आणखी किती बळी?

0
100

गोव्यात गेले काही दिवस सुरू असलेले अपघातांचे सत्र थरकाप उडवणारे आहे. या राज्यात वाहतूक व्यवस्था म्हणून काही अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणार्‍या या दुर्घटना आहेत. एकीकडे वाहतूक पोलीस ‘तालांव’ देण्यात मग्न, तर दुसरीकडे राज्यात अपघातांमध्ये लागोपाठ मानवी बळी जात आहेत. हे दुर्घटनासत्र किती काळ असेच चालणार आहे? परवा तिळामळ – केपे येथे खनिजवाहू ट्रकने धडक दिल्याने सासू – सुनेचा अंत झाला. त्याच्या आधल्या दिवशी म्हापशात खडीवाहू ट्रकने ठोकरल्याने दोघे ठार झाले. तत्पूर्वी ढवळी येथे ट्रकची धडक बसून अभियंता मृत्युमुखी पडला. गेल्या आठवड्यातही असेच अपघातांचे सत्र सुरू होते. दिवसागणिक होणारे हे भीषण अपघात सरकार केवळ मूक प्रेक्षक बनून बघत राहणार आहे का? की काही उपाययोजनाही केल्या जाणार आहेत? देशातील सर्वांत बेशिस्त वाहतूक असलेले राज्य म्हणून गोव्याचा उल्लेख करायला हरकत नाही, एवढी अनागोंदी गोव्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये माजलेली आहे. एकीकडे प्रचंड संख्येने गोव्याच्या रस्त्यांवर पडणारी वाहनांची भर, दुसरीकडे, वाहतूक नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन आणि तिसरीकडे बेशिस्त, बेदरकार वाहन चालवणे यातून अपघाताशिवाय दुसरे काही पदरी पडणे शक्य नाही. दुर्दैवाने या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्या गेल्याचे अजिबात दिसत नाही. केपे येथील परवाचा अपघात हा बेफाम खनिजवाहू ट्रकमुळे झाला आणि त्यात दोन महिलांचा करूण अंत झाला. खनिज वाहतूक आणि अपघात हे समीकरण जुने आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातल्यानंतर आणि सरकारवर कोरडे ओढल्यानंतर तरी या खनिज वाहतुकीला शिस्त येईल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली आहे. खाणपट्‌ट्यात पुन्हा बेफाम वेगाने धूळ उडवीत हे ट्रक धावताना दिसतात. ट्रकमालकांचे राजकारण्यांशी असलेले लागेबांधे लक्षात घेता आता न्यायालयानेच या बेदरकार वाहतुकीची दखल घेणे आवश्यक बनले आहे. म्हापशातील अपघात हाही बेफाम ट्रकमुळे झाला आणि त्यात दोघा तरुणांचा अंत झाला. ट्रक वाहतुकीतील या बेशिस्तीला शिस्त लावण्याची जबाबदारी वाहतूक खात्याची आहे. अनेकदा कोणीही हे ट्रक चालविते. अवजड वाहन चालवण्याचा परवाना जवळ असतोच असे नाही. ट्रकचे पुढचे, मागचे आणि बाजूचे दिवे लागत नाहीत, वाहनाची स्थितीही वाईट असते. तरीही भरधाव सोडले जातात. या ट्रकांचे ‘पासिंग’ कोण कसे करते हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. दुचाकींच्या अपघातांचे प्रमाणही राज्यात प्रचंड वाढले आहे. हेल्मेट न वापरणे, ओव्हरटेक करणे, भरधाव वाहन चालवणे अशी अनेक कारणेही या अपघातांना असल्याचे दिसते.  रस्त्यांवर लेन आखलेल्या नाहीत, आखलेल्या असल्या तर कोणी त्या पाळत नाही, आजूबाजूच्या रस्त्यांवरून अचानक वाहने मुख्य रस्त्यावर येतात, रस्त्यांवर, रस्त्यांकडेला वाहने बेशिस्तपणे उभी दिसतात, अतिक्रमणे तर थेट रस्त्यांवर पोहोचलेली आहेत. वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या तर शहरांना ग्रासून आहेच. रस्त्यांची रुंदीकरणे वर्षानुवर्षे अडली आहेत. वाहने मात्र वाढतच चालली आहेत. रस्त्यांवर सारा सावळागोंधळ असतो आणि याच गोंधळातून ‘पळा पळा, कोण पुढे पळे तो’ ची शर्यत रस्त्यावर लागलेली असते. हे चित्र बदलणार कसे? नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीप्रमाणे गोव्यातील वाहनांची संख्या अकरा लाखांहून अधिक आहे. म्हणजे येत्या काही वर्षांत दरडोई एक वाहन असेल. रस्त्यांवर वाहनांची प्रचंड दाटी असल्याने वाहन चालवणे हेही विलक्षण कौशल्याचे काम बनले आहे. त्यामुळे अनेकांचा वाहनांवर ताबा राहात नाही आणि अपघात घडतो. अपघात कोणी जाणूनबुजून करीत नाही हे जेवढे खरे, तेवढेच बेफिकिरी हेच अपघाताचे मुख्य कारण हेही तितकेच खरे आहे. ही बेफिकिर वृत्ती आणि कायदा आपले काय वाकडे करणार आहे ही मस्ती यातून गोव्याच्या वाहतुकीचा बोर्‍या वाजला आहे. भ्रष्ट वाहतूक खाते हे या बेफिकिरीचे मूळ आहे. वाहतूक खात्याचे उद्दिष्ट सध्या अपघात रोखण्याऐवजी केवळ महसूल गोळा करणे एवढेच दिसते. वाहतुकीवर त्यांचे काडीमात्र नियंत्रण नाही. गेल्या दोन वर्षांत वाहतूक खात्यात उजेडात आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे बोलकी आहेत. वाहतूक खात्यामधील भ्रष्टाचाराची साखळी जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हाच वाहनांची काटेकोर तपासणी होईल, कायद्याच्या पालनाचा आग्रह धरला जाईल आणि जेव्हा जनतेमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, तेव्हाच अपघातांचे हे सत्र थांबेल!