आक्रमक गोव्यासमोर मुंबईच्या बचावाची कसोटी

0
115

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटी एफसीची गुरुवारी मुंबई फुटबॉल एरीनावर एफसी गोवाविरुद्ध कसोटी होत आहे. त्यावेळी गोव्याच्या भक्कम आक्रमणाचे आव्हान मुंबईच्या कमकुवत बचाव फळीसमोर असेल.

कोस्टा यांचा गत मोसमातील चुका टाळण्याचा प्रयत्न राहील. गेल्या मोसमात मुंबईची चार वेळा गोव्याशी गाठ पडली. यात उपांत्य लढतीचा समावेश होता. मुंबईला तीन वेळा पराभूत व्हावे लागले. यात त्यांना १२ गोल पत्करावे लागले. एकमेव विजय उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्यात झाला. तो फरक १-० असा होता. त्याआधी पहिल्या टप्यात गोव्याने ५-१ अशी बाजी मारली होती.
कोस्टा यांचा संघ इतक्या आव्हानात्मक कसोटीपूर्वी अत्यंत खराब स्थितीत आहे. त्यांना घरच्या मैदानावर ओडिशा एफसीविरुद्ध २-४ अशा धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

कोस्टा यांना बर्‍याच दुखापतींचा विचार करावा लागेल, ज्या प्रामुख्याने मधल्या फळीशी संबंधित आहेत. मॅटो ग्रजिच याला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यांना सर्वस्वी भारतीय खेळाडूंची बचाव फळी खेळवावी लागेल. गोव्याच्या आक्रमक दृष्टिकोनाच्या संघाविरुद्ध त्यांना अत्यंत दक्ष राहावे लागेल.
स्टार फॉरवर्ड मोडोऊ सौगौ हा सुद्धा मैदानावर पडल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे कोस्टा यांचे आक्रमणातील पर्याय आणखी कमी झाले आहेत. ओडिशाविरुद्धच्या लढतीपूर्वी जायबंदी झालेला रॉलीन बोर्जेस हा सुद्धा खेळू शकणार नाही.

पोर्तुगालच्या कोस्टा यांनी सांगितले की, ओदीशाविरुद्धच्या पराभवानंतर मी खेळाडूंशी चर्चा केली. आम्हाला चुकांवर मात करावी लागेल. त्या टाळण्यासाठी आम्हाला खेळावर लक्ष केंद्रीत ठेवावे लागेल. फुटबॉलमध्ये तुम्ही फाजील आत्मविश्वास बाळगलात तर ती समस्या ठरते. मला सोप्या लढतीची अपेक्षा नाही, पण गोवा सुद्धा सोप्या लढतीची अपेक्षा बाळगत नसेल याची मला खात्री आहे. आम्हाला त्यांच्याविषयी आणि त्यांना आमच्याविषयी आदर वाटतो.

मुंबईचा संघ थोडा पिछाडीवर राहून संघटीत खेळतो अशी ओळख असली तरी सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाच्या वेग आणि शैलीविरुद्ध त्यांना नेहमीच झगडावे लागले आहे.
यंदा मात्र गोव्याचा संघ अगदी सर्वोत्तम फॉर्मात आहे असे नाही. चेन्नईनवरील ३-० अशा विजयानंतर त्यांना बंगळुरू एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्याविरुद्ध बरोबरीसाठी संघर्ष करावा लागला. मुख्य म्हणजे दोन्ही सामन्यांत त्यांना बरोबरीच्या गुणासाठी गोलकरीता भरपाई वेळेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
फेरॅन कोरोमीनास याच्या खात्यात दोन गोल जमा झाले आहेत, पण ह्युगो बुमूस याला दुखापत झाली. त्यातून तो सावरला आहे. एदू बेदीया सुद्धा जायबंदी होता. यामुळे गोव्याच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

मुंबईमध्येच गोव्याला आयएसएलचा अंतिम सामना गमवावा लागला होता. त्यामुळे या मैदानवर परतल्यानंतर काही कटू आठवणी जाग्या होऊ शकतात. आपला संघ भावनिक आव्हानावर मात करेल आणि तीन गुण खात्यात जमा करेल यासाठी लॉबेरा प्रयत्नशील राहतील.
लॉबेरा यांनी सांगितले की, मुंबईविरुद्ध ५-१ असा विजय आमचा संघ लक्षात ठेवेल अशीच माझी पसंती राहील. मला वाटते की प्रत्येक सामना वेगळा असतो. हा सामना अवघड असेल, कारण आम्ही एका फार चांगल्या संघाविरुद्ध खेळणार आहोत. भूतकाळ आमच्यासाठी महत्त्वाचा नाही.