आज-उद्या बँकांचा संप

0
145

पगारवाढीच्या मुद्यावर बँक कर्मचार्‍यांची फसवणूक करण्यात आल्याने आज ३० व उद्या ३१ मे रोजी राष्ट्रीयकृत बँकांनी संप पुकारला आहे, असे बँक कर्मचारी संघटनेचे गोवा निमंत्रक संतोष हळदणकर यांनी काल सांगितले. राष्ट्रीयकृत बँका फायद्यात असतानाही एन्‌पीएचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रीयकृत बँका नुकसानीत असल्याचे दाखवले जाते व बँका नुकसानीत असल्याने पगारवाढ देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते असे ते म्हणाले.

राष्ट्रीयकृत बँकांना १ नोव्हेंबर २०१७ रोजी वेतनवाढ मिळायला हवी होती. त्यासंदर्भात भारतीय बँकिंग संघटनेने आपल्या मागण्यांचे एक निवेदन सरकारला दिले होते. मात्र, सरकारने २ मे २०१८ रोजी बँक कर्मचार्‍यांना केवळ २ टक्के वेतनवाढ जाहीर केली. ही वाढ खूपच कमी असून मान्य करण्यासारखी नसल्याचे हदळणकर यांनी सांगितले. यासंदर्भात अर्थमंत्री व कामगार मंत्री यांना संघटनेने निवेदन देऊनही त्याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे आता ३० व ३१ मे रोजी संप पुकारण्यात आल्याचे हळदणकर म्हणाले.

वरील निर्णयामुळे ३० व ३१ मे रोजी राज्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व शाखा बंद राहणार असल्याचे ते म्हणाले. सकाळी १० वा. आझाद मैदानावर मोर्चा नेण्यात येणार असून तेथे घोषणा देण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.