आनंद-पर्वणी कोजागरी

0
217

 – लक्ष्मण कृष्ण पित्रे इंट्रो…

आपण वाढदिवसाला शुभेच्छा व्यक्त करताना म्हणतो, ‘जीवेत् शरद: शतम्‌|’ म्हणजे संबंधित व्यक्ती शंभर शरद् ऋतू जगो. याचा अर्थ शंभर वर्षे असाच असतो. पण शरद ऋतू हा अत्यंत आल्हाददायक, आनंदकारक असल्यामुळे सबंध वर्षाचा उल्लेख शरद् ऋतुच्या नावे इथे करण्यात आला. पावसाळ्याचे ढगाळ कुंद वातावरण बदलून जेव्हा शरद् ऋतू येतो तेव्हा आश्‍विन व कार्तिक महिन्यात खरोखरच मन अत्यंत उत्साहित होते. पावसाळी गढूळपणा जाऊन सर्व सृष्टीवर शुभ्रतेची झळाळी चढलेली दिसते. महाकवी कालिदासाला शरद ऋतू म्हणजे एक नवपरिणीता वधुच वाटते – प्राप्ता शरद नववधूखि रूपरम्या (- ऋतुसंहार) या शरद ऋतूतील दोन्ही पौर्णिमांना चंद्राचे तेज अवर्णनीयच असते. त्यातल्या त्यात आश्‍विन पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा ही खासच. मला एक भावगीत या प्रसंगी नेहमी आठवते – ‘शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंध| नाचतो गोपीजनवृंद वाजवी पावा गोविंद|’ आणि मग शरद पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात चाललेली श्रीकृष्णाची गोपींसमवेत रासलीला डोळ्यांसमोर साकार होऊ लागते! हा शारदीय चंद्रकलेचा आनंद घेण्यासाठीच कोजागरीचा उत्सव साजरा केला जातो. प्राचीन काळापासून तो साजरा होतो. आश्‍विन पौर्णिमेस साजरा होत असलेल्या या लोकोत्सवाला ‘कौमुदीमहोत्सव’ (- वात्स्यायन) असे नाव होते. वामन पुराणात या उत्सवाला ‘दीपदानजागरण’ असे म्हटले आहे. (कौमुदी म्हणजे चांदणे, त्याच्याशी संबंध उत्सव म्हणून कौमुदीमहोत्सव.) या उत्सवप्रसंगी सार्‍या नगरात उत्साहाचे वातावरण असे. रस्ते स्वच्छ केले जात. घरादारांवर गुढ्या उभारल्या जात. फुलांच्या माळांनी घरे शृंगारली जात आणि रात्री दीपाराधना केली जाई. नृत्यगीताच्या मैफली साजर्‍या होत आणि द्यूतही या प्रसंगी खेळण्यास मुभा होती. आज या उत्सवाच्या धार्मिक अंगाचा विचार करायचा, तर या रात्री, लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा केली जाते. नमस्ते सर्वदेवानाम् वरदासि हरिप्रिये| या गतिस्त्वत्प्र पन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्‌॥ या मंत्राने लक्ष्मीदेवीला, तर विचित्रैरावतस्थाय भास्वत्कुलिश पाणये| पौलौम्यालिंगितांगाय सहस्राक्षाय ते नम:॥ या मंत्राने इंद्राला पुष्पांजली अर्पण केली जाते. त्यानंतर पोहे आणि नारळाचे पाणी देवपितरांना अर्पण करून आप्तेष्टांना देतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून ते सर्वजण प्राशन करतात. रात्रौ जागरण करून फाशांनी द्युत खेळतात. या प्रसंगी मध्यरात्री साक्षात् लक्ष्मी चंद्र मंडलातून भूतलावर उतरते आणि ‘को जागर्ति?’ असा प्रश्‍न विचारित संचार करते. जो जागा असेल त्याला धनधान्य समृद्धी देते अशी श्रद्धा आहे. कोजागरीची एक मनोरंजक कथा पुराणांतरी आढळते. वलित नावाचा एक गरीब ब्राह्मण असतो. त्याची बायको कजाग असते. नवरा म्हणेल त्याच्या बरोबर उलट वागण्यात तिला आनंद होत असे. त्यामुळे खिन्न होऊन बसला असता त्याच्या मित्राने त्याला त्यावर एक उपाय सांगितला, ‘अरे तुझ्या मनात जे असेल त्याच्या बरोबर उलटे तू तिला सांग. म्हणजे त्याउलट म्हणजे तुला हवे तसेच ती वागेल.’ ही त्याची मात्रा बरोबर लागू पडली. एकदा त्याच्या पूर्वजांच्या श्रद्धाचा प्रसंग आला. वलिताने मुद्दामच पूर्वजांबद्दल अनास्था दाखवून, श्राद्ध करायची गरज नाही असे म्हटले. बायकोने बरोबर उलटे केले. म्हणजे व्यवस्थित तयारी करून ब्राह्मणांना बोलवून सुग्रास भोजन वगैरे दिले. श्राद्धानंतर पिंड विसर्जन करण्याची वेळ आली तेव्हा वलित बायकोला म्हणाला, ‘अगं, हे पिंड पवित्र ठिकाणी विसर्जित कर!’ इथं खरं तर तो चुकला! ‘घाणीत टाक’ म्हटले असते तर तिने पवित्र ठिकाणी टाकले असते. पण ब्राह्मणांसमोर तसे कसे म्हणणार? परिणाम मात्र विपरीत झाला. बायकोने सांगितले त्याच्या उलट केले. म्हणजे पिंड अपवित्र ठिकाणी टाकले! या प्रसंगामुळे खिन्न होऊन तो अरण्यात गेला ती रात्र आश्‍विन पौर्णिमेची होती. आणि त्या रानात यक्षस्त्रिया, अप्सरा द्यूत खेळत होत्या. त्यांनी याला भिडू केले. त्याच्यावर ‘कोजागर्ति’ म्हणणारी लक्ष्मी प्रसन्न झाली, आणि तो वैभवसंपन्न झाला अशी ती कथा आहे. खरं म्हणजे ‘उत्सवप्रिय: खलु मनुष्य:’ असे वचन आहे. आश्‍विन महिन्यात पावसाळा संपून निरभ्र आकाशात चांदणे स्वच्छ पडते. त्यावेळी त्या चांदण्याचा आनंद घेण्यासाठी या उत्सवाची सुरूवात झाली असावी. त्याला धार्मिक आणि सामाजिक ही दोन्ही अंगे सजली आणि आजतागायत हा उत्सव एक आनंदपर्वणी घेऊन आपल्यासमोर येत असतो! ……..