‘आप’नेच भाजपबरोबर युती केली होती ः गोवा फॉरवर्ड

0
90

गोवा फॉरवर्ड पक्षाने नव्हे तर आम आदमी पार्टीनेच भाजपबरोबर छुपी निवडणूकपूर्व युती केली होती. ही युती करून बिगर भाजप मतांची विभागणी करण्याची त्यांची योजना होती. गोवा फॉरवर्ड पार्टी जर रिंगणात नसती तर आम आदमी पार्टीला सुमारे २० टक्के मते मिळाली असती व त्याचा फायदा होऊन भाजपला कमीत कमी २१ जागा मिळाल्या असत्या, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोवा फॉरवर्ड पार्टीने भाजप बरोबर निवडणुकीपूर्वीच छुपी युती केली होती असा आम आदमी पार्टीने जो आरोप केला होता त्यासंबंधी डिमेलो हे बोलत होते.

भाजप आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम हा निव्वळ फार्स असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांचे संगनमत लोकांना मुर्ख बनवीत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल डिमेलो बोलत होते.

सरकारच्या किमान समान कार्यक्रम हा विकासासाठी नव्हे तर भ्रष्टाचारासाठी आहे, असा आरोपही आम आदमी पार्टीने केला होता. त्यासंबंधी बोलताना ट्रोजन डिमेलो म्हणाले की, केवळ ‘गोंय, गोंयकार व गोंयकारपण’ यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी निवडणुकीनंतर भाजपबरोबर युती केली. तसेच त्यासाठी मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून किमान समान कार्यक्रम तयार केला.