आठ दिवस उलटले तरी पाठ्यपुस्तके अनुपलब्ध

0
137

>> शिक्षण खात्याचा यंदाही घोळ

यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन आठ दिवस उलटले तरी शिक्षण खात्याला मुलांना आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात यश प्राप्त झालेले नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होताना ठेकेदारांकडून केवळ पन्नास टक्के पुस्तके उपलब्ध झाली होती. राज्यातील विद्यालये पाठ्य पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. आत्तापर्यंत काही शाळांतील मुलांना एक – दोन पुस्तके मिळालेली आहेत.

सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत शिक्षण खात्यातर्फे पहिली ते आठवीच्या मुलांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही पाठ्यपुस्तके वेळेवर उपलब्ध करण्यात शिक्षण खात्याला यश प्राप्त झालेले नाही. सर्व शिक्षा अभियानाकडून पुस्तकांच्या छपाईसाठी दरवर्षी निविदा जारी केले जाते. सध्या कंत्राटदाराकडून छापून मिळणारी पुस्तके विद्यालयांना दिली जात आहेत.
राज्यात नवीन पुस्तके उपलब्ध न झाल्याने सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकांचा वापर करावा लागत आहे. सर्वच मुलांना जुनी पुस्तके मिळत नाहीत. त्यामुळे पाठ्य पुस्तकांअभावी शिकवणीवर परिणाम होतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.