आजगावकर व पाऊसकरांना अपात्र करा

0
120

>> मगोची हंगामी सभापतींकडे अपात्रता याचिका सादर

मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले आपले एकेकाळचे सहकारी मनोहर उर्फ बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांच्या विरुद्ध काल मगो पक्षाचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पक्षांतर बंदी कायद्याखाली हंगामी सभापती मायकल लोबो यांच्याकडे अपात्रता याचिका सादर केली आहे.

मगो पक्षातून फुटून गेलेल्या वरील दोन्ही नेत्यांना पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन व येऊ घातलेली लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक या पार्श्‍वभूमीवर बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांनी मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केला होता व आम्ही वेगळा गट स्थापन करून तो भाजपमध्ये विलीन केल्याचा दावा केला होता.

दोघेही अपात्र ठरतील : दीपक
दरम्यान, आम्ही मगो पक्ष भाजपमध्ये विलीन केलेला नाही. मूळ मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजगावकर व पाऊसकर हे अपात्र ठरतील. अशा प्रकारे कुणी पक्षाचा वेगळा गट स्थापन करून तो दुसर्‍या पक्षात विलीन करू शकत नाहीत. कायद्यात तशी तरतूद नाही. त्यामुळे ते दोघेही पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र ठरतील, असा दावा काल दीपक ढवळीकर यांनी केला. न्यायालयात जाण्याची वेळ नेणार नसून सभापतीकडून नक्कीच न्याय मिळेल, असे ते संबंधित प्रश्‍नावर म्हणाले.