आठवणींतले दिग्गज नेते सोमनाथ चटर्जी

0
154
  •  ऍड. रमाकांत खलप
    (देशाचे माजी कायदामंत्री)

सोमनाथदा गेले. डाव्या विचारसरणीचा एक विद्वान हरपला. बंगालच्या मातीत जन्मलेल्या अनेक विद्वानांच्या मालिकेतला एक मौल्यवान हिरा निखळला. ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून १९९६ साली गौरविला गेलेला अष्टपैलू सदस्य काळाच्या पडद्याआड झाला.

१९९६ सालीच माझी – त्यांची भेट तुडुंब भरलेल्या लोकसभागृहात झाली. माजी राष्ट्रपती संजीव रेड्डी यांचे निधन झाले होते. लोकसभेत दुखवट्याचा ठराव चर्चेला आला. खासदार सोमनाथ चटर्जींसह अनेकांनी स्व. संजीव रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली. मीही बोलण्याची संधी घेतली. त्यासाठी तत्कालीन सभापती श्री. संगमा यांना बरीच गळ घालावी लागली होती. माझे भाषण अवघ्या दोन तीन मिनिटांचे होते. तेवढाच वेळ मला सभापतींनी मोठ्या मिनतवारीने दिला होता.
ते माझे लोकसभेतले पहिलेच भाषण होते. कोलवाळ – महाखाजन पुलाची पायाभरणी संजीव रेड्डी यांच्या हस्ते १९८०-८१ दरम्यान ते राष्ट्रपती असताना झाली होती. पण पुलाचे काम रखडले होते. कोलवाळ नदीतून दरम्यानच्या काळात बरेच पाणी वाहून गेले होते व इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरणसिंग, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर इत्यादी अनेक पंतप्रधान झाले. अटलजी पंतप्रधान होऊन अवघ्या तेरा दिवसांत पायउतार झाले आणि आता श्री. देवेगौडा पंतप्रधानपदी बसले होते. माझ्या संजीव रेड्डींवरील दुखवट्याच्या भाषणात मी त्यांना गळ घातली, तुमच्या कारकिर्दीत तरी हा १०० – १५० मीटर लांबीचा पूल पूर्ण व्हावा. दोन तालुक्यांनाच नव्हे तर दोन राज्यांना जोडा. भूभाग जोडण्यापेक्षा माणसांची मने जोडा. स्वर्गीय राष्ट्रपतींना ती मोठी श्रद्धांजली ठरेल असे मी म्हणालो. देवेगौडांनी ते ऐकले. मला बोलावून घेऊन त्यांनी पुलाची कुळकथा जाणून घेतली आणि स्पष्ट हुकूम संबंधित खात्यांना दिले. लवकरच मला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थानही दिले. पुलाचे कामही मार्गी लागले. दीड-दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटनही झाले.

कोलवाळ पुलावरील या भाषणाने मला अनेक बुजूर्ग खासदारांच्या सान्निध्यात आणले. स्व. सिकंदर बख्त तेव्हा भारतीय पक्षाच्या उपाध्यक्षपदी होते. त्यांनी मला छोटी चिठ्ठी पाठवली. माझे छोटेसे भाषण त्यांना आवडले होते. दुसरे एक बुजूर्ग स्वतःच मला भेटायला आले. त्यांनी मला एक चिटोरा हाती दिला. त्यात ‘शाब्बास, सुंदर!’ असे शब्द होते. ती चिठ्ठी पाठवणारे होते सोमनाथ चटर्जी. त्यांनाही माझे भाषण आवडले होते. दुखवट्याच्या ठरावात मी माझ्या लोकसभा क्षेत्राची कैफियत संसदेत चतुराईने मांडली होती. त्यांना ही पद्धत आवडली होती. सोमनाथदा लोकसभेवर एकूण दहावेळा निवडून आले. सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडून गेलेले सोमनाथदा कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून निवडून येत राहिले. पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून व लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून, अत्यंत अभ्यासू, लोकहितदक्ष, डाव्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून ते लोकसभेत हयातभर वावरले. उंच, धष्टपुष्ट, शरीरठेवणीप्रमाणेच त्यांची वाणीही गंभीर असायची. आवाजाच्या खर्जात एकप्रकारची जरब असायची.

आपल्या वडिलांप्रमाणे तेही वकील होते. कोलकता हायकोर्टात त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. आपल्या वकिली अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या भाषणांतून जाणवायचा. बंगाली लोक जात्याच बुद्धिमान! ब्रिटीश आमदनीत अनेक बंगाली बुद्धिवंतांनी भारतीय जनमानसावर आपला ठसा उमटवला. प्रखर डाव्या विचारसरणीपासून अगदी उजव्या विचारांची पाठराखण करणारी नररत्ने या बंगाली भूमीत उपजली. विवेकी बुद्धिमत्तेचे उत्तम उदाहरण म्हणून स्वामी विवेकानंदांचे अध्यात्मिक मार्गदर्शन आजही मोलाचे मानले जाते. डाव्या विचारसरणीचे ज्योति बसू हे सोमनाथदांचे आदर्श सहकारी आणि गुरूही! परंतु आश्‍चर्य म्हणजे निर्मलकुमार आणि सोमनाथ ही पितापुत्राची जोडी विरोधी विचारांनी भारलेली होती. स्वतः निर्मलकुमार हे प्रखर हिंदुनिष्ठ. अखिल भारतीय हिंदू महासभेचे ते संस्थापक आणि अध्यक्षही. त्यांच्यापोटी धर्मवादापासून अलिप्त आणि संतुलित विचारांनी भारलेले असे सोमनाथदारुपी रत्न जन्माला आले.
माझ्या संसदीय कारकिर्दीत सोमनाथदांची मला खूप साथ लाभली. त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा देवेगौडांना पाठिंबा होता. इंद्रकुमार गुजराल यांनाही कम्युनिष्टानी साथ दिली. मी लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३१% आरक्षण देणारे विधेयक मांडले. त्याला त्यांनी पाठिंबा दिला. दुर्दैवाने ते विधेयक आजही प्रलंबित आहे. दिवाणी कोर्ट कामकाज विधेयकात तसेच लवाद आणि इतर विधेयकास त्यांनी पाठिंबा दिला. वरील दोन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले. त्याची फळे आज भारतीय जनता चाखते आहे.

भारतीय रेल्वेचे स्वतःचे पोलीस खाते आहे. त्यांच्या संघटनेला खात्याची मान्यता नव्हती. ती मिळावी म्हणून डाव्या पक्षाची आघाडी कार्यरत होती. स्व. इंद्रजीत गुप्ता त्या बाबतीत आग्रही होते. आरपीएफचे नेते खासदार वासुदेव आचार्य, मोहम्मद सलीम आदी नेते जनेश्‍वर मिश्र यांच्यामार्फत मला भेटले. मी हा प्रश्‍न सोमनाथदांकडे नेला. संबंधित संघटनेला मान्यता देण्याची वा न देण्याची तरतूदच नाही असे माझे मत होते. सोमनाथदांना ते पटले आणि आरपीएफच्या मान्यतेचा प्रश्‍न २५-३० वर्षांनंतर कायमचा मिटला. रेल्वे प्रशासनाने नितीशकुमार यांच्या कारकिर्दीत संघटनेला मान्यता दिली. खुष होऊन सोमनाथदांनी मला कलकत्ता भेटीचे आमंत्रण दिले. त्यांनी तिथल्या वकील व न्यायमूर्तींसोबत चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या घरी माझ्यासह त्यांना भोजन दिले. त्यांचे हे निःस्सीम प्रेम आणि सदिच्छा माझ्या पहिल्या भाषणापासून अखेरपर्यंत सोबत करीत आल्या!