आठवणीतली उचकी नव्हे; ‘उचकी’ ः एक रोग

0
573

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

उचकी ही फक्त दुसर्‍यांनी आठवण काढण्यानेच येत नाही तर तो एक स्वतंत्र रोग किंवा इतर रोगांमध्ये लक्षणस्वरूपातही असू शकतो. म्हणूनच उचकी ही नेहमी क्षुद्रा किंवा अन्नजा नसते. म्हणून उचकीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. 

‘उचकी’ लागली म्हणून कोणी डॉक्टरांकडे तपासायला बहुधा येत नाही. बर्‍याच वेळा उचकी आहारसेवनानंतर किंवा काही अचानक केलेल्या हालचालींमुळे येते. अशावेळी आहार किंवा जलसेवन केल्यास उचकी यायची थांबते. पण कधी कधी कितीही उपाय केल्यास उचकी थांबत नाही तेव्हा मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागतो. अशी न थांबणारी उचकी बर्‍याच वेळा इतर रोगाचे उपद्रव स्वरूप असते. अशा वेळी त्या विशिष्ट रोगाची चिकित्सा केली तर उचकीही येणे थांबते.
प्राणवायुच्या प्रतिलोम गतीमुळे वायू बाहेर पडताना हिक् हिक् असा विशिष्ट प्रकारचा आवाज ज्या रोगात उत्पन्न करतो, त्या रोगास ‘हिक्का’ म्हणजेच ‘उचकी’ असे आयुर्वेदामध्ये म्हटले आहे. श्‍वासोच्छ्वासाच्या क्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या नाभीपटलाची विकृती झाल्यास श्‍वासाची लय बिघडते आणि हिक्का उत्पन्न होते.
वायू बाहेर पडण्याच्या वेळी उदरात आक्षेप उत्पन्न होतो. उदरास धक्का बसल्याचे जाणवते व त्यामुळेच यकृत, प्लिहा, आंत्र आदि अवयव हे जणू पिळवटल्याप्रमाणे होऊन मुखावाटे बाहेर पडत आहेत की काय असे वाटू लागते.
गंभीर स्वरूपाच्या व वारंवार उद्भवणार्‍या या प्रकारच्या हिक्केमध्ये उदरात बसणार्‍या हिसक्यामुळे पोटदुखीसारखी लक्षणेही उत्पन्न होतात.
विविध कारणे, लक्षणे व गंभीरतेवरून ‘उचकी’ या रोगाचे प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. दिसणार्‍या लक्षणांवरून रोगाची गंभीरता व प्रकार समजून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
१) अन्नजा उचकी ः क्रोध, अति पायी प्रवास करणे, फार जोरात हसणे, अति भार वहन करणे इत्यादी कारणांनी व जास्त तिखट खाल्ल्याने, विशेषतः अतिमद्यपानामुळे वायू प्रकूपित होतो. हा प्रकूपित वायू कोष्ठात जाऊन अन्नपानाने पीडित होऊन प्राणवह स्रोतस विकृत करतो. त्यामुळे प्राणवायूची गती प्रतिलोम होऊन उचकी उत्पन्न होते. अन्नाच्या पीडनाने उत्पन्न होत असल्यानेच या प्रकारास अन्नजा उचकी असे म्हटले आहे. अन्नाच्या पीडनाने जरी उचकीला सुरुवात झाली तरी शिंक किंवा तत्सम वेग आले असताही उचकीला सुरुवात होते. या प्रकारच्या उचकीने मर्मस्थानी फारशी पीडा उत्पन्न होत नसली तरी बोलणे, श्‍वासोच्छ्वास, अन्न गिळणे या क्रियेत थोडासा व्यत्यय उत्पन्न होतो. थोडेसे डोके दुखते. काही खाल्ले अथवा प्याले असता थोडावेळ उपशम मिळतो. स्निग्ध, मधुर, अम्ल, उष्ण व पातळ असा आहार घेतल्यास प्रकूपित वायूचा थोडासा प्रशम होतो व साहजिकच थोडावेळ बरे वाटते.
२) यमला उचकी ः यामध्ये एकामागोमाग असे २ वेग जोडीने येतात. मध्ये काही काळ व्यतीत झाल्यानंतर पुन्हा जोडीने वेग येतो. यावेळी शिरःप्रदेशी कंप हे लक्षण प्रामुख्याने आढळते.
३) व्यपेता उचकी ः अन्नाच्या पाचनकाली उत्पन्न होऊन पुढे वाढतच जाणारी उचकी म्हणजे व्यपेता उचकी होय. या उचकीमध्ये बडबड, उलटी, द्रवशौच प्रवृत्ती, तहान, जांभया, तोंड सुकणे, डोळ्यांमधून वारंवार स्राव येणे, शरीराच्या ठिकाणी वक्रता येणे अशी लक्षणे उत्पन्न होतात. या उचकीचा वेळ फार काळ टिकत नाही परंतु श्‍वासाच्या व गिळण्याच्या क्रियेस मात्र फार मोठा व्यत्यय येत असतो. म्हणूनच या उचकीला ‘प्राणोपरोधिनी’ असेही म्हटलेले आहे.
४) क्षुद्रा उचकी ः अचानक केलेल्या काही हालचालींमुळे उदान वायू प्रकूपित होतो. स्रोतो-वैगुण्य येते आणि जत्रुमूल व कंठ याठिकाणी उचकी उत्पन्न होते. वातप्रकोप – स्रोतोरोध व उचकीची व्यक्ती या तीनही घटना अल्प प्रमाणात घडतात. विकृतीच्या अल्पतेमुळेच फारशी पीडाकार लक्षणे उत्पन्न होत नाहीत. त्याचप्रमाणे श्‍वासोच्छ्वास व अन्नपान ग्रहण यामध्ये विशेष अडथळा येत नाही. ही उचकी श्रमाने वाढते व अन्नपान सेवन केले असता किंवा साधे पाणी प्यायल्यानंतरही लगेच कमी होते. उचकीचा वेग फार काळ टिकत नाही. पहिला वेग गेल्यानंतर पुन्हा येणारा वेगही बर्‍याच कालावधीनंतर येतो.
५) गंभीरा उचकी ः गंभीरा उचकी हा प्रकार सामान्यतः अन्य व्याधींमध्ये उपद्रवस्वरूप निर्माण होतो व तो एक अरिष्टसूचक असे लक्षण असते. या प्रकारात उचकी उत्पन्न होत असताना नाभी किंवा त्या खालच्या पक्वाशयासारख्या अवयवातून आक्षेप येतात असे वाटते. उचकीचा ध्वनी गंभीर व मोठ्याने येतो. रोगी कृश व दीन बनतो. उचकीच्या वेगाचे वेळी छातीमध्ये पीडा होते. जांभया, श्‍वासोच्छ्वासात अडथळा येणे, ताप, बडबड, मूर्च्छा या प्रकारचे अनेक उपद्रव उत्पन्न होतात. पार्श्‍वभूल हा विशेष करून जाणवत असतो.
६) महती उचकी ः हा प्रकार नेहमीच अन्य व्याधींमध्ये उपद्रवस्वरूप निर्माण होतो व ते एक अरिष्टसूचक असे लक्षण असते. प्रकूपित वात हा कफाने आवृत्त होतो. मांस, बल, अग्नी, उत्साह हे सर्वच भाव क्षीण होतात. रोग्याच्या अशा या अवस्थेत प्रकूपित झालेला वायू हा नाभी, आमाशय, हृदय, क्लोम अशा महत्त्वाच्या अवयवांच्या ठिकाणी आक्षेप उत्पन्न करून उचकी उत्पन्न करतो. या उचकीमध्ये उचकीचा वेग, बल, आवाज आणि स्थानाची व्याप्ती फार मोठी असल्यानेच या उचकीला महाउचकी असे म्हटले जाते. एकावेळी एक, दोन वा तीन अशा समूहाने उचकीचे वेग येतात. त्यांचा वेग अतिउग्र असतो.
या प्रकारात प्राणवह स्रोतसाचा व मर्माचा अवरोध झाल्याने श्‍वासोच्छ्वास हा सकष्ट व सशूल असतो. शंखप्रदेशी वेदना असतात. डोळ्यांतून पाणी वाहत असते. शब्दोच्चार नीट होत नाहीत. रोगी काहीतरी बडबडत असतो पण ते कळत नाही. शरीर जखडणे, स्मृती नष्ट होणे, संज्ञानाश होणे, गिळता न येणे, तहान अधिक प्रमाणात असणे, हस्तपाद शैथिल्य शरीर पाठीच्या बाजूने वाकणे अशी अनेक पीडाकर लक्षणे उत्पन्न होत असतात.
हा प्रकार केवळ असाध्य नव्हे तर ‘सद्योमारक’ असाच आहे, हे वरील लक्षणांवरून स्पष्ट होते.
उचकीमधील चिकित्सा ः
उचकीलाही चिकित्सा किंवा उपचार असतात, असा काहींना प्रश्‍न पडला असेल पण उचकी हा रोग सामान्य वाटत असला तरी तो दारूणही असू शकतो. हा रोग अनेक वेळा परतंत्र म्हणजेच उपद्रवस्वरूप असतो. अशावेळी मूळ रोगाची चिकित्सा करणे हे महत्त्वाचे ठरते. शिवाय उचकीच्या चिकित्सेचीही जोड द्यावी लागते.
उचकीसाठी करावयाची चिकित्सा ही कफवातघ्न, उष्ण, वातानुलोमक अशा औषध, अन्न व पान यांचे सहाय्याने करावी.
वातानुलोमनाच्या क्रियेमध्ये ‘प्राणायाम’ हा महत्त्वाचा उपक्रम ठरतो. यामध्ये प्राणायामातील कुंभकाचा प्रयोग करावा. बाह्य वायूचे श्‍वसनातील प्रमाण कमी झाले की आपोआपच कुंभक घडतो. या उपक्रमाने विमार्गग वायूला अनुलोम गती प्राप्त होत असते.
वायूला अनुलोम गती प्राप्त व्हावी याकरिता त्रासन हाही उपक्रम करावा. रोग्याला भय दाखवावे. त्यासाठी अंगावर एकदम ओरडावे. चिमटे काढावेत, अंगावर एकदम गार पाणी टाकावे. असे केल्याने वायूची विमार्गगता नष्ट होऊन त्यास अनुलोम गती प्राप्त होते.
उचक्यांमध्ये गुडशुंठी नस्य विशेष कार्यकारी ठरते. लसूण, कांद्याचा रस, गाजराचा रस व चंदनचूर्ण नीरक्षीराबरोबर मिसळून तेही नस्यासाठी वापरले जाते.
उचक्यांमध्ये सद्यफलदायी चिकित्सा म्हणून शीत व उष्ण जलाचा पानासाठी व्यत्यासात प्रयोग करणे हिताचे ठरते. दर २-५ मिनिटांनी अतिशीत व अतिउष्ण जल आलटून पालटून द्यावे. केवळ एवढ्याच उपचारानेही बर्‍याच वेळा क्षुद्रा व अन्नजा उचकी नष्ट होऊ शकते.
औषधी द्रव्यांपैकी सूतशेखर, समीरपन्नग, शंखभस्म, सर्पगंधा ही द्रव्ये आल्याच्या रसाबरोबर देण्याने चांगला फायदा होतो.
मयुरपिच्छामशी व शंखभस्म प्रत्येकी २५० मि.ग्रॅ. याचे मिश्रण मधाबरोबर थोडे-थोडे वारंवार चाटवणे अधिक फायदेशीर ठरते.
उचकी ही फक्त दुसर्‍यांनी आठवण काढण्यानेच येत नाही तर तो एक स्वतंत्र रोग किंवा इतर रोगांमध्ये लक्षणस्वरूपातही असू शकतो. म्हणूनच उचकी ही नेहमी क्षुद्रा किंवा अन्नजा नसते. म्हणून उचकीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.