आता मोबाईल ऍपद्वारे भरा वीज बिले

0
93

>> मुख्यमंत्र्यांहस्ते योजनेचा शुभारंभ

मोबाईल ऍपद्वारे वीज बिलांचा भरणा करण्यासाठीच्या योजनेचा काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी वरील योजनेचा मोबाईलचे बटन दाबून शुभारंभ केला. या योजनेचा राज्यातील ६.१७ लाख वीज ग्राहक लाभ घेऊ शकतील, असे योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यांनी सांगितले.
गोवा वीज खात्याच्या ुुु.सेरशश्रशलींीळलळींू.र्सेीं.ळप या वेबसाइटवरून वीज बिलांचा भरणा करण्यासाठीचे ऍप डाऊनलोड करता येणार आहे. हे ऍप आरईसीपीडीसीएल व त्यांचे तंत्रज्ञान भागीदार टाटा पावर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेडने तयार केले आहे.
यावेळी वीज खात्याला सूचना करताना पर्रीकर म्हणाले, की ग्रामीण भागातील ज्या लोकांचा तंत्रज्ञानाशी मोठा संबंध येत नाही त्यांना मोबाईलवरून वीज भरणा कसा करावा ते शिकवण्याची जबाबदारी खात्याने घ्यावी. एका मोबाईलवरून कित्येक ग्राहकांच्या बिलांचाही भरणा करणे शक्य असल्याचे यावेळी पर्रीकर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ योजनेचाच हा भाग असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी नमूद केले. या योजनेमुळे वीज ग्राहकांना यापुढे वीज बिलांचा भरणा करण्यासाठी मोठमोठ्या रांगेत उभे रहावे लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या रांगेत उभे राहून बिले भरणार्‍या ग्राहकांकडे जाऊन खात्याच्या लोकांनी त्यांना ऍपद्वारे कसा वीज बिलांचा भरणा करावा ते शिकवावे, असेही पर्रीकर यांनी यावेळी वीज अधिकार्‍यांना सांगितले. यावेळी त्यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आल्याची माहिती खात्यातील अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

७० हजार डिजिटल मीटर्स बसवणार

राज्यभरात ७० हजार नवे अत्याधुनिक डिजिटल मीटर्स बसवण्यात येणार आहेत. हे मीटर्स बसवल्यानंतर ग्राहकांना ‘ऑटो जनरेटेड’ वीज बिल देणे शक्य होणार असून त्यामुळे मीटर रिडर्सची गरज भासणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मोबाईल ऍपद्वारे वीज बिलांचा भरणा करण्यासाठीच्या योजनेचा काल शुभारंभ केल्यानंतर अनौपचारिकपणे बोलताना सांगितले.
प्रायोगिक तत्त्वावर प्रथम पणजी शहरातच हे मिटर्स बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पणजीकरांनाच ही ‘ऑटो जनरेटेड’ वीज बिले मिळू शकणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, नंतर सर्व गोवाभरात मिळून ७० हजार डिजिटल मीटर्स बसवण्यात येतील व त्यानंतर राज्यभरातील सर्वच ग्राहकांना ही ‘ऑटो जनरेटेड’ वीज बिले मिळतील, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. या मीटर्ससाठी ६० कोटी रु. एवढा खर्च येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘ऑटो जनरेटेड’ वीज बिले देणारे मीटर्स बसवल्यानंतर मीटर रिडर्सना नोकरी गमवावी लागेल काय, असे विचारले असता सरकार कुणालाही कामावरून काढून टाकणार नाही. त्यांच्यावर दुसरी एखादी जबाबदारी सोपवण्यात येईल. मात्र, यापुढे मीटर रिडर्सची नव्याने भरती करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.