आनंदी-आनंद गडे!

0
938
शालेय जीवनातल्या कविता आठवण्याचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम आठवतात त्या बालकवींच्या सुंदर नि सुकुमार कविता. इयत्ता पाचवीत असताना ‘बालभारती’ पाठ्यपुस्तकात त्यांची ‘श्रावणमास’ ही कविता होती. त्यानंतर दुसर्‍याच वर्षी त्यांची ‘आनंदी-आनंद गडे’ या शीर्षकाची कविता अभ्यासायला मिळाली. पुढे या दोन्ही कविता कुठल्या ना कुठल्या तरी पाठ्यपुस्तकातून ‘भेटत’ राहिल्या.
‘आनंदी-आनंद’ हे बालकवींचे एक अमर काव्यपुष्प. अमृतघट भरले तुझ्या दारी, का वणवण फिरशी बाजारी; अशी एकेकदा आपली गत झालेली असते. आपल्या अवतीभवती आनंद असतो. पण तिकडे दुर्लक्ष करून आनंदाचा, सुखाचा शोध घेण्यासाठी आपण उगाच कुठंतरी धडपडत असतो. आपल्या जवळपास असलेल्या निसर्गात सर्वत्र आनंद भरून राहिलेला आहे, याची जाणीव आम्हाला लहानपणीच या कवितेनं करून दिली. निसर्गाचं सौंदर्य उकलून काढण्यासाठीच बालकवींचा जन्म झालेला होता. त्यांनी निसर्गातला आनंद शोधून काढला. बालकवींच्या मते निसर्ग म्हणजेच आनंद. त्यामुळे माणसाला आनंद हवा असेल तर त्याला निसर्गाशी समरस व्हावं लागेल.
पाचवी-सहावीत शिकत असताना आम्ही बालकवींच्या कवितांशी समरस झालो होतो. त्या कवितांमधून आम्हाला विलक्षण आनंद मिळत होता. ‘श्रावणमास’ या कवितेमध्ये तर आनंद ओतप्रोत भरलेला होता. त्या कवितेतल्या देवदर्शनास निघालेल्या ललनांच्या हृदयात आनंद मावेनासा होतो. ‘श्रावणमास’ अभ्यासल्यानंतर आमचीही अशीच गत झाली होती. ‘आनंदी-आनंद’मध्ये आनंद आहेच; पण ‘श्रावणमास’ म्हणजे आनंदाचा डोह आहे. शाळेत असताना त्यांच्या अशा दोन-चार कविता अभ्यासलेल्या आठवतात. पुढे काही वर्षांनंतर त्यांच्या इतर कविता वाचाव्याशा वाटल्या. ‘फुलराणी’, ‘बालविहग’, ‘तारकांचे गाणे’ या आणि अशा कितीतरी कवितांनी खूप आनंद दिला. त्यांच्या ‘तारकांचे गाणे’मधल्या तारका तर लाजत लाजत हळूच हासत येतात अन् आनंदाचे दवबिंदू इकडेतिकडे भिरकावून देतात. आज असं वाटू लागलं की उण्यापुर्‍या अठ्ठावीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या बालकवींनीही आमच्यासाठी सुंदरतेच्या सुमनांवरचे आनंदाचे दवबिंदू ‘इकडे तिकडे चोहिकडे’ भिरकावून दिले आहेत…
जशी दृष्टी तशी सृष्टी! बालकवींची वृत्तीच आनंदी आहे. त्यामुळे त्यांना सगळीकडे आनंद दिसतो आहे. ‘आनंदी-आनंद गडे’ या कवितेची सुरुवात या अशा वरवर साध्या-सोप्या वाटणार्‍या ओळींनी होते- ‘आनंदी आनंद गडे! इकडे, तिकडे, चोहिकडे.’ पण या साध्या ओळी नाहीत. या आनंदाच्या लडी आहेत.
निसर्गात वर-खाली सर्वत्र आनंद भरला आहे अन् वायूसंगे तो फिरतो आहे. नभात, दिशांत म्हणजे सार्‍या जगात तो व्यापून राहिला आहे. सर्वत्र तो विहरतो आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाला आनंद झालेला आहे. काही घटक आनंदाने गाणे गात आहेत, अशी बालकवींनी येथे कल्पना केली आहे. आम्हाला तर त्याकाळी सारा निसर्गच आनंदानं डोलतो आहे, असं वाटायचं. कवितेखाली प्रश्‍न होता- कोणाकोणाला आनंद झाला आहे? त्याची शिक्षकाजवळ यादीच काढून दिली असेल. सोनेरी सूर्यकिरणच नव्हे तर कौमुदीही आनंदानं हसते आहे, संध्याकाळ प्रेमानं खुललेली आहे आणि निसर्गातले हे घटक आनंदानं गाणी गात आहेत. निर्झर, लतिका, पक्षी, कमळ, भ्रमर या सार्‍यांनाच किती आनंद झालेला आहे-
वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतली,
पक्षि मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे?
कमल विकसले,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले-
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी-आनंद गडे!
आमच्या सहावीच्या पाठ्यपुस्तकातल्या या कवितेत ‘नीलनभी नक्षत्र कसे| डोकावुनि हे पाहतसे’ हे कडवं नव्हतं. तरीदेखील ही कविता अपूर्ण आहे, असं त्याकाळी मुळीच वाटत नव्हतं. कारण कवितेतल्या ज्या काही ओळी होत्या, त्यातल्या सुंदर शब्दांनी आम्हाला वेड लावलं होतं. निसर्गाचे सर्वच घटक आनंदी आहेत, आनंदानं ते गात आहेत मग आम्हीच का मागं राहावं? आम्हीही गात सुटलो होतो- ‘आनंदी-आनंद गडे! इकडे, तिकडे, चोहिकडे|’ या कवितेतले शब्द सोपे आहेत पण ते नादमधुर आहेत. ही कविता वर्गात सगळे मिळून डोलत डोलत सादर करताना ‘भरला, फिरला, उरला’ किंवा ‘रंगले, दंगले, स्फुरले’ या यमकांवर असा काही जोर देत होतो की त्यावरून आम्हाला किती आनंद झाला असेल याची शिक्षकांना कल्पना यायची. ते डोळे वटारायचे तोवर कवितेतल्या या शेवटच्या कडव्यावर आम्ही यायचो-
स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आता उरला,
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी-आनंद गडे!
सुरुवातीची कडवी वाचताना आपण जणू आनंदानं विहरत असतो अन् शेवटच्या कडव्यात एकदम व्यावहारिक पातळीवर येतो. काही वर्षांनंतर कळलं की कुसुमाग्रजांसारख्या कवींनाही हा असा शेवट ‘कृत्रिम व अकारण’ वाटला होता. महाविद्यालयात असताना लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’ वाचलं होतं. त्यातलं एक वाक्य आठवतं- ‘ठोमरे बालकवी होता, पण कवीपेक्षाही तो बाल अधिक होता.’ ‘आनंदी-आनंद’मधल्या सुरुवातीच्या कडव्यांमध्ये ‘बाल’कवी असलेला ठोमरे अचानक शेवटच्या कडव्यामध्ये ‘प्रौढ’कवी झाला होता!
स्वार्थाच्या बाजारात रडणार्‍यांना आनंद मिळत नाही, हा विचार बालकवींना का मांडावासा वाटतो? कारण बालकवींनीही स्वार्थी जगाचा अनुभव घेतलेला होता, असं त्यांचे चरित्रलेखक लिहितात. स्वार्थ आणि आनंद एकाच ठिकाणी नांदू शकत नाही, असा संदेश देणारी ही कविता. सुरुवातीला आनंदाची उधळण करणार्‍या या कवितेच्या सौंदर्याला स्वार्थ, द्वेष व मत्सर या शब्दांनी बाधा येते आणि त्यामुळे कवितेचा शेवट आनंददायी होत नाही, असं काहीजणांचं म्हणणं आहे. सहाव्या इयत्तेत असताना आम्हाला हे असं वाटत नव्हतं. कारण स्वार्थ, द्वेष व मत्सर संपल्यानंतरही शेवटी काय उरतं?
आनंदी-आनंद गडे!
इकडे, तिकडे, चोहिकडे….