आधार कार्ड असुरक्षित वृत्ताने खळबळ

0
93

कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड पूर्णत: सुरक्षित असून त्यातील तपशील मिळवणे कोणालाही शक्य नसल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे केला जात असला तरी हा दावा खोटा ठरवणारी आणखी एक माहिती उजेडात आली आहे. ‘ट्रिब्यून इंडिया’ या वर्तमानपत्राने याविषयी पर्दाफाश करणारे वृत्त प्रसिध्द केले आहे.

या वृत्तानुसार ५०० रुपयांत कोट्यवधी लोकांच्या आधार कार्डांवरील माहिती सहजपणे मिळू शकते. या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस्‌ऍपवर एक मेसेज व्हायरल होत होता. या मेसेजद्वारा आपल्याला ५०० रुपयांत १०० कोटी आधार कार्डांचा ऍक्सेस आपल्याला मिळाल्याचे द ट्रिब्यूनच्या वृत्तात म्हटले आहे. अधिक माहिती अंती या प्रकरणात एक रॅकेट असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अनेक एजंट गुंतले असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ५०० रुपये दिल्यानंतर आधार कार्डच्या ऍक्सेसचा गेटवे व लॉग इन पासवर्ड १० मिनिटांसाठी दिला जातो. त्याद्वारे आधार कार्डचा क्रमांक टाकल्यावर कोणत्याही व्यक्तीची माहिती मिळू शकते असे या वृत्तात म्हटले आहे. ज्यादा ३०० रुपये दिल्यास मिळालेल्या माहितीची छापील प्रत काढण्याचीही संधी मिळते. गेल्या काही महिन्यांपासून व्हॉटस् ऍपवर हा मेसेज ग्रुप कार्यरत असून अनेकांनी आधार कार्डधारकांची माहिती मिळवल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी यूआयडिएआयचे विभागीय अतिरिक्त महासंचालक संजय जिंदाल यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यूआयडीएआयने दावा फेटाळला
यूआयडिएआयने हा प्रकार म्हणजे तक्रार निवारण शोध सुविधेचा गैरवापर असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही सुविधा फक्त प्राधिकृत अधिकार्‍यांकडेच असते. असा प्रकार घडला असल्यास त्याविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल असे या सूत्रांनी सांगितले.

केवळ आधार क्रमांक मिळाला म्हणून त्यापासून कार्डधारकाला धोका संभवत नाही. आधार कार्डचा तपशील सुरक्षित करणारे तंत्रज्ञान अत्यंत उत्कृष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधी नोव्हेंबर २०१७मध्ये २१० केंद्रीय व राज्य सरकारांच्या वेबसाईटवर आधार कार्ड धारकांची माहिती उपलब्ध झाल्याच्या वृत्तानंतर त्या वेबसाईट हटविण्यात आल्या होत्या.