आधुनिक जिहादचा संभाव्य आयाम

0
94
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

लास वेगासमध्ये पॅडॉकने केलेल्या हल्ल्यामुळे दहशतवादाच्या एकांड्या शिलेदारांना त्याची नक्कल करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. हल्ल्याच्या सफलतेला मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे अशा एकांड्या जिहादी हल्ल्यांची पुनरावृत्ती सर्वदूर होऊ शकते.

लास व्हेगासमधील रॉक कन्सर्टमध्ये हॉटेलच्या ३२ व्या मजल्यावरून अंदाधुंद गोळीबार करून ५९ लोकांचे प्राण घेणारा आणि ५७० हून जास्त लोकांना गोळीबाराद्वारे गंभीर जखमी करणारा स्टिफन पॅडॉक आमचा असल्याचे आयसिसने लगेच जाहीर केले. जुलै २०१६ मध्येही बांगलादेशची राजधानी ढाका येथे हल्ल्यात २० लोकांचा मृत्यू झाल्यावर त्या ठिकाणी पर्यटकांना ओलीस धरणारी व्यक्ती आमचीच होती असे तेव्हा ही आयसिस प्रवक्याने सांगितले होते. २००८ मधील मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांचा कराचीस्थित लश्कर ए तोयबा समन्वयकांशी सतत टीव्ही आणि सॅटॅलाईट फोन संपर्क होता; मात्र ढाका आणि लास व्हेगासच्या दहशतवाद्यांचा आयसीसशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. आयसीसने त्या दोन्ही कारवायांमध्ये सामील असणार्‍या दहशतवाद्यांचा संबंध आपल्याशी जोडून, यशाचे बादरायण श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. बहुधा, इराकच्या मोसूल आणि ताल अफारमध्येे लाजिरवाण्या पराभवाचे तोंड पाहावे लागणार्‍या आयसीसला आपल्या पराभूत मनस्थितीवर मात करण्यासाठी या हल्ल्यांचे श्रेय उपटण्याची घाई झाली होती.

जगातील सर्व जिहादी संघटना पवित्र कुराणामधील आयातांचा वापर आपल्या सोयीनुसार चुकीचा करून त्याआधारे लोकांच्या मनात धार्मिक उन्माद आणि हिंसक जोश भरवण्याचे काम करतात. लक्ष्य देशांमधील नवधर्मांतरितांना याचा अर्थ माहिती नसतो. परिणामी, त्यांचे रक्त बदला घेण्यासाठी सळसळू लागते. याच्या जोडीला जिहादी संघटनांनी दिलेली प्रलोभने दहशतवादी कृत्यांच्या उक्तीची उरलीसुरली कमीही पूर्ण करतात. या अर्ध धार्मिक मनोवैज्ञानिकप्रणालीचा वापर जिहादी दहशतवादी संघटना भारतातही करताहेत.
स्टीफन पॅडॉक आणि त्याच्या आधी अनेक जिहाद्यांनी केलेल्या नरसंहारासाठी मानसिक क्रौर्याबरोबरच वंशविद्वेश आणि धार्मिक कट्टरतावाददेखील समप्रमाणात जबाबदार आहे.

स्टिफन पॅडॉकसारख्या एकांड्या शिलेदारांना कुठलेही दहशतवादी कृत्य करताना आयसिस, तालिबान, अल कायदा अथवा अन्य कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या आदेशाची किंवा मंजुरीची गरज नसते, हे विश्‍लेषकांनी लक्षात घेतले पाहिजे. असा दहशतवादी त्याच्या मनातील वैचारिक वादळाने प्रेरित होऊन इस्लाम धर्माचा स्वीकार करतो. त्यासाठी त्याने प्रत्यक्ष धर्मांतर केलेच पाहिजे असे नाही. अशा दहशतवाद्यांच्या अस्थिर मनात उद्देश आणि कर्म यांच्यातील फरक अतिशय धूसर असतो असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. कुठलेही अघोर हिंसक कृत्य करतांना दहशतवाद्याच्या मनात, त्यांच्यासारख्या समदुःखी लोकांवर अन्याय करणार्‍यानांना प्रतिसाद देण्याची भावना जोर पकडते आणि तो ते दहशतवादी कृत्य करायला उद्युक्त होतो. दहशतवादी संघटनांनी धर्मग्रंथांच्या आधारानी, भोळ्या तरूणांच्या मनात भरवलेल्या या हिंसक विचारसरणीला यापुढे अंत नाही. असा दहशतवादी विचार, भावना व कृती यांच्यातील गफलतीच्या मनोविकृतीने पछाडलेला असल्यामुळे तो वेडा अपराधी (क्रिमिनली इनसेन) असतो. आपल्याला अशाच धार्मिक वेडाने ग्रासलेल्या दहशतवाद्यांशी लढा द्यावा लागणार आहे.

ज्या प्रकारची हिंसा पॅडॉकने केली, त्यामुळे दहशतवादाच्या एकांड्या शिलेदारांना त्याची नक्कल करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. मागील हल्ल्यांमध्येे मिळणार्‍या सफलतेतच भावी दहशतवादी हल्ल्यांचे बीज रोवले जाते, हे सर्वश्रृत आहे.

नीस, फ्रान्स येथे २०१० मध्येे गाडी गर्दीत घुसवून केलेल्या जिहादी हल्ल्यानंतर उत्तर अमेरिका आणि युरोपमध्येे अशा प्रकारचे १२ जिहादी आणि गैरजिहादी हल्ले झाले. हल्ल्याच्या सफलतेला मिळणार्‍या प्रसिद्धी मुळे अशा एकांड्या जिहादी हल्ल्यांची पुनरावृत्ती सर्वदूर होते.

प्रत्येक शहरात रोज इतके कार्यक्रम होत असतात की सरकारी सुरक्षा यंत्रणांना त्यांना सुरक्षा कवच प्रदान करणे अशक्य नसले तरी कठीण असते. या कार्यक्रमांच्या यादीतून दहशतवादी आपल्या हल्ल्यासाठी कोणता कार्यक्रम निवडेल हे देखील ठामपणे सांगता येण शक्य नसते. या वास्तवामुळे सुरक्षा यंत्रणा दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्यतेचे मूल्यमापन करून संभाव्य दहशतवादी सांप्रत टेहाळणी करतो आहे, हत्यार घटनास्थळी आणतो आहे की प्रत्यक्ष हल्ला करण्याच्या तयारीत आहे याचा अदमास घेत तो कुठे हल्ला करेल याचा अंदाज करतात. आगामी काळात प्रशासनासाठी दहशतवाद विरोधी कारवाई करतांना अशी दहशतवादी कारवाई कोण करेल याऐवजी कशी करेल हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असेल.
या पार्श्‍वभूमीवर गर्दीवर दहशतवादी हल्ला झाल्यास स्वत:चा बचाव कसा करायचा याचे तीन ठोकताळे आहेत.
अ) आपल्या भोवतालची जागा, त्याकडे येणारे व तेथून बाहेर पडण्याचे रस्ते यांची माहिती घेऊन डोक्यात साठवणे
ब) कुठल्याही प्रकारच्या संकटाला निर्भयतेने तोंड देणे
क) हल्ला सुरू झाल्याबरोबर तो कोठून व कसा होतो आहे याकडे लक्ष देणे.
पण सर्वांत महत्वाची गोष्ट; हल्ला होण्याची शक्यता प्रत्यक्षात येताच स्वत:ला मार्‍याच्या क्षेत्रातून बाहेर कसे पडता येईल याचा अदमास घेणे ही असते. अशा वेळी फार धाडसी न बनता सुटकेचा मार्ग चोखाळण्यामुळे सामान्य नागरिकाचा जीव वाचू शकतो. दहशतवादी हल्ल्यांमध्येे जखमींच्या मदतीसाठी येणार्‍या पहिल्या मदतगारांना सर्वप्रथम जखमींचा रक्तस्त्राव थांबवण्याला प्राधान्य द्यावे लागते. बंदुकीच्या गोळ्या किंवा बॉम्बस्फोटातील धातूच्या तुकडयांमुळे होणार्‍या रक्तस्त्रावाने सर्वांत जास्त मृत्यू होतात. दहशतवादी हल्ला होऊ शकणार्‍या आजच्या अस्थिर वातावरणात प्रत्येकाने सदैव आपल्याजवळ टॉर्निकेट, हेमोस्टॅटिक बँडेज आणि चेस्ट सील ठेवणे जरूरी आहे.

आजमितीला आपण सर्व दहशतवादी वातावरणाचे अभ्यस्त झालो आहोत. ज्या प्रमाणे अपघात किंवा आजार माणसावे प्राण घेतात, त्याच प्रमाणे दहशतवादी निष्पाप लोकांचा सहजगत्या जीव घेतात. अर्थात असे दहशतवादी हल्ले होणार या शक्यतेने भीतीदायक वातावरणात समाजाने राहाता कामा नये.
सुरक्षे बाबतीतील वाढत्या मनोविकृतीमुळे एकट्या माणसाच्या आणि संपूर्ण समाजाच्या सुरक्षा संबंधीच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतात. दहशतवाद आणि दहशतवाद्याच्या खर्‍या व परखड आकलनानेच समाजामध्येे मानसिक लवचिकपणा, स्थितीस्थापकत्व आणि आनंदी वृत्तीत वाढ होऊन या नवीन प्रकारच्या जिहादी दहशतवादाला खंबीरपणे तोंड देता येईल.