आज उघडणार इफ्फीचा पडदा

0
127

>> अमिताभ बच्चन, रजनीकांत विशेष अतिथी

सुवर्ण महोत्सवी इफ्फीचे आज बुधवार दि. २० रोजी बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये उद्घाटन होणार आहे. काल इफ्फीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन व दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत हे उद्घाटन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून हजर राहणार आहेत. आपण महोत्सवासाठीच्या सगळ्या स्थळांची पाहणी केलेली असून हा महोत्सव पूर्णपणे यशस्वी व्हावा यासाठी सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली. इफ्फीसाठी यंदा ९३०० जणांनी प्रतिनिधी म्हणून नोंदणी केली आहे.

यंदा जादा दोन थिएटर्स
यंदा अतिरिक्त दोन थिएटर्सची व्यवस्था करण्यात आलेली असून पर्वरी येथील आयनॉक्समधील ही ती थिएटर्स असतील, अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली. आजच्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हे करणार आहेत.

७६ देशातील ३०० चित्रपट
यंदाच्या इफ्फीत ७६ देशांतील एकूण ३०० चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. यंदा कंट्री फोकससाठी रशियाची निवड करण्यात आली आहे.

गोवा सरकार १८ कोटी
रु. खर्च करणार
यंदाच्या इफ्फीसाठी गोवा सरकार १८ कोटी रु. खर्च करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. इफ्फीच्या उद्घाटन सोहळा ३ वाजता सुरू होणार असून उद्घाटन सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील कलाकार व अन्य मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी यावेळी दिली.