आता चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच

0
112

>> भारताचा पाकिस्तानला इशारा

भारताने पाकविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून भविष्यात भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकव्याप्त काश्मीर (पीओके) या एकमेव मुद्द्यावर चर्चा करेल, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल दिला आहे. गरज पडलीच तर बालाकोट हवाई हल्ल्यापेक्षा मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.

हरयाणातील पंचकुला येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित जन आशीर्वाद यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. त्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारत बालाकोटपेक्षाही मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत वक्तव्य केले होते. याचाच अर्थ भारताने बालाकोटमध्ये काय केले आहे, हे मान्य केले आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

कलम ३७० बाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, हे कलम काश्मीरच्या विकासात अडथळा बनू पाहत होते. त्यामुळे ते हटवण्यात आले. मात्र, सध्या पाकिस्तान भारताने केलेली चूक आहे असे सांगत आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावीत आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना भीक घातली नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीच चर्चा होणार नसल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.

आतापर्यंत अनुच्छेद ३७० ला कोणीही हात लावू शकत नाही, असे लोकांना वाटत होते. भाजपने त्याला धक्का लावला तर पुन्हा सत्तेत येणार नाही, असेही अनेकजण म्हणत होते. मात्र, आम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये अनुच्छेद ३७० रद्द केला. आम्ही कधीही सत्तेचे राजकारण करत नाही. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तसे वचन दिले होते आणि जीव गेला तरी ते पूर्ण करायचे हा भाजपचा निर्धार होता, असे राजनाथ यांनी सांगितले.