आजच्या टॅक्सीवाल्यांच्या संपाला एस्मा लागू

0
115

सरकारने राज्यातील पर्यटक टॅक्सी चालकांच्या आजच्या संपाला एस्मा लागू केला आहे. गोवा अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा १९८८ अर्तंगत ‘एस्मा’ लागू करण्यात आला असून प्रवासी व माल वाहतूक करणार्‍यांच्या संपावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा पर्यटक टॅक्सी मालकांच्या संपामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. पर्यटक टॅक्सी मालकांच्या संपाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

शुक्रवारच्या संपाच्या काळात पर्यटकांची पर्यटक टॅक्सीच्या अभावी कोणताही गैरसोय होऊ नये म्हणून कदंब महामंडळ आणि पर्यटन खात्याने राज्यातील सर्व रेल्वे स्थानक, बसस्थानक व इतर महत्वाच्या ठिकाणी पर्यायी वाहतूक व्यवस्थेची सोय उपलब्ध केली आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत संप बेकायदा असल्याची घोषणा करून संपात सहभागी होणार्‍यावर कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे. पर्यटक टॅक्सी मालकांनी संपावर फेरविचार करावा. टॅक्सी मालकांच्या मागण्यांवर सामंजस्याने तोडगा काढला जाऊ शकतो. पर्यटक टॅक्सी मालकांनी संप करून पर्यटन व्यवसायात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे मंत्री ढवळीकर यांनी गुरूवारी म्हटले आहे.

पर्यटन टॅक्सी मालकांनी संपाबाबत फेरविचार करावा, असे आवाहन गोवा पर्टन विकास महामंडळाचे अध्यक्ष काब्राल आणि गोवा कदंब वाहतूक मंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काल केले. पर्यटक टॅक्सीला गतिरोधक, मीटर या साध्या गोष्टी आहेत. या प्रश्‍नावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जाऊ शकतो. संप करून पर्यटकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. सर्वच प्रवासी वाहनांना गतिनियंत्रक सक्तीचा करण्यात आलेला आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

कदंब, पर्यटन खात्यातर्फे खास अधिकार्‍यांची नियुक्ती
पर्यटक टॅक्सी मालकांच्या संपाच्या काळात पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून कदंब वाहतूक महामंडळ, पर्यटन खात्याने खास आराखडा तयार करून अनेक ठिकाणी पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी खास अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. कदंब महामंडळाकडून सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यत सेवा उपलब्ध केली जाणार आहे. वाहतूक सेवेचे मुख्य समन्वयक म्हणून ए.डी. देसाई यांनी नियुक्ती केली आहे. तसेच पणजी कदंब बसस्थानक, मडगाव, वास्को, म्हापसा बसस्थानक, दाबोळी विमानतळ व पर्वरी डेपो येथे खास अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.

दाबोळी विमानतळावर २५ बसेसची सोय
दाबोळी विमानतळावरून पणजी, मडगाव, कळंगुट, म्हापसा, फोंडा येथे पर्यटकांची वाहतूक केली जाणार आहे. यासाठी खास २५ बसगाड्याची सोय करण्यात आली आहे. तसेच तिकीट दर सुध्दा निश्‍चित करण्यात आला आहे. थिवी, करमळी, मडगाव आणि वास्को येथील रेल्वे स्थानकावर सकाळी ७ ते रात्री ८ पर्यत वाहतूक सेवा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी ७ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. पर्यटन माहिती केंद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळेत कार्यरत राहणार आहे. तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी महत्वपूर्ण संपर्क क्रमांक पर्यटन खात्याच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. पर्यटन खात्याच्या पणजी, मडगाव, पर्यटन माहिती काऊंटर कदंब बसस्थानक – पणजी, पर्यटक माहिती काऊंटर – दाबोळी, मडगाव रेल्वे स्थानक, वास्को रेसिडेन्सी, करमळी रेल्वे स्टेशन, थिवी रेल्वे स्टेशन, कळंगुटस कोलवा येथे खास अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक सेवेची आवश्यकता असलेले पर्यटक पर्यटन माहिती केंद्राशी दूरध्वनीवरून संपर्क करू शकतात. पणजी, कोलवा, मिरामार, कळंगुट फर्मागुडी, ओल्ड गोवा, म्हापसा, मडगाव, मये, वास्को येथे खास संपर्क अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कदंब महामंडळाने पहिल्या टप्प्यात ३५ बसगाड्यांची सोय केली आहे. तसेच गरज भासल्यास अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली जाणार आहे. राज्यातील पर्यटन टॅक्सी मालकांची प्रतिमा मलीन झालेली आहे. संप करून त्यात आणखीन भर घालू नये, असे कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले.

काब्राल यांचा टॅक्सीवाल्यांना इशारा
गोवा पर्यटन विकास महामंडळामध्ये ओला, उबरच्या धर्तिवर पर्यटकांना सेवा उपलब्ध करण्याची धमक आहे. पर्यटक टॅक्सी मालकांनी आपला हेकेखोरपणा न सोडल्यास यासंबंधीचा प्रस्ताव आपण सरकारकडे सादर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आमदार काब्राल यांनी दिला.

पर्यटक टॅक्सी मालकाकडून पर्यटकाने लुबाडण्यात येत असल्याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. गरज भासल्यास या पुराव्यांचा वापर करून पर्यटक टॅक्सी मालकावर कारवाई केली जाऊ शकते. पर्यटक टॅक्सी मालकांनी व्यावसायिक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून बंद मागे घ्यावा, असे आवाहन आमदार काब्राल यांनी केले.

 

संपाच्या निर्णयावर
टॅक्सीवाले ठाम
राज्यातील पर्यटक टॅक्सी मालक आजच्या संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी मालक संघटना आणि दक्षिण गोवा टॅक्सी चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या कळंगुट येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत संप कायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

पर्यटक टॅक्सी मालकांच्या संपाबाबत वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप पर्यटक टॅक्सी मालकांनी केला आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी संपाची पूर्वकल्पना देण्यात आली होती. संपासाठी संबंधितांकडून परवानगी घेतल्याचा दावा टॅक्सी मालकांनी केला.

पर्यटक टॅक्सी मालक पणजी येथील आझाद मैदानावर जमणार आहेत. सरकारी पातळीवरून मागण्याच्या पूर्तीसाठी करण्यात येणार्‍या वेळकाढूपणाचा निषेध करणार आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी मालक संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोस्कर यांनी दिली. दरम्यान, पर्यटक टॅक्सी मालकाच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यानी १४४ कलम लागू केले आहे. रस्त्यावर चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र राहण्यास बंदी घालण्यात आली आहे.