‘आप’ चे आगमन

0
89

गोव्याच्या राजकारणात कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे आजवर रिकामी राहिलेली पर्यायाची पोकळी भरून काढण्याचा चंग आम आदमी पक्षाने बांधला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या उद्याच्या जाहीर सभेने ‘आप’चा आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. गेले काही दिवस गोव्यात ज्या प्रकारे जळी – स्थळी केजरीवालांच्या छब्या झळकत आहेत, ते पाहिल्यास संपूर्ण गोवा केजरीवालमय झाल्याचा आभास निर्माण करण्यात आम आदमी पक्ष यशस्वी झाला आहे, परंतु यामागे खरी संघटनात्मक ताकद किती आणि निव्वळ जाहिरातबाजी किती हा प्रश्न आहे. गोव्यात ‘आप’ चे आगमन झाल्यापासून आजतागायत हा पक्ष आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण आणि समाजकारणात लुडबूड करू इच्छिणार्‍या मोजक्या व्यावसायिकांच्या दावणीला बांधला गेलेला दिसतो. त्यांना आपली समाजकारणाची आणि राजकारणाची हौस भागवण्यासाठी ‘आप’ हे सोईचे साधन बनले आहे. पण अशा लोकांमागे यत्किंचितही जनाधार नसतो. सोशल मीडियावर बौद्धिक चर्चा झोडण्यापलीकडे त्यांचा उपयोगही नसतो. अशा मंडळींच्या मदतीने पक्ष तळागाळात रुजेल अशी अपेक्षा करणे फोल आहे. आता समन्वयकांची जी यादी नुकतीच जाहीर झाली आहे ती पाहिल्यास, कोणीही यावे आणि आम आदमी पक्षाची ‘पांढरी टोपी’ घालून स्वतःची छबी उजळून घ्यावी हा जो प्रकार देशभरात चालला आहे, त्याचीच पुनरावृत्ती येथेही दिसून येते. इतर पक्षांमध्ये संधी न मिळालेली काही मंडळीही ‘आप’च्या आसर्‍याला आली आहेत. हौशा – गवशा – नवशांची पक्षापाशी ददात नाही, पण ज्या ‘आम आदमी’चे नाव घेऊन हा पक्ष उभा राहिला त्या गोव्यातील ‘आम आदमी’ पर्यंत हा पक्ष पोहोचू शकलेला आहे का? त्याच्या ह्रदयाला तो साद घालू शकलेला आहे का? ‘आप’ ला जाहिरातबाजीची उदंड हौस आहे. कोट्यवधी रुपये खर्चून प्रसारमाध्यमांमधून केजरीवालांची छबी सतत झळकवण्याचा हा प्रकार तामीळनाडूतील ‘अम्मां’च्या जातकुळीचाच आहे. परंतु केवळ जाहिरातबाजीवर पक्ष उभा राहात नसतो. त्यासाठी पक्षसंघटना मजबूत असावी लागते. ती उभी करण्याची ताकद या समन्वयकांमध्ये आहे का याचे उत्तर येत्या काही दिवसांत गोव्याला मिळणार आहे. केजरीवालांप्रतीच्या कुतूहलापोटीही लोक उद्याच्या सभेला येतील, परंतु ही गर्दी हा पक्षाचा जनाधार मानता येणार नाही. राज्यातील दोन लाख लोकांपर्यंत ‘आप’ पोहोचल्याचा दावा केला जात असला, तरी ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने बूथ पातळीवर स्वतःची संघटना उभारली, त्या प्रकारे स्वतःची संघटनात्मक ताकद निर्माण केल्याखेरीज ‘आप’ गोव्यात केवळ भंपक जाहिरातबाजीच्या आधारे आपला प्रभाव दाखवू शकणार नाही. सध्या देशभरात कॉंग्रेसची पीछेहाट चालली आहे. तिसर्‍या आघाडीचा प्रभाव काही राज्यांतच आहे. त्यामुळे उर्वरित भारतामध्ये पर्यायी स्थान भरून काढण्यासाठी ‘आप’ने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. पंजाबमध्ये ‘आप’ ला ११७ पैकी १०० जागा मिळतील असा निष्कर्ष सी – व्होटरने काढल्यापासून ‘आप’ मध्ये उत्साह नुसता फसफसतो आहे. पंजाबप्रमाणेच गोवाही ‘आप’ साठी प्रयोगभूमी आहे. भाजपचा द्वेष करणारा आणि कॉंग्रेसने भ्रमनिरास केलेला एक मोठा वर्ग गोव्यात आहे. त्यामुळे ‘आप’ ला गोव्यात संधी निश्‍चितपणे आहे. ती जागा पटकावण्यासाठी गोवा फॉरवर्डही धडपडतो आहे. उशिरा का होईना, कॉंग्रेसही आता जागी झालेली दिसते, परंतु मशाल यात्रा काढताना त्या मशालीच्या उजेडात त्यांनी आधी पक्षातला अंधार दूर सारायला हवा. ‘आप’ समोर जी संधी आहे, तिचा लाभ उठवण्यासाठी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एकेक मुद्दा हाती घेऊनच पुढे जावे लागणार आहे. परंतु अद्याप महत्त्वाच्या विषयांत ‘आप’ने आपली भूमिकाच जाहीर केलेली नाही. सध्या पेटलेल्या शैक्षणिक माध्यम प्रश्नावर ‘आप’ ची भूमिका काय? तो विषय दुय्यम असल्याचे भासवून ‘आप’ ला आपला पाय काढून घेता येणार नाही. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर अण्णा हजारेंना टांग मारून केजरीवालांनी हा पक्ष स्थापला, परंतु गोव्यातील ‘जायका’ सारख्या प्रकरणात ‘आप’ने आजवर मौनच स्वीकारले आहे. ‘बाबूश’ प्रकरणात केवळ त्या अल्पवयीन मुलीला संरक्षण पुरवा एवढे सांगून ‘आप’ गप्प राहिला. रापणकारांच्या आंदोलनानंतर ‘रॅली’ काढल्याने पक्षाचे कर्तव्य संपले काय? राज्यात स्वतःचे स्थान निर्माण करायचे असेल तर ‘आप’ ला असे विविध सामाजिक प्रश्नांच्या काठावर राहता येणार नाही. खोल पाण्यात उतरावेच लागेल.