅरा शिक्षकांची भाजपचे आमदार काब्राल आणि सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी पर्वरी येथे भेट घेऊन त्यांना सेवेत नियमित करण्याच्या मागणीचा पाठपुरावा करण्याचा आश्‍वासन दिले आहे. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या पॅरा शिक्षकांना आगामी वर्षापासून सेवेत नियमित केले जाईल. तसेच पगार वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर, शिक्षण खात्याच्या संचालकांशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. पॅरा शिक्षकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. पॅरा शिक्षकांचे विविध प्रश्‍न सेवेत रूजू झाल्यानंतर सोडविण्यात येतील, अशी ग्वाही आमदार काब्राल यांनी दिली.

पर्वरी येथे सचिवालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरूवारपासून आंदोलन करणार्‍या पॅरा शिक्षकांना हुसकावून लावण्यासाठी अखेर म्हापसा येथील दंडाधिकार्‍यांना सचिवालयाच्या परिसरात शुक्रवारी जमावबंदीचा आदेश लागू करावा लागला. दरम्यान, गोवा सर्व शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालकांनी पॅरा शिक्षकांना सेवेत रूजू होण्याबाबतचा आदेश शुक्रवारी जारी केला. शनिवार २५ नोव्हेंबर किंवा पूर्वी सेवेत रूजू होणार्‍या पॅरा शिक्षकांना ऑफर पत्रानुसार सेवेत कंत्राटी पध्दतीवर घेतले जाणार आहे. जे पॅरा शिक्षक दिलेल्या मुदतीत सेवेत रूजू होणार नाहीत. त्याची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती ऑफर पत्रे रद्द होतील. निर्धारीत मुदतीत सेवेत रूजू होणार्‍या पॅरा शिक्षकांना ऑन लाईन पोर्टलवर सहा महिन्याचा एनआयओएस अभ्यासक्रम नोंदणीसाठी मान्यता दिली जाणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे. पॅरा शिक्षकांच्या मागणीवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात न आल्याने नाराज बनलेल्या पॅरा शिक्षकांनी गुरूवारी दुपारपासून सचिवालयाच्या मुख्य फाटकाजवळ धरणे आंदोलन सुरू केले होते. गोवा प्रदेश महिला कॉँग्रेसने पॅरा शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सचिवालयातील मुख्य प्रवेशद्वार अडविले. पॅरा शिक्षकांना प्रवेशद्वारावरून दूर करण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न अयशस्वी झाला. शुक्रवारी सकाळी पॅरा शिक्षक पुन्हा एकदा सचिवालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्रित झाले. पॅरा शिक्षकांना सचिवालयाच्या परिसरातून हटविण्याचा प्रयत्न फोल ठरल्याने अखेर न्यायदंडाधिकार्‍यांना खास जमावबंदीचा आदेश लागू करावा लागला. या आदेशामुळे पॅरा शिक्षकांना सचिवालयातून परिसरातून बाहेर जावे लागले. महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो व इतर पदाधिकारी पॅरा शिक्षकांना पाठिंबा दिला. पॅरा शिक्षक आणि महिला कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालक गजानन भट यांची भेट घेऊन पॅरा शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याबाबत एक निवेदन सादर केले.

पॅरा शिक्षकांची मागणी रास्त
गेली १२ वर्षे पॅरा शिक्षक म्हणून सेवा बजावणार्‍या पॅरा शिक्षकांची सेवेत नियमित करण्याची मागणी रास्त आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पॅरा शिक्षकांना पाठिंबा दिला. पॅरा शिक्षकांना केवळ राजकीय हेतूने पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत काल केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पॅरा शिक्षकांना जून २०१७ पासून सेवेत सामावून घेण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे. या आश्‍वासनाची पूर्तता करण्यास भाजप सरकारला यश प्राप्त झाले नाही. भाजपकडून पॅरा शिक्षकांच्या मागणीच्या पूर्तीसाठी केवळ तारीख पे तारीख देण्याचे काम केले जात आहे, असा आरोप कुतिन्हो यांनी केला. न्यायासाठी आंदोलन करणार्‍या पॅरा शिक्षकांना हुसकावून लावण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा कॉँग्रेस पक्षाने निषेध केला आहे.