आणखी १५ हुल्लडबाज खाण आंदोलकांविरुद्ध गुन्हा

0
99

पणजी पोलिसांनी खाण अवलंबितांच्या आंदोलनावेळी हुल्लडबाजीमध्ये सहभागी झालेल्यांच्या विरोधात कारवाईसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या प्रकरणी आणखी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खाण उद्योजक हरीष मेलवानी, ट्रक मालक प्रमोद सावंत, विनोद पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

खाण अवलंबितांच्या आंदोलनाच्या वेळी जनतेला वेठीस धरून वाहनचालक व इतरांना त्रास करण्यात आला होता. सामान्य नागरिकांना मारबडव करण्याबरोबरच आंदोलकांनी अपशब्द वापरले होते. पोलीस खात्याने खाण अवलंबितांच्या या कृतीची गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनात सहभागी होऊन हुल्लडबाजी करणार्‍यांना अटक करण्याची सूचना सर्व पोलीस स्थानकांच्या प्रमुखांना करण्यात आली आहे. आंदोलनाच्या चित्रीकरणाची सीडी सर्व पोलीस स्टेशनवर पाठविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. खाण अवलंबितांच्या रास्ता रोको, दगडफेक आणि हुल्लडबाजी प्रकरणी यापूर्वी तेरा जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आणखी पंधरा जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पणजी पोलिसांनी खाण उद्योजक हरीष मेलवानी, ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस, जोसेफ कुएलो, धर्मेश सगलानी, रियाझ खान यांना समन्स पाठवून चौकशीसाठी पोलीस स्टेशनवर बुधवारी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. परंतु, सर्वांनी पोलीस स्टेशनवर उपस्थित राहण्याचे टाळले. खाण अवलंबितांच्या अंादोलनावेळी कायदा हातात घेणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आल्याने शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खाण व्यावसायिक मेलवानी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २३ रोजी सुनावणी घेतली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.