आता तरी गृह खात्याने जागे व्हावे : पालयेकर

0
85

>> ड्रग माफियांचा पोलिसांवर हल्ला प्रकरण

ड्रग माफियांकडून पोलिसांवर हल्ला करण्याची जी घटना घडली त्या पार्श्‍वभूमीवर आता गृह खात्याने ह्या ड्रग माफियांचे कंबरडे मोडण्याचे काम हाती घेण्याची गरज आहे, असे गेल्या महिनाभरापासून ह्या ड्रग माफियांविरुध्द आवाज उठवणारे मच्छिमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आता वेळ न दवडता या लोकांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

या माफियांकडून ह्यापूर्वी आपणाला धमकी देण्यात आली होती. आता त्यांच मजल अमली पदार्थांवर छापा मारण्यासाठी जाणार्‍या पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे आता तरी गृह खात्याने जागे होण्याची गरज आहे, असे पालयेंकर म्हणाले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे या माफियांविरुध्द कारवाई करण्यास सक्षम आहेत. आमचा घटक पक्षांचा या कामी त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुणे त्यानी आता वेळ न दडवता ह्या लोकांवर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नसल्याचे ते म्हणाले. आताच ह्या लोकांना जर ठेचले नाही तर उद्या हे माफिया लोकांच्या घरात घुसून त्यांना मारण्याचेही धाडस करू शकतात. अमली पदार्थ माफियानी सर्व किनारपट्टीच ताब्यात घेतलेली असून त्यांना हुसकावून लावण्याची हीच वेळ असल्याचे पालयेकर म्हणाले.