आज गोव्यात मतदान

0
134

>> लोकसभेसह पोटनिवडणुकांसाठी

राज्यातील दोन लोकसभा आणि विधानसभेच्या तीन पोट निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून आज दि. २३ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ यावेळेत मतदान घेण्यात येणार असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लोकसभेच्या १२ आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीतील १६ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय मतदार घेणार आहेत. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात प्रमुख लढत होत आहे. विधानसभेच्या मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघात तिरंगी लढत तर, म्हापसा मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे.

मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचार्‍यांकडून प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्रात राजकीय पक्षांच्या एजंटासमोर मतदानाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. मतदान केंद्रातील मतदान प्रक्रियेचे रिकोर्डींग केले जाणार आहे. लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन मतदारसंघात एकूण ११ लाख ३५ हजार ८११ मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या ५ लाख ८० हजार ०४३ एवढी असून पुरुष मतदारांची संख्या ५ लाख ५५ हजार ७६८ एवढी आहे.

लोकसभेसाठी दोन्हीकडे
भाजप-कॉंग्रेसमध्येच झुंज
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात ५ लाख ५६ हजार ६२५ मतदार आहेत. या मतदारसंघातून आरपीएचे अमित कोरगावकर, आपचे दत्तात्रय पाडगावकर, अपक्ष एैश्‍वर्या साळगावकर आणि भगवंत कामत निवडणूक रिंगणात आहेत.
दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सीस सार्दीन यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघातून आपचे एल्वीस गोम्स, शिवसेनेच्या राखी नाईक, अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर आणि मयूर काणकोणकर निवडणूक रिंगणात आहेत.

पोटनिवडणुका लक्षवेधी
विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघातील पोट निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपचे सुभाष शिरोडकर, मगोपचे दीपक ढवळीकर आणि कॉंग्रेसचे महादेव नाईक यांच्या तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघातून मगाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने मगो पक्षाच्या आमदारात फूट पडली. या मतदारसंघातून गोसुमंचे संतोष सतरकर आणि आपचे योगेश खांडेपारकर निवडणूक रिंगणात आहेत.

मांद्य्रात तिरंगी लढत
मांद्रे मतदारसंघात भाजपचे दयानंद सोपटे, कॉंग्रेसचे बाबी बागकर आणि अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

म्हापशात भाजप व कॉंग्रेस
यांच्यात प्रमुख लढत
म्हापसा मतदारसंघात भाजपचे जोशुआ डिसोझा आणि कॉंग्रेस पक्षाचे सुधीर कांदोळकर यांच्या सरळ लढत होत आहे.