आजपासून भारताची दुसरी ‘कसोटी’

0
130

>> इंग्लंडच्या ओली पोपचे कसोटी पदार्पण निश्‍चित

भारत व इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून ऐतिहासिक लॉडर्‌‌स मैदानावर खेळविला जाणार आहे. यजमानांनी पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे आत्मविश्‍वास उंचावलेला इंग्लंडचा संघ भारतावर कुरघोडी करत आघाडी फुगवण्यासाठी आतुर झालेला आहे.

बर्मिंघममधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला विजयाने हुलकावणी दिली होती. गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतरही फलंदाजांनी गुडघे टेकल्यामुळे भारताला ३१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात एकट्या विराटने २०० धावा केल्या होत्या. तर उर्वरित सर्वांनी मिळून रडतखडत दोनशे धावांचा टप्पा ओलांडला होता. विशेषकरून आघाडी फळीतील फलंदाजांचे अपयश नजरेत भरण्यासारखे होते. कसोटी स्पेशलिस्ट म्हणून संघात असलेल्या मुरली विजय व अजिंक्य रहाणे या द्वयीकडून अधिक जबाबदारीचा खेळ अपेक्षित आहे. शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या या चौकडीला आपल्या वनडे व टी-२० शैलीला आवर घालून कसोटी क्रिकेटमध्ये समरस होणे भारतीय संघाच्या हिताचे आहे. शरीरापासून दूर असणार्‍या चेंडूचा पाठलाग करून त्या चेंडूवर बॅट लावण्याचा मोह आवरला तरच आघाडी फळीला दुसर्‍या कसोटीत मोठ्या धावा करता येतील. पहिल्या कसोटीत इंग्लंडने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच संघ जाहीर करत भारतावर मानसिक दडपण टाकले होते. या दडपणाखाली भारतीय संघ खचला. इंग्लंडचा संघ चार मध्यमगती गोलंदाजांसह उतरला म्हणून भारतानेदेखील त्याचे अनुकरण करत स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली होती. वेगवान गोलंदाजी हे इंग्लंडचे बलस्थान व भारताची कमकुवत बाजू आहे, हे हेरूनच इंग्लंडने वेगवान मार्‍याला पसंती दिली होती. भारताने आपली मजबूत फिरकी बाजू ओळखून कुलदीप किंवा रवींद्र जडेजाला पहिल्या सामन्यात उतरणे आवश्यक होते.

इंग्लंड संघात पहिल्या सामन्यात सात डावखुरे फलंदाज होते. जडेजाची अचूकता किंवा कुलदीपची वैविध्यता या सामन्यात नक्कीच कामी आली असती. ही चूक सुधारून आजपासून होणार्‍या दुसर्‍या सामन्यात अश्‍विनच्या जोडीला दुसरा फिरकी गोलंदाज खेळविला तर भारताला याचा नक्कीच लाभ मिळू शकतो. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने ओली पोप पदार्पण करणार असल्याचे काल जाहीर केले. खेळपट्टीचे स्वरूप पाहून फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू मोईन अली किंवा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू ख्रिस वोक्स यांच्या समावेशाबद्दल इंग्लंडचा संघ निर्णय घेणार आहे. बर्मिंघम हा इंग्लंडचा कसोटीतील बालेकिल्ला होता. लॉडर्‌‌सची परिस्थिती वेगळी आहे. २०११ साली या मैदानावर भारताला नमविल्यानंतर त्यांना आशियाई संघाकडून या मैदानावर ३ पराभव व २ अनिर्णिततेचा सामना करावा लागला आहे. पहिल्या कसोटीत भारत व इंग्लंडने प्रत्येकी चार झेल सोडले. यामुळे इंग्लंडला १५४ अतिरिक्त धावा तर भारताला ८६ अतिरिक्त धावा मोजाव्या लागल्या. लॉडर्‌‌सवर किमान चूका करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा उभय संघांचा प्रयत्न असेल. त्यामुळे ही कसोटी अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

संभाव्य संघ

भारत ः मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्‍विन, उमेश यादव, मोहम्मद शमी व इशांत शर्मा.
इंग्लंड ः ऍलिस्टर कूक, किटन जेनिंग्स, ज्यो रुट, ओली पोप, जॉनी बॅअरस्टोव, जोस बटलर, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, सॅम करन, स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन.