आत्महत्या टाळता येऊ शकतात…

0
259
  •  डॉ. सुषमा किर्तनी
    (पणजी)

प्रत्येक वर्षी मानसिक आरोग्य दिवस (वर्ल्ड मेंटल हेल्थ डे) १० ऑक्टोबरला साजरा केला जातो. याचे उद्दिष्ट- मानसिक आजारांबद्दल सगळ्या लोकांमध्ये जाणीव निर्माण करणे- होय. यामुळे मानसिक आरोग्यक्षेत्रात काम करणार्‍या लोकांना तसेच इतर जणांना जास्तीत जास्त माहिती मिळते. तसेच आपल्या कामाबद्दल या क्षेत्रात काम करणार्‍यांना लोकांसमोर आपले मुद्दे मांडायला संधी मिळते.

 

या वर्षी ‘‘४० सेकंड्‌स ऑफ ऍक्शन’’ हा विषय घेऊन हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आत्महत्या हा विषय घेऊन त्याबद्दल सगळ्यांना जाणीव करून देण्यात आली. आता आपण पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ- सकारात्मक मानसिक आरोग्य म्हणजे काय ते पाहूया….
आपली मानसिक स्थिती जेव्हा चांगली म्हणजेच निरोगी असते तेव्हा आपल्या विचार, भावना आणि कृती या तिन्ही गोष्टींत बरोबर ताळमेळ असतो. या तिन्ही गोष्टींमध्ये शांतता असते. एक गरीब माणूससुद्धा जर मानसिकरीत्या शांत असेल तर आयुष्यात सुखी असतो. त्याचा हॅपिनेस इंडेक्स हा श्रीमंत व मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेल्या माणसापेक्षा चांगला असतो. त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला हवंय की ‘पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ’ (सकारात्मक मानसिक आरोग्य)ला तीन बाजू असतात.
१) प्रॅक्टिकल आणि फ्युचरिस्टिक थिंकिंग- व्यावहारिक व भविष्यवादी विचार
२) सकारात्मक कृती जी सगळ्यांना उपयोगी पडेल अशी
३) स्वतःबद्दल तसेच दुसर्‍याबद्दल आनंदी व आरामदायी वाटणे
आता आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की भावना या सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. प्रत्येक वेळेला भावना ही सकारात्मक असेलच असे नाही. थोड्यातरी नकारात्मक भावना आपल्याला हव्याच असतात. त्या नकारात्मक भावना आपल्या अस्तित्वाला आणि विकासाला उत्तेजित करतात व त्यामुळे आपण जास्त प्रयत्नशील होतो. हे सगळं आपले उद्दिष्ट साध्य करण्यास आपल्याला मदत करतं.
आता निरोगी नकारात्मक भावना म्हणजे काय ते पाहू…
१) निरोगी हेवा – जेलसी
२) निरोगी राग – अँगर
३) वाईट वाटणे – सॅडनेस
४) काळजी – कन्सर्न
५) दुःख – सॉरो
६) दुःख होणे – रिग्रेट

आत्महत्येला काही रीस्क फॅक्टर्स असतात- आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी…..
१) ताण
२) मानसिक आजार
३) अमली पदार्थांचे व्यसन
४) आत्महत्येचा कौटुंबिक इतिहास
५) घरगुती हिंसा
६) दारु पिणारे पालक
७) पैशांची कमतरता, कामधंदा नसणे
८) दादागिरी
९) छळणुकीची शिकार

आपणास ठाऊक असलेल्या युवकांमध्ये खालीलपैकी लक्षणे आढळून आली तर आपण सतर्क राहायला पाहिजे.
१) सोशल मिडियावर आपले अभिप्राय घालावे ज्यामध्ये आत्महत्येबद्दल इच्छा व्यक्त केली आहे.
२) जीवनाचा कंटाळा आलेला असल्याने त्याचा अंत करण्याचे विचार दर्शविलेले आहेत.
३) स्वतःचे किंमती सामान आणि वैयक्तिक लेखाजोखा कुटुंबातील सदस्याला किंवा नातेवाईकाला दिलेला असेल.
४) समाजापासून स्वतःला जाणून बुजून दूर ठेवणे.
५) निष्काळजीपणा आणि अंधाधुंद वाहन चालवणे
६) जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना गुडबाय म्हणणे.
आता आपण जर किशोरवयीन मुलं पाहिलीत तर त्यांच्यामध्ये नैराश्याची खालील लक्षणे आढळून येतात.
१) निराश आणि काही करण्याची इच्छा नसणे
२) कारण नसताना सतत रडणे
३) आवडीच्या गोष्टी न आवडणे
४) झोप आणि भूक कमी होणे
५) थकवा किंवा काही करण्याची इच्छा नसणे
६) अर्थशून्य जग भासणे
७) अमली पदार्थांचा उपयोग करणे
८) धोकादायक वागणूक
९) असुरक्षित सेक्स संबंधित वागणूक
१०) शाब्दिक छळणूक
११) दादागिरी
१२) दुसर्‍याच्या प्रॉपर्टीची वाट लावणे, मोडणे वगैरे.
सगळ्यांमध्ये ही सगळीच लक्षणे दिसतील असं नाही तरीही आपण जागरूक असणं महत्त्वाचं आहे.

नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचं प्रमाण हल्ली भरपूर वाढलंय. १५ ते २० वर्षांच्या वयोगटातील तरुण मुलं हा मार्ग पत्करतात. आत्महत्या जगातला तिसरा मुद्दा आहे ज्यामुळे अनेक युवक अलीकडे हाच निर्णय घेतात. प्रत्येक ४० व्या सेकंदाला एक तरुण आयुष्य संपतंय.
जर कोणी व्यक्ती भावनिकदृष्ट्या विचलीत असेल तर खालील कारणे असू शकतात….
१. स्वतःला दोष देणे.
२. भविष्याची काहीत आशा नाही.
३. विस्कळीत झोप
४. कंटाळा
५. जेवणाची इच्छा नसणे
६. शाळेतील गुणांची घसरण
७. आत्महत्येचे विचार
८. थकवा
९. पुन्हा पुन्हा रडणे (कारण नसताना)
१०. ज्या गोष्टी आवडायला पाहिजे त्या न आवडणे
११. अमली पदार्थांचे सेवन
१२. धोकादायक वागणूक (अडचणीच्या जागी सेल्फी घेणे, वाहन अंधाधुंद चालवणे, पोहण्याचे ज्ञान नसताना पाण्यात उडी मारणे इ.)
डिप्रेशन म्हणजेच नैराश्य हे कुणालाही असू शकतं. यासाठी आनुवंशिक व हॉर्मोनल घटक जबाबदार असतात. तसेच ताण, जीवनकौशल्याचा अभाव असणे, व्यसन, हिंसा, अमली पदार्थांचे सेवन हेपण आढळून आले.

आत्महत्या कशी टाळता येईल?….
१) प्रत्येक कुमारवयीन मुलामुलींना जीव वाचविण्याचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.
२) त्यांची आत्मशक्ती वाढवली पाहिजे.
३) तुमच्या मुलांशी सतत जोडलेले रहा.
४) तुमचा भक्कम आधार त्यांना द्या.
५) मुलांना अति प्रमाणात साधने देऊ नका.
६) सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टी त्यांच्या अंगी बाणवा, ज्यामुळे त्यांची विचारसरणी प्रगल्भ होईल.
आत्महत्या आपण टाळू शकतो. ज्याला आत्महत्या करायची असते त्याला खरं तर मरायचं नसतं पण दुसरा उपाय नसतो. स्वतःचे दुःख किंवा वेदना संपवायला त्याच्यापुढे दुसरा उपाय नसतो. जर वेळीच आपण त्याला समजून घेतलं तर आत्महत्या व तरुण जिवाचा नाश आपण थांबवू शकतो. आत्महत्येबद्दल जर कुणी आपल्याला धमकी दिली तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्या माणसाचे बदललेले वागणे, कुटुंब आणि मित्रांबरोबरची बदललेली वर्तणूक याकडे आपण पटकन लक्ष दिले पाहिजे.

ताण हा सगळ्यांनाच असतो. कॉलेज, अभ्यास, परीक्षा, आईवडिलांची व टीचरची अपेक्षा, मित्रमैत्रीणींच्या अपेक्षा आणि प्रेम प्रकरणे हे सगळे आपल्याला ताणाच्या दिशेने वळवतात. आता आपण ते कसं हाताळू शकतो, ते पाहू या…
१) जीव वाचवण्याची कौशल्ये शिकून घ्या.
२) रिलॅक्सेशन तंत्रं शिकून घ्या.
३) आकलनविषयक वागणुक थेरपी घ्या.
४) ताण ओळखायला शिका आणि त्यांना दूर करा.
५) वेळेचे नियोजन करा- जेणेकरून तुमचा अभ्यास, दैनंदिनी, झोप सगळंकाही वेळेवर होईल.
६) स्वतःच स्वतःला प्रेरणा द्या.
७) सकारात्मक विचार करा.
८) योगसाधना
९) ध्यानधारणा

आत्मविश्‍वास वाढवणे हा एकमेव उपाय आपण आत्मसात करायला पाहिजे. कुठलाही बदल किंवा अडचण आली तरी आपण तिला व्यवस्थितपणे हाताळू शकलो पाहिजे व त्यामध्ये आपली मानसिक पातळी ढासळू न देणे हाच आपला आत्मविश्‍वास! जे युवक हे शिकतील त्यांचे आयुष्य चांगले. तो कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. आयुष्यात कितीही ठोकर्‍या खाल्ल्या किंवा घसरला तरीही त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. हे युवक शिक्षणक्षेत्रात तसेच नोकरी-व्यवसायात चांगल्या प्रकारे वावरू शकतात. याची वागणूक धोकादायक कधीच नसते. त्याचे लोकांबरोबर वागणे, तडजोडपण चांगली असते. तसेच लोकांना पण अशी माणसं खूप आवडतात. कणखर व आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणारी!!