‘आबासाहेब’ न झालेले आबा

0
130

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री राहिलेले लोकप्रिय नेते आर. आर. पाटील काल अनंतात विलीन झाले. एक साधा, मिश्कील, परंतु परिपक्व नेता म्हणून आर. आर. महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरत्चंद्र पवार यांचा वारसा सांगत राजकारणात आलेले आर. आर. उपमुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले, परंतु ‘आबा’चे कधी ‘आबासाहेब’ झाले नाहीत. चपलेच्या जागी बूट आले नाहीत. एकदा चीन दौर्‍यावर जाताना बूट घालायची वेळ आली तर बुटाची लेस कशी बांधतात हे त्यांना ठाऊक नव्हते. एवढा जन्मजात साधेपणा त्यांनी तहहयात जोपासला. त्यांना मंत्री झाल्यावर बंगला मिळाला, पण तेथे त्यांनी कधी कुटुंब आणले नाही. त्यांची मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकली. तिला त्यांनी कॉन्व्हेंटमध्ये घातले नाही. ते गृहमंत्री असताना त्यांचा भाऊ पोलीस दलात होता, परंतु त्याच्यावर काही विशेष मेहेरबानी झाली नाही. मंत्रालयातही ते भाकरी – पिठलेच खायचे. आजच्या राजकारण्यांकडे पाहताना हे सगळे एखाद्या दंतकथेतल्यासारखेच वाटू लागते. तळागाळातल्या माणसाशी त्यांचे मैत्र मंत्री झाल्यावरही अखंड होते. सत्ता, पैसा येतो आणि जातो, परंतु जोडलेली हीच खरी संपत्ती असते, असे मानणार्‍या या नेत्याने आपल्या अल्प राजकीय कारकिर्दीतही जी धमक दाखवली ती विलक्षण आहे. आज नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ चा फार गवगवा होतो आहे, परंतु ज्या गाडगेबाबांनी खराटा घेऊन गाव आणि गावच्या माणसांची मने स्वच्छ केली, त्यांच्याच नावाने ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ सारखे अनोखे अभियान राबवून ग्रामविकास मंत्री असताना आबांनी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांच्या स्वच्छतेचा वसा तेरा वर्षांपूर्वीच घेतला हे विसरून चालणार नाही. गाडगेबाबांचे तैलचित्र, झाडू आणि कटोरा त्यांनी आपल्या मंत्रालयातल्या दालनातही ठेवला होता. त्यांची तंटामुक्ती मोहीमही गाजली. जातीपातीच्या राजकारणात अडकलेल्या गावांना तंटामुक्त करण्याचा हा विचारच मुळी क्रांतिकारक होता आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस आबांनी दाखवले. विकासाच्या वाटेवरच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी राजकारणात शर्यत लागते, परंतु आबांनी पालकमंत्रिपद मागितले ते सर्वांत मागास अशा गडचिरोलीचे. नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या गडचिरोलीमध्ये विकासकामे राबवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि नक्षलवाद्यांची तमा न बाळगता स्वातंत्र्यदिनी स्वतः तेथे ध्वजारोहण करण्याचे धैर्यही दाखवले. ज्यांनी आयुष्यात कधी शहर पाहिले नव्हते, अशा दुर्गम भागातील पन्नास मुलांना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची सोयही आबांनी करून दिली होती. आबा मृत्युशय्येवर आहेत असे या मुलांना जेव्हा समजले, तेव्हा पुण्याहून आळंदीला पायी जाऊन त्यांनी ज्ञानोबा माऊलीच्या चरणी आबांच्या स्वास्थ्याचे मागणे मागितले. आबांचा सर्वांत गाजलेला निर्णय होता तो डान्स बार बंदीचा. डान्सबारमध्ये उधळायला पैसे देत नाही म्हणून मुलाने आजीची हत्या केल्याचे त्यांनी वृत्तपत्रात वाचले आणि क्षणार्धात डान्स बार बंदीचा निर्णय घेऊन टाकला. आलेल्या प्रचंड दबावाला ते बधले नाहीत. मात्र, जेव्हा न्यायालयाने ही बंदी उठवली, त्या निवाड्यानंतर व्यथित झालेले आबा त्या दिवशी जेवले नाहीत, एवढी जातिवंत कळकळ या माणसापाशी होती. आबांचे वक्तृत्वही भन्नाट होते. शाळेत केवळ रोख बक्षीस मिळते म्हणून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार्‍या आबांचे वक्तृत्व बहरत गेले. हसत खेळत चिमटे काढत चालणारी आर. आर. यांची विधिमंडळातली भाषणे विरोधकांनाही प्रिय असत. सेना भाजपचे सरकार असताना हीच मुलुखमैदान सत्ताधार्‍यांवर तुटून पडली होती. मुंबई हल्ल्यानंतरच्या त्यांच्या वक्तव्याची टर उडवली गेली, परंतु कसाबला फासावर चढवले गेले तेही आबांच्याच कारकिर्दीत. अत्यंत शांत, संयमी असलेल्या याच आबांना आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या बायकोकडून दाखल्यासाठी एका अधिकार्‍याने दोन हजार रुपये उकळले हे कळताच त्यांनी दुसर्‍याच क्षणी त्या अधिकार्‍याला निलंबित केले होते. असा हा साधा, परंतु कर्तव्यदक्ष, प्रामाणिक माणूस प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या वाटेने निघून गेला आहे. मागे त्यांच्या नावाचा साखर कारखाना नाही, दूध संघ नाही वा एखादी सहकारी संस्थाही नाही. मागे उरले आहेत त्यांच्या साधेपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे ह्रद्य दाखले…