आदिशक्तीचा अंश मिरवताना…

0
267

नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर स्त्रीशक्तीचा उद्घोष होत असताना समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान होणं योग्य आहेच, पण त्याचबरोबर स्त्रियांमधील विनाशकारी प्रवृत्तींवर भाष्य होणं आणि कमी ती दूर करण्यासाठी त्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करणंही गरजेचं आहे.

नवरात्रीचं मंगल पर्व… एका आनंदमयी उत्सवाची सुरुवात. आदिशक्तीच्या आराधनेचा एक सुरम्य योग! नवरस आणि नवरंगांचा हा महोत्सव. हा उत्सव नेहमीच्या धुमधडाक्यात आणि मंगलमय वातावरणात साजरा होईलच, पण खरी गरज आहे ती स्त्रीशक्तीचा उद्घोष करण्याची… यादृष्टीने मला या सोहळ्याचं महत्त्व जाणवतं.
नवरात्रीच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित होतात. स्त्रीशक्तीचा गौरव होतो. चांगलं चित्र पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. कर्तृत्ववान स्त्रियांच्या गळ्यात हारतुरे पडतात. ते उचितही आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून स्त्रियांमधील सकारात्मकता वाढीस लागते. त्यांच्यापुढे आदर्श निर्माण होतात. ध्येय गवसल्याने त्या कार्यप्रवृत्त होतात. या काळातला उत्सव अशा विचारांनी प्रेरित असायला हवा. प्रयत्नांची दिशा स्त्रीमधील विनाशकारी शक्तींच्या निर्दालनाकडे वळवली तर हा सण अधिक योग्य रीतीने साजरा होईल. नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा जागर व्हायलाच हवा पण तो रचनात्मक असायला हवा.
प्रत्येक काळाने स्त्रीचं सामर्थ्य पाहिलं आहे. तिच्यातील शक्ती अनुभवली आहे. प्रत्येक काळामध्ये स्त्रियांचा एक गट पुरोगामी, बंडखोर आणि विधायकतेची कास धरणारा, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारा, चौकटीबाहेर पडून पुरुषप्रधान क्षेत्रातही कर्तृत्व गाजवणारा राहिलेला आहे. कदाचित भूतकाळात प्रसारमाध्यमांचा रेटा कमी असल्यामुळे स्त्रियांचं हे अलौकिक कर्तृत्व, धाडस, शक्तिसामर्थ्य सर्वदूर पोहोचलं नसेल, पण याचा अर्थ पूर्वीच्या आणि आताच्या स्त्रियांमध्ये ङ्गार ङ्गरक होता असं समजण्याचं कारण नाही. स्त्रीशक्ती तेव्हाही सबल होती आणि आजही तितकीच सबल आहे. तिच्या स्वरूपात आदिशक्तीची अनेक रूपं समाजाने पाहिलेली आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने मला अशाच काही रूपांचं स्मरण होत आहे. राचेल कार्सन हे यातील एक नाव. अतिशय सामान्य कुटुंब आणि परिस्थितीतून आलेल्या या महिलेने तत्कालिन बलाढ्य शक्तींचा सामना केला. तिचा लढा कीटकनाशकं उत्पादकांविरोधात होता, अर्थातच पुरुषाधारित शक्तीविरोधात होता! एखाद्या महिलेचा विरोध मोडून काढताना पुरुषांच्या हाती तिचं चारित्र्यहनन करण्याचं महत्त्वाचं शस्त्र असतं. या वर्गाने तेही वापरून पाहिलं. पण राचेलने त्यांच्या या अपप्रचारालाही धीराने तोंड दिलं. १९६० पासून मानवी आरोग्यास हानीकारक असणार्‍या कीटकनाशकांच्या उत्पादनावर आणि वापरावर बंदी घालण्यासाठी सुरू केलेला हा लढा १९६५ मध्ये प्रत्यक्षात असा कायदा अस्तित्वात आल्यावरच संपला. तिचा हा लढा प्रामुख्याने ‘डीडीटी’सारख्या विषारी आणि अतिघातक कीटकनाशकांविरोधात होता. यामुळे हितसंबंध धोक्यात आलेल्यांनी तिला वेडसर ठरवण्याचाही प्रयत्न केला होता. पण ती सर्वांना पुरून उरली. हे पाश्‍चात्त्य जगतातलं एक उदाहरण…
१९९३ मध्ये अशाच पद्धतीने आपल्याकडेही एका सामान्य स्त्रीने या शक्तींना आव्हान दिलं. लीलाकुमारी अम्मा हिचा लढा असाच एकटीचा पण संपूर्ण समाजासाठी उपकारक असा होता. १९७५ मध्ये केरळमधील राज्य शेती विभागात अगदी साध्या पदावर नोकरीला लागलेल्या या सामान्य महिलेने १९९३ पर्यंत चारचौघींसारखं आयुष्य घालवलं. पण १९९३ मध्ये तिचा मुलगा वारंवार आजारी पडू लागला आणि तिच्या दिनचर्येत, कामात अडथळे येऊ लागले. त्याचा आजार कुठल्याही उपचारांनाही दाद देत नव्हता. केरळमधल्या तिच्या वस्तीचा भाग काजूच्या बागांनी वेढलेला होता. या बागांमध्ये किडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी हेलिकॉप्टरमधून कीटकनाशकांची ङ्गवारणी केली जायची. साहजिकच त्याचा अंश हवेत सर्वदूर पसरायचा. सुरुवातीला गावात घरोघरी वाढणार्‍या रुग्णसंख्येमागे हे कारण असल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण निम्न मध्यमवर्गीय आणि अल्पशिक्षित लीलाकुमारी अम्माने या बाबीचा छडा लावला. प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि सरकारी अधिकारी, शेती विभागप्रमुखांना, राजकारण्यांना भेटण्याचा सपाटा लावला. अर्थातच कोणीही तिला प्रतिसाद दिला नाही. किंबहुना, प्रत्येकाने तिचं दमन करण्याचा प्रयत्न केला. तिच्या घरावर गुंड सोडले. खोडसाळपणाचा कडेलोट करत एके दिवशी हेलिकॉप्टरमधून तिच्या घराच्या कपांऊंडवर कीटकनाशकांची ङ्गवारणी करण्यात आली. पण तिने या कोणत्याही शक्तींपुढे हार पत्करली नाही तर निर्भयतेनेे हे प्रकरण न्यायप्रविष्ट केलं. विशेष म्हणजे सादर केलेल्या पुराव्यांवरून न्यायालयाने अशा प्रकारे कीटकनाशकांच्या ङ्गवारणीवर बंदी आणली. वस्तुत: आपल्या देशात काय अथवा विदेशात काय, शास्त्रज्ञांची कमतरता नव्हती. कीटकनाशकांचे दुष्परिणाम त्यांच्या नजरेतून सुटले असण्याची सूतराम शक्यता नाही. मात्र कीटकनाशक उत्पादकांच्या बलाढ्य लॉबीपुढे उभं राहण्याची त्यांची ताकद झाली नसताना दोन सामान्य स्त्रियांनी दिलेले हे दोन लढे आदिशक्तीची उदाहरणं नाहीत तर दुसरं काय आहे?
आरोग्यक्षेत्रातल्या या उदाहरणांप्रमाणे अन्य क्षेत्रांमध्येदेखील स्त्रीशक्तीचा साक्षात्कार बघायला मिळालेला आहे. अलीकडेच ‘तारिणी’वरून महिलांनी पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. माझ्या म्हणजे गिर्यारोहणाच्या क्षेत्रातही स्त्रीशक्तीने ठसा उमटवला आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी म्हणजे १९७४ च्या सुमारास रशियामध्ये ऑल सोव्हिएत युनिअन वुमन क्लाईंबर्सतर्ङ्गे आठ रशियन महिला गिर्यारोहकांची मोहीम आखण्यात आली होती. या महिला लेनिन शिखरावर चढाई करणार होत्या. त्यांच्याबरोबर कोणीही पुरुष गिर्यारोहक नव्हता. हवा अत्यंत प्रतिकूल होती. अगदी शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर निसर्गाची अशी प्रतिकूलता असतानाही त्या धीराने वातावरण अनुकूल होण्याची वाट पाहात होत्या. अशा प्रकारे ङ्गक्त महिलांची पहिलीच मोहीम अर्ध्यात सोडून परतण्याची कोणाचीच तयारी नव्हती.
दोन-तीन दिवसानंतर मात्र त्यांच्याजवळचा अन्नसाठा संपला. मुख्य म्हणजे महिला गिर्यारोहकांच्या या गटाला चांगल्या दर्जाचं साहित्यही पुरवण्यात आलं नव्हतं. सहाजिकच प्रचंड वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे तंबूंचंही खूप नुकसान झालं. या सगळ्याच्या परिणामस्वरूप मोहिमेतल्या त्या आठही जणींना प्राण गमवावे लागले. एक एक करून सगळ्याजणी गतप्राण झाल्या. रुढार्थाने ही मोहीम असङ्गल ठरली, पण त्यांच्या प्रयत्नामुळे स्त्रीशक्तीने मात्र नव्या उंचीला गवसणी घातली असं आपण म्हणू शकतो. सुरुवातीला गिर्यारोहक महिलांना पुरुषांसारखा पेहरावही करता येत नसे. पाश्‍चात्त्य देशांतील स्त्रियादेखील गिर्यारोहणावेळी पायघोळ स्कर्ट आणि पूर्ण बाह्यांचा कोट घालायच्या. गाव मागे पडल्यानंतरच शर्ट-पँट घालून त्या पुढील चढाई करायच्या. आताही सर्व मर्यादांवर मात करत अनेकजणी विक्रम नोंदवताना दिसतात. जमशेदपूरच्या प्रेमलता अगरवाल यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी गिर्यारोहण क्षेत्रात प्रवेश केला आणि एव्हरेस्टवर चढाई केली. केवळ एव्हरेस्टच नव्हे तर सातही खंडातील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला. सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांना सन्मानित केलं. अशी एक ना अनेक उदाहरणं सांगता येतील.
स्त्रियांना कोणतंही क्षेत्र वर्ज्य नव्हतं आणि नाही. कल्पना चावला, सुनिता विल्यम ही नावं आपल्यासमोर आहेत. प्राणीसंशोधन, कीटकसंशोधन, प्राण्यांची जोपासना आदी क्षेत्रांमध्ये स्त्रियांची कामगिरी सरस असल्याचं पाहायला मिळतं. चिंपाझींवर काम करणारी जेन गुडाल आपल्याला ठाऊक आहे. अलीकडेच मंजू नावाच्या एका संशोधिकेशी माझी ओळख झाली. बडोदा विद्यापीठातून डॉक्टरेट संपादन करणार्‍या मंजूने कोळ्यांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं असून आज तिने जागतिक कीर्तीचं यश संपादन केलं आहे. मुख्य म्हणजे कारकिर्दीत कितीही उच्चस्थानी पोहोचल्या तरी स्त्रियांचे पाय जमिनीवर असतात. मातृत्वाच्या जबाबदारीने त्या कुटुंबाशी बांधलेल्या असतात. संवेदनशीलता आणि करुणा या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रसंगी त्या पुरुषांपेक्षा सरस ठरतात.
देवी सर्वशक्तिमान आहे. आपण तिच्याकडील प्रत्येक गुण घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्याकडील अवगुणांचा त्याग करायला हवा. विनाशकारी बाबी टाळायला हव्यात. एके काळी भ्रष्टाचारात बाईचं नाव आढळत नसे. पण आता स्त्रिया बिनदिख्खत भ्रष्टाचार करताना, लाच घेताना दिसतात. स्त्रीच स्त्रीची शत्रू असल्याचं अनेक प्रसंगातून सिद्ध होतं. अनैतिक संबंध, सुनेला दिली जाणारी हीन वागणूक, लहान मुलांशी संबंधित गुन्हे आदी प्रकरणांमध्ये बहुतांश वेळा स्त्रियाच गुंतलेल्या आढळतात. ड्रग्ज घेणं, मद्यपान-धूम्रपान यातही महिलांची संख्या नोंद घ्यावी इतकी वाढत आहे. काही महिलांमध्ये हा विनाशकारी दृष्टिकोन प्रभाव दाखवत असतो. तो टाळून तिचं सक्षम आणि कल्याणकारी रूप जगासमोर यायला हवं. तिने शालेय मुलींपुढे आदर्श निर्माण करायला हवेत. आज सगळ्यांसाठी समान संधी उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. मनात आणलं तर स्त्री प्रत्येक प्रतिकूलतेवर मात करू शकते. तिच्यात ती क्षमता आहे. गरज आहे ती जाणून घेण्याची आणि पुढे जाण्याची…