आत्महत्येच्या प्रयत्नातील तरुणीच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत मृत्य

0
95

>> दोन पोलीस अधिकार्‍यांसह चौघे निलंबित

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या बलात्कार पीडित तरुणीच्या वडिलांचे काल रात्री न्यायालयीन कोठडीत निधन झाले. सदर तरुणीने भाजपचे उन्नावचे आमदार कुलदिप सिंग सेंगार यांनी गेल्या वर्षी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेले वर्षभर अत्याचारविरोधात न्यायासाठी संघर्ष करुनही कोणीही दखल घेत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. दरम्यान, पीडीतेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांसह चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

आत्महत्येच्या प्रयत्नाच्या घटनेनंतर रविवारी रात्री १८ वर्षीय पीडीतेचे वडील पप्पू सिंग (वय ५०) यांना न्यायालयीन कोठडीतून इस्पितळात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचे निधन झाले अशी माहिती जिल्हा न्यायदंडाधिकारी रवी कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. शवचिकित्सेनंतर पप्पू सिंग यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे कुमार म्हणाले. बलात्कार प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पीडीतेच्या कुटुंबियांना जबर मारहाण केल्याचे त्यांच्यातर्फे सांगण्यात आले.
उन्नाव येथील पोलीस अधीक्षक पुष्पांजली देवी यांनी या प्रकरणी दोन पोलीस अधिकारी व दोन कॉन्स्टेबल यांना निलंबित केल्याची माहिती दिली.