आता जय शहांना राजनाथांचाही पाठिंबा

0
71

द वायर या डिजिटल वृत्त माध्यमाने भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीविषयी संशय निर्माण करणारे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही जय शहा यांचे समर्थन केले आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी काल एका कार्यक्रमावेळी केला. याप्रकरणाचे तपासकाम करण्याचीही गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या आधीही अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. मात्र या आरोपांना कोणताही आधार नाही असे राजनाथ सिंह म्हणाले. नवी दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रकरणी गदारोळ झाल्यानंतर जय शहा यांनी ‘द वायर’ची बातमीदार रोहिणी सिंग, संस्थापक संपादक सिध्दार्थ वरदराजन, सिध्दार्थ भाटिया व एम. के. वेणू, व्यवस्थापकीय संपादक मोनोबिना गुप्ता यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला न्यायालयात गुदरला आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अनेकदा असे आरोप केले जातात. भाजप २०१४मध्ये केंद्रात आल्यानंतर अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या व्यवसायात आधीच्या वर्षाच्या तुलनेत प्रचंड वाढ झाली. त्यांच्या कंपनीच्या उलाढालीत १६ हजार पटींने वाढ झाली असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला होता.
या आरोपाचे शहा पिता-पुत्रांनी खंडन केले आहे. या विषयीचे वृत्त तथ्यहीन व बदनामी करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.